गावोगावच्या भाविकांना संतांच्या आनंदसोहळ्याचे वेध

शंकर टेमघरे
Thursday, 15 June 2017

पुणे - पंढरीची वारी हा अवघ्या महाराष्ट्राचा आनंदसोहळा. कोणत्याही आमंत्रणाशिवाय इथे महाराष्ट्र एकवटतो आणि संतांच्या संगतीत भक्तिसुखाचा आनंद उपभोगतो. विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या या संत मांदियाळीची सेवा करण्याची संधी पालखी मार्गावरील गावांमधील भाविकही सोडत नाहीत. "साधू संत येती घरा। तोचि दिवाळी दसरा।। या भावनेतून गावे महिनाभर अगोदरच स्वागताच्या तयारीला लागतात. यंदाचे चित्रही यापेक्षा वेगळे नाही. मात्र यंदा पावसाच्या वेळेत होत असलेले आगमन हा यंदाच्या वारीच्या उत्साहाचा मानबिंदू आहे. त्यामुळे वरुणराजासमवेत संतांच्या आनंदसोहळ्याच्या वाटेकडे गावोगावच्या भाविकांचे लक्ष लागले आहे.

देहूतून तुकोबारायांचा पालखी सोहळा 16 जून रोजी; तर ज्ञानेश्वर महाराजांचा सोहळा 17 जून रोजी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होईल. या दोन्हीही गावांमधील प्रशासन यंत्रणा काही दिवसांपासून जय्यत तयारीला लागली आहे. देहू ग्रामपंचायत, आळंदी नगरपालिका तसेच दोन्हीही संस्थानच्या वतीने प्रस्थान सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना सेवा- सुविधा देण्यासाठी झटत आहेत. येथील विविध कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पावसाचे वेळेत आगमन झाल्याने पेरण्या उरकून राज्यातील वारकरी मोठ्या संख्येने वारीत सहभागी होण्याची शक्‍यता आहे. पुण्यात दोन्हीही पालख्यांचे आगमन एकाच दिवशी होते. त्यामुळे महापालिकेला स्वतंत्र नियोजन करावे लागते. नियोजनाच्या बैठकांमध्ये अधिकारी व्यस्त आहेत. वाकडेवाडी आणि हडपसर येथे सुरू असलेल्या कामांमुळे तेथील राडारोडा काढून अधिकाधिक प्रशस्त रस्ता वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी तयारी सुरू आहे.

सासवड, जेजुरीत पालिका सज्ज
सासवडकडे जाताना वारकऱ्याच्या निष्ठेची परीक्षा घेणारा दिवेघाट यंदा पावसामुळे हिरवी शाल पांघरू लागला आहे. पालखी येईपर्यंत घाटाचे रूप अधिक लोभस होईल. सासवड नगरीत माउलींचा सोहळा दोन दिवस मुक्कामी असतो. त्यादृष्टीने तेथील नियोजन सुरू आहे. येथील तळ नगरपालिकेने चांगल्या प्रकारे विकसित केल्याने तेथे फक्त पाणी आणि स्वच्छतेच्या व्यवस्था लावण्यात नगरपालिका प्रशासन भर देत आहे. जेजुरीतील तळ कमी पडू लागल्याने, आता गावाबाहेरील खासगी जागेत पालखी थांबते. मात्र यंदाच्या मुक्कामाचा प्रश्न सुटला असला तरी आगामी काळात जेजुरीतील तळासाठी कायमस्वरूपी जागा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. दरवर्षीप्रमाणे वाल्हेकरांनी पालखीच्या स्वागताची तयारी सुरू केली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे मोठे आव्हान ग्रामस्थांसमोर आहे. मात्र सारे माउली करून घेतील, या भावनेतून यंत्रणा कामाला लागली आहे. टॅंकरने पाणी वितरित करण्यासाठी ग्रामपंचायत यंत्रणेला कसरत करावी लागते. आगामी काळात पालखी तळाच्या भागात स्वतंत्र पाणी योजना राबविणे गरजेचे आहे.

फलटणला एकच मुक्काम
सातारा जिल्ह्यातील पहिलाच मुक्काम असलेल्या लोणंद येथे मोठ्या उत्साहाने लोणंदकर माउलींचे स्वागत करतात. माउलींची पालखी ही यात्रा समजून ग्रामस्थांचे स्वागताचे नियोजन सुरू आहे. येथील तळाच्या जागेचे सुशोभीकरण तसेच वारकऱ्यांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी लोणंदकर झटत आहेत. तरडगाव हे छोटे असले तरी त्यांच्या माउलींच्या स्वागतासाठी ग्रामस्थ कमी पडत नाहीत. संस्थानिकांच्या नगरीत वारकऱ्यांना कधीच काही कमी पडू दिले जात नाही. प्रशस्त तळ येथील वैशिष्ट्य आहे. यंदा फलटणला एकच मुक्काम असल्याने अधिकाधिक सेवा करण्यासाठी फलटण सज्ज आहेत. बरड येथेही ग्रामपंचायत यंत्रणेकडून जोरदार तयारी सुरू आहे.

