माणूसपण जपणारा विठ्ठल

(शब्दांकन - शंकर टेमघरे)
Friday, 30 June 2017

विदर्भातून १९५२ मध्ये मी पुण्यात राहायला आलो. शाळेत असताना मी पंढरीच्या आषाढी वारीबद्दल खूप वाचले होते. त्याबाबत उत्सुकताही होती. पुण्यात आल्यावर मी पहिल्यांदाच वारी पाहिली. टाळमृदंगाच्या गजरात मनोभावे जाणारे वारकरी मनाला भावले. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, मनातील आनंद, ते भक्तिमय वातावरण यामुळे माझी त्यांच्यावरील भावना अधिक दृढ झाली आणि तेव्हाच ठरविले आपणही एकदा तरी वारीला जायचेच. त्या वेळी पुण्यातील एका दैनिकात मी काम करीत होतो. किमान तीन-चार दिवस तरी वारीत जायचे ठरवून १९५४ मध्ये मी वारीत सहभागी झालो.

मी कोणत्याही दिंडीत चालत नव्हतो. कोणत्याही दिंडीजवळ चालत राहायचो. त्यांचा सहवास अनुभवायचो. नंतर-नंतर त्यांच्यात सहभागी होऊ लागलो. त्यानंतर मी पाच वर्षांचा अपवाद वगळला तर गतवर्षीपर्यंत वारी चुकविली नाही. वारीतील आनंद अवर्णनीय आहे. मला मानसिक आनंदाची शिदोरी वारीतच मिळाली. चार-पाच वर्षांपूर्वी वारीला जायला निघालो. सायंकाळी स्वारगेट एसटी स्थानकावर पोचलो. वारी वाल्हेत होती. तेथे सहभागी होणार होतो. मात्र, मी चुकून वेल्हेच्या बसमध्ये कसा बसलो, हे समजले नाही. रात्री साडेअकराच्या सुमारास वेल्हेत उतरलो. मला समजेना आपण कुठे आलो, वारी दिसेना. कंडक्‍टरला विचारले, ‘इथे वारी नाही का?’ त्याने सांगितले, तुम्ही चुकून वेल्हेत आला. आता जायला गाडी नाही. तुम्हाला इथेच राहावे लागेल. मी एसटी बसमधून खाली उतरलो. किर्रर्र अंधार होता. काय करायचे ते सुचेना. तेवढ्यात झोपडीतून साध्या वेशातील माणूस बाहेर आला.

मला म्हणाला, ‘‘बाबा कोणाकडे जायचे तुम्हाला.’’ त्याला सर्व हकीगत सांगितली. तो म्हणाला, ‘‘काही काळजी करू नका. येथील मारुती मंदिरात झोपा. सकाळी उठून जा.’’ त्याने मंदिर उघडून दिले. अंथरून टाकून दिले. जेवणाबाबत विचारले. मी शिदोरी आणल्याचे सांगितले. जेवण झाल्यावर तो निघून गेला आणि मी झोपी गेलो. पहाटे पाच वाजता मी उठलो तर तो चहा घेउन दरवाजातच उभा होता. चहा घेतला आणि निघालो, तर त्याने भाकरी आणि उसळीची शिदोरी हातात दिली. मला काहीच कळेना! मीपण ती घेतली आणि बसमध्ये शिरलो. तेव्हा त्याने कंडक्‍टरला सांगितले, ‘‘त्यांना वारीत वाल्हेला जायचे आहे. कोठून सोयीचे जाईल, तेथे त्यांना उतरवा.’’ बस निघाली. मला हात करून तोही निघून गेला. बस काही अंतर पुढे गेल्यावर माझ्या मनात विचार आला, ज्याला माझे नाव माहीत नाही. तो एक मनुष्य रात्री येतो. विचारपूस करतो. नाव न सांगताही सर्व व्यवस्था करणारा होता तरी तो कोण? तेव्हा मनात विचार आला हा विठ्ठल तर नसेल ना! वारीत निघालेल्या भक्ताची काळजी घेणारा. तेव्हाच मला विठ्ठलाचे दर्शन झाले. तेव्हापासून मी प्रत्येक माणसात देव पाहायला शिकलो. वारकऱ्यांच्या रूपाने मला प्रत्येक वारीमध्ये विठ्ठलच भेटत गेला. दिगदर्शक म्हणून मोठे नाव झाले. पण वारीएवढा मोठा आनंद कशातच मिळाला नाही. प्रत्येक माणसांत विठ्ठल पाहण्याची सवय वारीमुळे जडली. माणसातील देव याचं मूलतत्त्व मला वारीतच गवसले. तेच माझ्या आयुष्याचे सारतत्त्व ठरले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Wari 2017