esakal | पालखी सोहळ्यात फेसबुक दिंडीचा उपक्रम 
sakal

बोलून बातमी शोधा

पालखी सोहळ्यात फेसबुक दिंडीचा उपक्रम 

पालखी सोहळ्यात फेसबुक दिंडीचा उपक्रम 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड - जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात तरुणांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या नेटवरील फेसबुक दिंडीतर्फे यंदा दोन्ही सोहळ्यांत अभिनव उपक्रम हाती घेण्यात येत आहे. फेसबुक दिंडीतर्फे वारी "ती'चा एक अभिनव उपक्रम घेऊन येत आहे. त्यात गर्भ लिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या, बाल लैंगिक अत्याचार, लैंगिक अत्याचारासह अन्य विविध मुद्‌द्‌यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. त्या माध्यमातून समाजातील वास्तव समजासमोर मांडून त्यावरील उपाययोजनांबाबत चर्चा घडवली जाणार आहे. 

सुमारे सात वर्षांपूर्वी छायाचित्रे काढून ती फेसबुकवर लोड केली जात होती. त्यात देहूच्या स्वप्नील मोरे यांचा पुढाकार होता. अडचणींवर मात करत त्यांनी तो उपक्रम सुरू ठेवला होता. त्यातून फेसबुक दिंडीची कल्पना पुढे आली. त्यानुसार स्वप्नील मोरे यांनी सात वर्षांपूर्वी प्रयोग केला. बघताबघता फेसबुक दिंडी चळवळ म्हणून पुढे येत आहे. स्वप्नीलसह त्या "टिम'मध्ये मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सूरज दिघे, राहुल बुलबुले, ओंकार मरकळे, सुमित चव्हाण, अमोल निंबाळकर, ओंकार महामुनी कार्यरत आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीने फेसबुक दिंडीचे काम सुरू आहे. यंदा ते वेगळ्या धाटनीने त्यात लक्ष घालून ती दिंडी अधिकाधिक विधायक करण्याचा प्रयत्न करत आहेत. फेसबुक दिंडी नेहमीच वारीच्या अपडेट्‌ देण्यासह सामाजिक बांधिलकीही जपण्याच्या प्रयत्न करते. गेल्या वर्षी फेसबुक दिंडी व बारामती येथील एनव्हारमेंटल फोरम ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे जलसंधारण अभियान राबवले होते. त्यात बऱ्हाणपूर आणि कारखेल (ता. बारामती) येथे ओढा खोलीकरण आणि रुंदीकरणाचे कामे केले आहे. यंदाही वेगळ्या प्रकराची "थीम' घेऊन फेसबुक दिंडी येत आहे. 

यावर्षी फेसबुक दिंडी वारी "ती'चा अभिनव उपक्रम घेऊन येत आहे. त्यात गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूणहत्या, बाल लैंगिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, मासिक पाळी समज गैरसमज, बालविवाह, हुंडा, कौटुंबिक हिंसाचार, विधवांच्या समस्या, रूढी आणि परंपरामध्ये अडकलेल्या स्त्रिया, वारकरी संप्रदायातील स्त्री संतांचे कार्य, स्त्री अभिव्यक्ती, कर्तृत्ववान स्त्रिया अशा मुद्‌द्‌यांवर प्रकाश टाकून समाजासमोर नव्या मुद्दांना आणणार आहे. मुद्दे घेऊन समाजासमोर काही प्रश्न उपस्थित करणार आहोत. त्यांच्या उपक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. अभियानातून फेसबुक दिंडी "ती' आणि "तिचा' संघर्ष मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पंढरीची वारी म्हणजे विठ्ठलाला भेटण्याची वारकऱ्यांची आस, पंढरपूरपर्यंत केलेला संघर्षमय प्रवास, साधारणपणे पंढरीची वारी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्त केली जाते. आजोबा वारीमध्ये जात होते, त्यांच्या शरीराने साथ द्यायचे सोडल्यानंतर वडिलांनी पंढरीची वारी सुरू केली. काही काळानंतर तीच वारी नातवाकडे येणार आहे. याच प्रकारे वारीचे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतर होते. त्यामुळे वारी कथा आहे एका संघर्षाची, ती गाथा आहे अस्तित्वाची, वारी प्रवास आहे, अंतरंगाचा, वारी कहाणी आहे. स्वत्वाची, असे स्पष्ट करून फेसबुक दिंडीचे स्वप्नील मोरे यांनी त्यांच्या संकल्पनेची व्याप्ती स्पष्ट केली. 

श्री. मोरे म्हणाले, ""हाच प्रवास, हाच संघर्ष, हीच लढाई ती कितीतरी पिढ्यांपासून, नव्हे तर अगदी अनादी काळापासून करत आहे. ही लढाई आहे तिच्या अभिव्यक्तीची, मुक्तीची, अतित्वाची, स्त्रीत्वाची, ही लढाई आहे."ती'चा संघर्ष सुरू होतो तो गर्भात असल्यापासूनच. एक "वार' कधीही न संपणारी.''