उद्योनगरीत वैष्णवांचा मेळा; संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात स्वागत

उद्योनगरीत वैष्णवांचा मेळा
उद्योनगरीत वैष्णवांचा मेळा

पिंपरी - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी (ता. 17) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पिंपरी- चिंचवड शहरात आगमन झाले. शहरवासीयांनी निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उत्साही वातावरणात स्वागत केले. टाळ-मृदंगांचा गजर आणि मुखाने "ज्ञानोबा- तुकाराम'चा अखंड नामघोष सुरू होता.

संत तुकाराम महाराज पालखी शहरात दाखल होणार असल्याने सकाळपासूनच भक्ती-शक्ती उद्यान चौकात भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पालखीचे आगमन झाल्यानंतर अवघे वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. खांद्यावर भगव्या पताका, डोक्‍यावर तुळशी वृंदावन आणि मुखाने विठुनाम घेत निघालेल्या वारकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. महापालिकेतर्फे निगडीत स्वागत कक्ष उभारला होता. आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, मनसेचे गटनेते सचिन चिखले,  नगरसेविका सुमन पवळे यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवकांनी पालखीचे स्वागत केले. महापालिकेतर्फे दिंडीप्रमुखांना ताडपत्री भेट देण्यात आली. महापालिकेच्या स्वागत कक्षासमोर रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. पालखी आगमनापूर्वी महापौर काळजे आणि नगरसेवक विलास मडिगेरी यांनी फुगड्यांचा फेर धरला. स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेविका आशा शेंडगे यांच्यासह नगरसेविकांनी फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला.

नवनगर विकास प्राधिकरणातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पालखीचे स्वागत केले. पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. आकुर्डीतील विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात पालखीचा मुक्काम होता. रविवारी (ता. 18) पहाटे पाच वाजता पालखी पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.

दृष्टिहीनांची दिंडी
प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाइंड संस्थेची संत सूरदास ई-दिंडी पालखीसोबत सहभागी झाली होती. त्यात सहभागी वारकऱ्यांनी नेत्रदानाविषयी जनजागृती करणारे फलक हातात घेतले होते.

बालवारकरी अन्‌ ज्येष्ठांचा उत्साह
पालखीसमवेत बालवारकरी आणि ज्येष्ठांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. खांद्यावर भगव्या पताका घेऊन ज्येष्ठ वारकरी नामघोषात भान हरपून नाचत होते. महिला वारकऱ्यांनी फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले बालवारकरी लक्ष वेधून घेत होते.

पर्यावरण संवर्धनकडून जनजागृती
पर्यावरणसंवर्धन समितीकडून पर्यावरणविषयक जनजागृती करण्यात आली. समितीचे कार्यकर्ते पर्यावरण जागृतीपर फलक हातात घेऊन उभे होते.

मोदी यांचीही भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी निगडी येथे पालखी सोहळ्याला भेट दिली. महापौर नितीन काळजे यांनी त्यांचा सत्कार केला.

संत तुकाराम महाराज पालखी क्षणचित्रे :

  • दुपारपासून ढगाळ वातावरण; मात्र पावसाने दिली हुलकावणी
  • शहरात पालखीचे आगमन झाल्यानंतर दर्शनासाठी उसळला जनसागर
  • भक्ती-शक्ती उद्यान परिसरात वारकऱ्यांनी घेतला काही क्षणांसाठी विसावा
  • महापालिका पदाधिकारी, वारकरी महिलांनी धरला फुगड्यांचा फेर
  • यंदा प्रथमच महापालिका पदाधिकाऱ्यांनी केले नाही पालखी रथाचे सारथ्य
  • आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही केले मोबाईल कॅमेऱ्यात पालखीचे चित्रीकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com