विठ्ठलनाम म्हणजेच नादब्रह्माची अनुभूती

(शब्दांकन - शंकर टेमघरे)
Friday, 23 June 2017

विठ्ठल या शब्दात ‘ठ’ ला ‘ठ’ असल्याने विशिष्ट प्रकारचा नादब्रह्म तयार होतो. त्यातून सकारात्मक ऊर्जा तयार होते. विठ्ठल नामात शरीर आणि मन जोडले जातात. मी चौथीला असताना आजीबरोबर पंढरीला गेलो होतो. विशेष पोलिस महानिरीक्षक झालो तेव्हा अतिशय बंदोबस्तात विठ्ठलाचे दर्शन घेतले. सुरक्षा व्यवस्थेत खूप वेळ विठ्ठलासमोर उभा होतो; पण लहानपणी आजीसोबत चंद्रभागेचे स्नान करून दोन दिवस विठ्ठल दर्शनाला रांगेत उभे राहून घेतलेले काही सेकंदांचे दर्शन अधिक भावले. त्या वेळी झालेला त्रास काही सेकंदांत संपून गेला. त्या वेळी आमची बॅग हरवली होती. त्यामुळे तीन दिवस सोबतच्या वारकऱ्यांनी आम्हाला सांभाळले.

विठ्ठल या शब्दात ‘ठ’ ला ‘ठ’ असल्याने विशिष्ट प्रकारचा नादब्रह्म तयार होतो. त्यातून सकारात्मक ऊर्जा तयार होते. विठ्ठल नामात शरीर आणि मन जोडले जातात. मी चौथीला असताना आजीबरोबर पंढरीला गेलो होतो. विशेष पोलिस महानिरीक्षक झालो तेव्हा अतिशय बंदोबस्तात विठ्ठलाचे दर्शन घेतले. सुरक्षा व्यवस्थेत खूप वेळ विठ्ठलासमोर उभा होतो; पण लहानपणी आजीसोबत चंद्रभागेचे स्नान करून दोन दिवस विठ्ठल दर्शनाला रांगेत उभे राहून घेतलेले काही सेकंदांचे दर्शन अधिक भावले. त्या वेळी झालेला त्रास काही सेकंदांत संपून गेला. त्या वेळी आमची बॅग हरवली होती. त्यामुळे तीन दिवस सोबतच्या वारकऱ्यांनी आम्हाला सांभाळले. तेव्हापासूनच वारकऱ्यांबाबत कमालीची आत्मीयता मला वाटत आहे.  

वारीचा सोहळा सर्व धर्मसमभावाचा आहे. निरनिराळ्या संतांनी दिलेल्या शिकवणीतून हा संप्रदाय समर्थपणे उभा आहे. सर्व गोष्टींत विठ्ठल पाहता येतो. विठ्ठल दर्शन हे मुक्तीचे द्वार आहे. विठ्ठलाची मूर्ती जरी दिसत असली तरी प्रत्येकातील विठ्ठल प्रत्येकाने शोधला पाहिजे. विठ्ठलाचे नामस्मरण करताना वृत्ती बदलते. विठ्ठल नाम घेताना आपोआप आपल्यातील काम, क्रोध, लोभ, मत्सर हे षड्रिपु लोप पावतात. विठ्ठल नामाने दुजाभाव तिरस्कार, असुया लोप पावते. 

पोलिस अधीक्षक असताना शंभर किलोमीटर पायी वारी केली. यंदाही वारीच्या आधी जिथे जिथे पालखीचा विसावा आहे, तेथील बंदोबस्त करण्यासाठी मी सायकलवर वारी करीत आहे. वारकऱ्यांच्या सेवेच्या माध्यमातून विठ्ठलाची सेवा करीत आहे. सासवड ते जेजुरी दरम्यान वीस मुले माझ्यासमवेत होती. जेजुरीत आलो तेव्हा ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या गजराने नादब्रह्माची अनुभूती घेतली. नीरा येथे अपघात झाला होता. त्या वेळी रिफ्लेक्‍टर लावायच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. काही वर्षांपूर्वी लोणंदला पालखीचे आगमन आणि ईद एकाच दिवशी होती. त्या वेळी मुस्लिम बांधवांनी ईद पुढच्या दिवशी घेतली. यातच भारतीय संस्कृती अनुभवायला मिळाली. संत ज्ञानेश्‍वरांनी विश्‍वासाठी पसायदान मागितले. माउलींनी स्वतःसाठी काही मागितले नाही. जगासाठी पसायदान लिहिले. त्यांनी म्हटले की, 

दुरितांचे तिमीर जावो
विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो 
जो जे वांचिल तो ते लाहो
प्राणिजात 

मनातील वाईट प्रवृत्तींचा नाश करून त्याच्यात सद्‌गुण निर्माण व्हावे, असे मागणे माउलींनी मागितले आहे. ‘ज्याला जे पाहिजे, ते मिळू दे’, असेही त्यांनी पसायदानात मागितले. वारीतील वारकरी या साऱ्या विचारांचा पाईक असल्याचा अनुभव देतो. माउलींचे विचार वारीतील वारकऱ्यांमध्ये प्रत्ययाला येतात. वारकऱ्यांमध्येच विठ्ठल पाहतो. इतर बंदोबस्तांपेक्षा वारीच्या बंदोबस्तासाठीचे कष्ट अधिक आनंददायी वाटतात. त्यातून जीवनाचे सार उमगते. म्हणूनच विठ्ठल दुसरे कोठे नसून प्रत्येकात आहे, हेच खरे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pandharpur Wari 2017 vishwas nangare patil