विठ्ठला हा ज्ञानाचा महासागर 

(शब्दांकन - शंकर टेमघरे) 
Saturday, 1 July 2017

डॉ. विजय भटकर, वैज्ञानिक 
पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची निष्ठा पाहिली की भक्तीचे खरे स्वरूप पाहायला मिळाले. वारीत निरनिराळ्या भागातून आलेल्या सर्व जातीधर्मातील वारकरी जेव्हा एकत्र येऊन संतांचे अभंग गातात. तेव्हा आपली संस्कृती आध्यात्मिकदृष्ट्या किती समृद्ध आहे, याची जाणीव होते. 

मी इंजिनियर झाल्यानंतर "आयआयटी'साठी बडोदा, दिल्ली, त्रिवेंद्रमला राहत होतो. त्या काळात मी ज्ञानेश्वरीचे वाचन करीत होतो. त्यामुळे मला वारी आणि एकूणच वारकरी संप्रदायाबद्दल कमालीची उत्सुकता होती. तेथून पुण्याला आल्यानंतर माझी ओळख किसनमहाराज साखरे यांच्याशी झाली. त्यांची कीर्तने मी ऐकत होतो. त्याच काळात माझे सी-डॅकच्या महासंगणकाचे काम सुरू होते. मी साखरे यांच्यासमवेत प्रथम पंढरीच्या वारीत सहभागी झालो. वारकऱ्यांचा भक्तिभाव, त्यांची अभंग गाताना व्यक्त होणारी भावना पाहून मी भारावून गेलो. पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची निष्ठा पाहिली की भक्तीचे खरे स्वरूप पाहायला मिळाले. वारीत निरनिराळ्या भागातून आलेल्या सर्व जातीधर्मातील वारकरी जेव्हा एकत्र येऊन संतांचे अभंग गातात, तेव्हा आपली संस्कृती आध्यात्मिकदृष्ट्या किती समृद्ध आहे, याची जाणीव होते. जगात अनेक संस्कृती खूप मोठ्या झाल्या आणि त्या लयालाही गेल्या; पण भारतीय संस्कृती सक्षमपणे टिकून आहे. कारण भारतीय संस्कृतीला ज्ञानाचे अधिष्ठान आहे. ही संस्कृतीत भगवतगीता, ब्रह्मसूत्र आणि उपनिषदे यावर आधारलेली आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत ही प्रस्थानत्रयी मानली जाते. यात संतांच्या अभंगांच्या विचारांचा प्रभाव समाजावर आहे. पंढरीच्या वारीलाही ज्ञानाचे अधिष्ठान आहे. वारकरी तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या अभंगांतील विचारांचे थेट अनुकरण करताना दिसतात. त्यामुळेच वारी म्हणजे भक्ती आणि ज्ञानाचा संगम आहे. 

गेल्या काही वर्षांमध्ये जगात विज्ञानाचा प्रभाव वाढल्याने आध्यात्मिक श्रद्धा कमीकमी होत चालली आहे. मात्र, भारतात, प्रामुख्याने महाराष्ट्रात विज्ञानाइतकीच आध्यात्मिक श्रद्धाही टिकून आहे. त्यामुळेच पंढरीच्या वारीत मोठ्या संख्येने सहभागी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि वैज्ञानिक सहभागी होताना दिसतात. आत्मिक ज्ञानाची अनुभूती घेतात. विज्ञानाला आध्यात्म पूरक आहे. हे दोन्ही एकत्र नांदत असल्याने येथील संस्कृती अधिक बळकट आहे. पंढरीच्या विठ्ठलाकडे मी ज्ञानाचे प्रतीक म्हणून पाहतो. संतांच्या अभंगांमध्येही मला विठ्ठल भावतो. ईश्वरीय ज्ञानाचे रूप म्हणजेच विठ्ठल. विज्ञान हे प्रापंचिक म्हणजे सृष्टीचे ज्ञान करून देते. स्वचे किंवा आत्मिक ज्ञान आध्यात्मातून मिळते. त्यामुळे विज्ञानातून सृष्टीचे आणि आध्यात्मातून स्वचे ज्ञान होणे म्हणजेच पूर्ण ज्ञान होय. याचा संगम वारीत पाहायला मिळतो. संतविचाराचे अनुकरण म्हणजे पूर्ण ज्ञान आहे. म्हणूनच वारी म्हणजे पूर्ण ज्ञानाची अखंडपणे वाहणारी गंगा आहे. विठ्ठल हा ज्ञानाचा महासागर आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Wari 2017