प्लॅस्टिकमुक्तीचे वारीत बीजारोपण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

नातेपुते - विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला निघालेल्या आषाढी वारीत ब्रुक बॉन्ड रेड लेबल, सकाळ आणि चोपदार फाउंडेशनने पर्यावरण रक्षणाचा संदेश लाखो भाविकांना बुधवारी नातेपुते येथे दिला. मातीत विघटन होणाऱ्या चहाच्या कपाचे वितरण तसेच त्यात तुळशीचे बीजारोपण करण्यात आले आहे. 

नातेपुते - विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीला निघालेल्या आषाढी वारीत ब्रुक बॉन्ड रेड लेबल, सकाळ आणि चोपदार फाउंडेशनने पर्यावरण रक्षणाचा संदेश लाखो भाविकांना बुधवारी नातेपुते येथे दिला. मातीत विघटन होणाऱ्या चहाच्या कपाचे वितरण तसेच त्यात तुळशीचे बीजारोपण करण्यात आले आहे. 

तीन वर्षांपासून चोपदार फाउंडेशन, सकाळ सोशल फाउंडेशन आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वारीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दिंड्यांना डिस्पोजल बॅग देऊन परिसरात साठणारा कचरा त्या पिशवीत टाकण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. गतवर्षी पालखी मार्गावरील गावांना स्वच्छता करणे सोयीचे झाले. त्याचाच पुढचा भाग म्हणून ब्रुक बॉन्ड रेड लेबल या चहाच्या कंपनीने त्यात भर घातली. वारीत लाखो प्लॅस्टिकच्या कपाचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. मातीत विघटन होणाऱ्या कपांची निर्मिती केली. कपाद्वारे वृक्षारोपण व्हावे, म्हणून कागदाच्या लगद्यात तुळशीचे बी टाकून कागदी कपांची निर्मिती केली, यंदाच्या वारीत प्रायोगिक तत्त्वावर हा कपवाटपाचा उपक्रम नातेपुते आणि भंडीशेगावमध्ये राबविण्याचा निर्णय झाला.

बुधवारी नातेपुते येथे या उपक्रमाचे उद्‌घाटन चोपदार फाउंडेशनचे अध्यक्ष रामभाऊ चोपदार, राजाभाऊ चोपदार, नातेपुतेचे सरपंच भानुदास राऊत, बाबाराजे देशमुख, शरद मोरे, ‘सकाळ’चे विपणन व्यवस्थापक किरण पाटील, शंकर टेमघरे, ॲड. विलास काटे, सुनील राऊत आदी उपस्थित होते. राजाभाऊ चोपदार म्हणाले, वारी मार्गावर रुंदीकरणामुळे वृक्षतोड करावी लागली आहे. पर्यावरण करण्याबरोबर ते टिकविण्यासाठी स्थानिकांनी जबाबदारी घेऊन या वृक्षांची जोपासणा करावी. प्लॅस्टिक प्रदूषण कमी होणे काळाची गरज आहे. रामभाऊ चोपदार म्हणाले, ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या बरोबरीने चोपदार फाउंडेशनने स्वच्छता अभियान सुरू केले. यंदा ब्रुक बॉन्ड रेड लेबलने दाखविलेल्या पुढाकारामुळे चहाच्या कपाचे प्रदूषण कमी करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. आगामी काळात तो आणखी प्रभावीपणे राबविण्यात येईल. नातेपुतेतील उपक्रमाचे संयोजन विवेक राऊत, प्रवीण ठुबे, अर्जुन लांडे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Wari 2017 Flowering seedlings