वारकऱ्यांच्या आनंदातच विठ्ठल! 

(शब्दांकन - शंकर टेमघरे) 
Saturday, 24 June 2017

तुकाराम मुंढे, अध्यक्ष पीएमपीएल 

तुकाराम मुंढे, अध्यक्ष पीएमपीएल 
सोलापूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून, पंढरपूर देवस्थानचा प्रमुख म्हणून काम करीत असताना पंढरपूरमधील चार वाऱ्यांची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे पंढरपूरचा विकास पारंपरिक पद्धतीने न करता त्याला व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाहिले. वारकऱ्यांच्या दृष्टीने पंढरी हा स्वर्ग आहे. मात्र, पंढरपूरमधील अवस्था इतकी वाईट होती, की तो अक्षरशः नरक वाटावा. मी जबाबदारी स्वीकारल्यानंतर पंढरीच्या विकासाचा ध्यास घेतला. येथे आलेल्या वारकऱ्यांना निरनिराळ्या सेवा-सुविधा देण्याचे नियोजन केले. त्यासाठी अनेक कटू निर्णय घ्यावे लागले. वारकरी केंद्रबिंदू मानून काम करीत राहिलो. पंढरपूरमध्ये होणारी अस्वच्छता हा सर्वांत गंभीर प्रश्‍न होता. अपेक्षित सुविधा नसल्याने लोक उघड्यावर शौचाला बसत होते. त्यामुळे शहरात होणारी गर्दी कमी करण्यासाठी, तसेच वारकऱ्यांना नियोजनबद्ध सेवा-सुविधा देण्यासाठी शासनाच्या 65 एकर परिसरात विकास केला, तेथे वारकऱ्यांना सर्व सेवा-सुविधा देण्यात आल्या. नव्वद दिवसांत बंधारा बांधून वर्षभर पाणी उपलब्ध करून दिले. पिण्याचे पाणी, शौचालये, राहण्यासाठी स्वच्छ जागेची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली, त्यामुळे वारकऱ्यांची सोय झाली. त्यातून आजारपण कमी झाले. पंढरीत चंद्रभागेचे स्नान पवित्र मानले जाते. त्या चंद्रभागेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. चंद्रभागा नदी आणि तिचा घाट स्वच्छ ठेवला. 

पंढरपूरमध्ये स्पर्श आणि मुखदर्शन असे दोन प्रकार आहेत. तसेच, एकादशीला कळसदर्शन घेतात. वारीच्या काळात दर्शनबारीतून येणाऱ्या वारकऱ्याला चाळीस- चाळीस तास लागायचे. दर्शनबारीत काही सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होत होती. दर्शनबारीत अनेकदा होणाऱ्या घसखोरीमुळे चेंगराचेगरीचे प्रसंग उद्‌भवत होते, त्यामुळे दर्शनबारी सुसज्ज केली. दर्शनबारीत चहा- पाण्याची व्यवस्था केली. रांगेत उभे राहून वारकऱ्यांना दर्शनाचा आनंद घेता यावा, हा त्यामागील उद्देश होता. आषाढी एकादशीला महापूजेला चार तास लागायचे. त्या वेळी रांगेत अनेक तास उभा असणारा वारकरी मला दिसत होता. या महापूजेचा वेळ मी दोन तासांनी कमी केला. पायी चालत विठ्ठलाच्या चरणांवर आपली वारी रुजू करण्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यापेक्षा येथे कोणी "व्हीआयपी' नाही, त्यामुळे "व्हीआयपी' दर्शन बंद केले, त्यामुळे वेळ वाचला. रांगेत उभ्या राहिलेल्या वारकऱ्यांना दोन तास लवकर दर्शन होऊ शकले. त्या वेळी विठ्ठलाच्या पूजेपेक्षा वारकऱ्यांचा त्रास कमी करण्यात मला अधिक आनंद मिळाला. आध्यात्मिक नगरीबरोबर पंढरपूरला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा माझा विचार होता. पंढरपूरमध्ये आल्यानंतर वारकऱ्याला जे आध्यात्मिक समाधान मिळायला हवे होते, तसे पोषक वातावरण तयार करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला, त्यादृष्टीने विकासाचा विचार केला. 

आई तसेच अनेक नातलग वारकरी आहेत, त्यामुळे पंढरपूरबद्दल कायम ओढ होती, आत्मीयता होती. त्यामुळे देवस्थानचा प्रमुख म्हणून काम करताना पायी वारी करीत येणाऱ्या विठ्ठलाच्या वारकऱ्यांना निरनिराळ्या पद्धतीने सेवा-सुविधा देण्याचा प्रयत्न केला. त्यात चंद्रभागेची स्वच्छता, सुसज्ज दर्शनबारी अथवा 65 एकरांचा तळ विकसित करणे असो, त्यातून वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या आनंदात मी विठ्ठल पाहिला. त्यांची सेवा करण्यात मला विठ्ठलदर्शनाचे आत्मिक समाधान लाभले. त्यांच्या रूपात विठ्ठल पाहिला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Wari 2017 tukaram mundhe