आनंदाची अनुभूती हाच विठ्ठल 

(शब्दांकन - शंकर टेमघरे) 
Wednesday, 28 June 2017

दिग्विजय सिंह, ज्येष्ठ राजकीय नेते 
विठ्ठलावर नितांत श्रद्धा जडली आहे. जेव्हा मी वारकऱ्यांकडे पाहतो तेव्हा त्यांच्यातील विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव दिसून येतो. त्यांच्यातील श्रद्धेला मोल नाही. मी राजकीय क्षेत्रात काम करतो. पण राजकारण आणि आपल्या दैवतावरील श्रद्धा या दोन गोष्टी भिन्न मानतो. 

दिग्विजय सिंह, ज्येष्ठ राजकीय नेते 
विठ्ठलावर नितांत श्रद्धा जडली आहे. जेव्हा मी वारकऱ्यांकडे पाहतो तेव्हा त्यांच्यातील विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव दिसून येतो. त्यांच्यातील श्रद्धेला मोल नाही. मी राजकीय क्षेत्रात काम करतो. पण राजकारण आणि आपल्या दैवतावरील श्रद्धा या दोन गोष्टी भिन्न मानतो. 

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला फार मोठी परंपरा आहे. लाखो भाविक विठ्ठलावर असलेल्या श्रद्धेपोटी शेकडो किलोमीटर चालत दर्शनाला येतात. एवढ्या मोठ्या संख्येने भाविक एकत्र राहतात. हरिनामाचा गजर करतात. देशभरात अनेक ठिकाणी निरनिराळे सोहळे मी पाहिले आहेत, मात्र अशा स्वरूपाचा शिस्तप्रिय आणि केवळ विठ्ठलाच्या श्रद्धेवर चाललेला सोहळा एकमेव असेल. 

मला या सोहळ्याबद्दल काहीच माहिती नव्हती. मात्र, माजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा हे पंढरपूरला येऊन गेले होते. त्या वेळी त्यांनी मला पंढरपूरला जाण्याची प्रेरणा दिली. त्यानंतर मी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी बोललो. त्यांनी सोहळा पाहायचा असेल, तर आषाढी वारीच्या सोहळ्याला यावे, असे सांगितले. 1992 मध्ये मी पहिल्यांदा आषाढी वारीच्या महापूजेला आलो. तेव्हा एवढी गर्दी पाहून थक्क झालो. मात्र, ज्या वेळी त्यांच्यातील शिस्त पाहिली तेव्हा अवाक्‌च झालो. सर्व जातिधर्माचे लोक एकत्र येऊन एकत्र चालतात, राहतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. सर्वधर्मसमभावाचे वारी हे आदर्श प्रतीक आहे. संतांच्या संगतीत चालताना नामस्मरण हेच बळ त्यांच्याकडे असते. त्यातून ते आनंदाची अनुभूती घेतात. 

महाराष्ट्राच्या अनेक मुख्यमंत्र्यांसमवेत महापूजा करण्याची संधी मला खूप वर्षांपासून मिळते आहे, हे माझे भाग्य आहे. महापूजा करताना मिळणारा आनंद शब्दांत नाही सांगता येत. या पूजेनंतर विठ्ठलाचे दर्शन घेऊन त्याचा आशीर्वाद घेतला की, मन प्रसन्न होते. तेव्हापासून दरवर्षी न चुकता आषाढी एकादशीच्या पूजेला नित्यनेमाने येतो. त्यातून मिळणारे समाधान खूप काही देऊन जाते. विठ्ठलाकडे पुन्हा पुन्हा येण्याची इच्छा होते. विठ्ठलावर नितांत श्रद्धा जडली आहे. राजकारणात आपल्या कामावरील श्रद्धेला महत्त्व देतो, तो सांसारिक जीवनातील आनंद आहे. मात्र, आराध्य दैवतावरील श्रद्धेने आत्मिक सुख, समाधान मिळते. मला प्रभावित करणाऱ्या तसेच आनंद देणाऱ्या ठिकाणांत पंढरपूरच्या विठ्ठलाचे स्थान आहे. त्यामुळे न चुकता आषाढी वारीला येतो. आषाढी वारीला येऊन जो आनंद मिळतो, तोच विठ्ठल आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Wari 2017 Digvijay Singh