समाजप्रबोधन हाच विठ्ठल 

समाजप्रबोधन हाच विठ्ठल 

गेल्या तीन वर्षांपासून आम्ही वारीत सहभागी होत आहोत. "नवसे कन्या पुत्र होती, तर का करणे लागे पती', म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांच्या विचारांचा वसाच आम्ही आमच्या परीने पुढे नेऊ इच्छितो. एकदाही विठ्ठलाच्या दर्शनाला न जाता, प्रत्येक वेळी चंद्रभागेचा किनारा साफ करणाऱ्यांमध्ये आणि भाऊराव पाटील यांच्यामध्ये देव बघा, असे सांगणाऱ्या गाडगेबाबांचा संदर्भ डॉ. नरेंद्र दाभोलकर कायम आपल्या भाषणात देत, तोच विचार आम्ही पुढे नेऊ इच्छितो. 

सातशे वर्षांपूर्वी नामदेव महाराजांनी प्रत्येक माणसाला एक मूल्य आहे, असे सांगून जो वारकरी परंपरेचा प्रसार केला, त्यामध्ये भारतीय राज्य घटनेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे बीजारोपण झाले आहे, असे मी मानतो. भारतातील बुद्धिवादी परंपरेवर युरोपातील प्रबोधन पर्वाचा मोठा प्रभाव राहिला आहे. मात्र, आपल्या मातीतील सकस मूल्याधिष्ठित प्रबोधनाची जी परंपरा आहे, तिच्याशी आपली नाळ घट्ट करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. 

"कांदा मुळा भाजी, 
अवघी विठाई माझी,' 

असे म्हणणारे सावता माळी हे ईश्‍वरकेंद्री धर्म, मानवकेंद्री करण्याचा जो विचार मांडतात, त्याचा पुरस्कार करण्याचा हा प्रयत्न आहे. साधकबाधक चर्चेनंतर अनेक वारकरी प्रमुखांनी जादूटोणाविरोधी कायद्याला पाठिंबा दिला. या कायद्याने वारीतील काही परंपरांना बाधा येणार, हा धादांत खोटा प्रचार होता, आता हे सिद्ध झाले आहे. या कायद्याचा प्रचार- प्रसार वारीमध्ये करणे आणि वारकऱ्यांनी तो स्वीकारणे, ही वारकऱ्यांच्या मोठेपणाची साक्ष वाटते. व्यसनमुक्ती, जाती निर्मूलन आणि मनाच्या आरोग्याचे संवर्धन, पर्यावरण रक्षण अशा वारकऱ्यांना जवळच्या असणाऱ्या विषयांना धरून मूल्य परिवर्तनाचा कृतिशील संवाद आम्ही या माध्यमातून करतो आहोत. लोकांना राज्य घटनेने दिलेल्या देव आणि धर्म मानण्याच्या स्वातंत्र्याचा आम्ही मनापासून आदर करतो; पण देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली लोकांचे शोषण करणाऱ्या भोंदूबाबांना विरोध करणे, हे कर्तव्य आहे, असे मी मानतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या राज्य घटनेतील मूल्यांबरोबर चिकित्सक मनोभावाची जोपासना करण्यात देवत्व शोधण्याचा हा प्रयत्न आहे. "दुरितांचे तिमिर जावो,' म्हणणाऱ्या ज्ञानेश्‍वर महाराजांच्या विचारांना प्रमाण मानून समाजमनातील द्वेषमूलक प्रवृत्तीशी लढण्याचे बळ मिळविण्याचा हा प्रयत्न आहे. देवाचे सखा, सहकारी हे मानवी मनाला आधार देणारे वारकऱ्यांचे रूप मला सकारात्मक वाटते, परंतु लोक देवाच्या नावाचा आपल्या स्वार्थासाठी वापर करतात. जसे, मी एखाद्या देवाचा अवतार आहे, असे भासवून जर कोणी महिलांचे शोषण करत असेल, तर त्याला प्रखर विरोध करणे, हे मी आपले सर्वांचे कर्तव्य समजतो. या विचारांत मला विठ्ठलाचे रूप दिसते. 

जे का रंजले गांजले, 
त्यासी म्हणे जो अपुले 
तोच साधू ओळखावा, 
देव तेथेची जाणावा 

या तुकारामांच्या अभंगातील भाव आणि देव मला जवळचे वाटतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com