वैश्‍विक मानवतेचे विठ्ठलामध्ये दर्शन 

वैश्‍विक मानवतेचे विठ्ठलामध्ये दर्शन 

माझी आई शेडगे दिंडी क्रमांक चारमध्ये अनेक वर्षे पायी जात होती. घरात कितीही काम असले, तरी तिने कधी काकड आरती चुकविली नाही. घरात वडील दररोज हरिपाठ मोठ्याने म्हणायचे, त्यामुळे दररोजची सकाळ विठ्ठलाच्या नामस्मरणाने सुरू व्हायची. मामासाहेब दांडेकर, देहूकर यांची अनेक कीर्तने शालेय जीवनापासून मी ऐकत आलो, त्यामुळे आपोआप संप्रदायाचे संस्कार मनावर झाले. मग देहू, आळंदी, पंढरपूरला जायला लागलो. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या समितीवर मला चौदा वर्षे सदस्य म्हणून कार्याची संधी मिळाली. विकास परिषदेत काम केले. वारकरी संप्रदायाच्या विचारांमुळे माझ्या विचारांत प्रगल्भता आली. विचार व्यापक आणि उदारमतवादी बनले. 

महाराष्ट्रातील भागवत संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रचला. संत नामदेव महाराज, गोरा कुंभार, सावता माळी, चोखा मेळा, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांच्यासह सर्व संतांच्या मांदियाळीने सर्वसमावेशक विचार मांडले. त्याने सर्व धर्म-पंथांतील लोक एकवटले. इतकेच नाही, या तत्त्वज्ञानामुळे जनाबाईंसारखी दासीसुद्धा संत होऊ शकली. संत चोखाबारायांची समाधी तेराव्या शतकात संत नामदेवरायांनी विठ्ठल मंदिरासमोर स्थापली. या संतांनी आपल्या अभंगांतून वैश्विकता, समता, बंधुतेची शिकवण समाजाला दिली. उदात्त मानवता आणि समानतेची बीजे त्या वेळी रोवली गेली. त्यामुळे मी राजकारण करीत असतानाही समाजकारणाचा भाग अधिक होता. महात्मा गांधीजींनी दिलेल्या नैतिकतेच्या शिकवणीचा पगडा माझ्या मनावर होता. त्यांनी सर्व समाज एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला. मानवता, समता आणि अध्यात्माचे संस्कार समाजावर घडविले. अध्यात्म म्हणजे नैतिकता असे गांधींजींना अपेक्षित होते. नैतिकता हाच भागवत संप्रदायाचा पाया आहे. वारकरी संप्रदायाच्या संस्कार, विचारांचा माझ्या जीवनावर प्रभाव राहिला. त्याचा राजकीय क्षेत्रात काम करताना निश्‍चित फायदा झाला. नैतिकतेने वागताना बंधुता, समानतेचा धागा सोडला नाही, हे त्याच विचारांचे बळ आहे. 

विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे तसेच मानवतेचे विद्यापीठ आहे. ते सर्व जाती-धर्मांच्या तत्त्वज्ञानाचे सार आहे. पंढरपूरमध्ये चंद्रभागेत स्नान केल्यानंतर मंदिरासमोर पहिली समाधी चोखोबारायांची आहे, त्यानंतर संत नामदेव महाराज, नंतर कान्होपात्रांची मग विठ्ठलदर्शन होते. वैश्विक मानवतेचे दर्शन विठ्ठलात घडते. आषाढी वारीत मला ते तत्त्व क्षणोक्षणी दिसते. माणसामाणसांत जाणवते. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. संत तुकाराम महाराज यांनी तर माणसासह कोणत्याही जिवाचा मत्सर घडू नये, असे तत्त्वज्ञान मांडले. सर्वच संतांनी विश्वाच्या कल्याणाचा विचार केला. जगातील सर्व प्रश्नांची उकल विठ्ठलाच्या पायी आहे, संतांच्या विचारात आहे, अशी माझी भावना आहे. त्याच विचारांचा प्रभाव माझ्या जीवनावर कायम राहिला, त्यामुळे जीवनात सुख आणि दुःख समानतेने बघण्याची दृष्टी मला लाभली. समानतेने, बंधुतेने आणि विश्वात्मक भावाने जीवन जगणे हेच खरे विठ्ठलतत्त्व आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com