esakal | देहूतील भक्तनिवासाचे काम पूर्णत्वाकडे 
sakal

बोलून बातमी शोधा

देहूतील भक्तनिवासाचे काम पूर्णत्वाकडे 

देहूतील भक्तनिवासाचे काम पूर्णत्वाकडे 

sakal_logo
By
संदीप भेगडे

देहूरोड - देहूत राज्याच्या विविध भागांतून दर्शनासाठी येणाऱ्या भाविक-वारकऱ्यांची भोजन आणि निवासाची व्यवस्था व्हावी यासाठी सरकारच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत सुमारे आठ कोटी रुपये खर्चाच्या व साडेसहा हजार स्क्वेअर फूट जागेत सुरू असलेल्या भक्तनिवासाचे बांधकाम 80 टक्के पूर्ण झाले आहे. 

इंद्रायणीकाठी संत तुकाराम महाराज वैकुंठ मंदिर परिसरात सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग (उपविभाग हवेली क्रमांक एक) अंतर्गत एस. एस. साठे कंपनीकडून फेब्रुवारी 2015 मध्ये भक्तनिवासाच्या बांधकामास सुरवात झाली. डिसेंबर 2017 पर्यंत काम पूर्ण करायचे आहे. 

अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, बांधकामात वाहनतळासह तीन मजल्यांचा समावेश असून, पहिल्या मजल्यावर भोजनालय, प्रतीक्षा खोली, किचन, संत तुकाराम जीवन संग्रहालय असेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर भक्तांसाठी नऊ खोल्या, एक स्टोअर, दोन कार्यालयीन खोल्या तर छतावर 45 हजार लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्‍या, भूमिगत 40 हजार लिटरच्या पाण्याच्या टाकीचाही समावेश आहे. दर्शनी भागातील मोकळ्या परिसरात ग्रॅनाईट असणार आहे. समोरच नक्षीदार प्रवेशद्वार आहे. भक्तनिवासात प्रवेश करण्यासाठी तीन जिने आहेत. 

भक्तनिवासाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्याच्या हस्तांतराचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र विकास समिती घेणार आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानची बांधकामावर देखरेख आहे. 
सचिन टिळक, शाखा अभियंता 

तुकाराम बीज, पालखी सोहळा याव्यतिरिक्त वर्षभरात देहू दर्शनाला भाविक मोठ्या संख्येने येतात. अनेक भाविक मुक्कामी असतात. संस्थानची धर्मशाळा आहे. मात्र, 6 ते 7 खोल्या अपुऱ्या पडतात. त्यामुळे सरकारचे भक्तनिवास ही भाविक वारकऱ्यांच्या दृष्टीने एक चांगली सोय ठरणार आहे. 
पंढरीनाथ मोरे, अध्यक्ष, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू 

भक्तनिवासाचे काम दर्जात्मक झाले आहे. त्यात असलेल्या आधुनिक सोयीसुविधांमुळे वारकरी संप्रदाय संतुष्ट होईल. त्यांची गैरसोय होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली गेली आहे. 
सुनीता टिळेकर, सरपंच, देहू