नातेपुतेत तळाचा प्रश्‍न प्रलंबित
नातेपुतेमध्ये तळाचा प्रश्न प्रलंबित आहे. आहे तो तळ कमी पडत असल्याने शेजारील जागा समाविष्ट करून घ्यायची, की तळच नव्या जागेत हलवायाचा याचा प्रश्न प्रशासनाला सोडविता आलेला नाही. त्यामुळे यंदा तरी "जैसे थे' स्थिती राहणार आहे. येथील ग्रामस्थही वारकऱ्यांच्या सेवेसाठी अहोरात्र झटतात. माळशिरसमधील तळ संस्थानच्या मालकीचा आहे. मात्र ते हवा तसा विकसित करण्यात देवस्थानला अद्याप यश आलेले नाही. ग्रामस्थ आपापल्या परीने सुविधा देण्याचा प्रयत्न करतात. वेळापूरमध्ये वेगळी स्थिती नाही. येथेदेखील पालखी स्वागताच्या नियोजनाला प्रशासन लागले आहे. भंडीशेगाव आणि वाखरी या मुक्कामाच्या भागात मार्गावर अनेक पालख्या एकदम येतात. सर्व यंत्रणा ठप्प होते. त्यामुळे आगामी काळात या दोन मुक्कामांच्या परिसरात जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला स्वतंत्र नियोजन करावे लागणार आहे. सकल संतांच्या सहवासाने ग्रामस्थांसाठी पर्वणी असली तरी लाखो वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी ते करीत असलेली धावपळ माउलींवरील श्रद्धा अधोरेखित करते.

पुणे जिल्हा
- पुणे-आळंदी दरम्यान काही ठिकाणचा अपवाद वगळता प्रशस्त रस्ता सुखकारक
- दिवे घाटातील निसरड्या दगडांमुळे धोकादायक ठिकाणी तरुणाईला थोपविण्याचे पोलिसांपुढे आव्हान
- जेजुरी एमआयडीसी ते नीरा दरम्यानच्या रस्त्याच्या कडा भरण्याच्या कामाचा दर्जा तपासावा
- टॅंकरद्वारे पाण्याची तहान भागविण्याचे वाल्हेमध्ये आव्हान

सातारा जिल्हा
- लोणंद परिसरात अनेक खासगी जागा मालकांनी कंपाउंड टाकल्याने दिंड्यांना उतरण्यास अडचणी
- तरडगावातील अपूर्ण पूल वारकऱ्यांसाठी गैरसोयीचा
- फलटण- धर्मपुरी दरम्यान रस्त्याच्या कडा भरण्याची गरज

सोलापूर जिल्हा
- काही भागात रस्त्याच्या कडा भरण्याचे काम असमाधानकारक
- नातेपुतेतील तळ अपुरा. वाढीव तळाची वारकऱ्यांची मागणी
- सदाशिवनगर भागात रस्त्यावरील खड्डे भरण्याची गरज
- तोंडले-बोंडले ते पंढरपूर रस्त्याच्या आणखी रुंदीकरणाची मागणी

वाढते नागरीकरणाने तळाचा प्रश्‍न
वारीत वारकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मार्गावरील गावांमधील शहरीकरणही वाढले आहे. खासगी मालक आपल्या जागांमध्ये कंपाउंड टाकत आहेत. त्यामुळे वारीच्या काळात दिंड्यांना गावठाणात जागा मिळणे अवघड होत आहे. तळाच्या जागाही कमी पडत आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे काही दिंड्यांना दरवर्षी जागा बदलावी लागत आहे. दिंड्यांना गावाच्या चार ते पाच किलोमीटर बाहेर उतरावे लागत आहे. पुरंदर तालुक्‍यात विमानतळ प्रस्तावित आहे. या तालुक्‍यात सासवड, जेजुरी, वाल्हे असे तीन मुक्काम आहेत. त्यामुळे आगामी काळात येथेही जागांच्या मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. सरकारला शक्‍य तेवढ्या लवकर निर्णय घेऊन सर्वच वाढीव तळांचा प्रश्न मार्गी लावावा लागणार आहे. हा प्रश्न भविष्यात अधिक गंभीर होणार असल्याने सोहळ्यातील सक्षम दिंड्यांना आवश्‍यक तेथे खासगी जागा खरेदी करण्याची मानसिकता तयार करावी लागणार आहे.

वारीच्या काळात स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य असून, गतवर्षीपेक्षा यंदा शौचालयाच्या युनिटची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. त्याकरिता सेवा सहयोग संस्थेचे सहकार्य घेण्यात आले आहे. गतवर्षी पुणे जिल्ह्यात अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात आला. यंदा सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत सरकारी यंत्रणा तसेच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे स्वच्छतेचे अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यात येईल. रस्ता, पाणी आणि तळावरील आवश्‍यक त्या सुविधा देण्याचे आदेश दिले असून, अधिकारी, ग्रामस्थांकडून जय्यत तयारी सुरू आहे.
- चंद्रकांत दळवी, विभागीय आयुक्त, पुणे

राज्यातील सर्वच पालख्यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्यामुळे सरकारने "आयएएस' दर्जाचा अधिकाऱ्याची सचिव म्हणून नियुक्ती करावी, जेणेकरून केवळ वारीच्या काळापुरतेच नाही तर वर्षभर वारकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पाठपुरावा करता येईल. वारकऱ्यांच्या वाढणाऱ्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर ही काळाची गरज आहे. अन्यथा, वारकऱ्यांच्या समस्यांबाबत केवळ वारीच्या काळातच विचार केला जातो.
- राजाभाऊ चोपदार, चोपदार, ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा

यंदाच्या सोहळ्यात पाऊस राहण्याची शक्‍यता असल्याने, सर्वच तळांची जागा प्रशासनाने भर टाकून भक्कम करून घ्यावी. तसेच रस्त्याच्या साइडपट्ट्या भरून घ्याव्यात जेणेकरून दिंड्यांची वाहने फसणार नाहीत. पाण्याचे टॅंकर मार्गावर उभे करावेत. तसेच पालखी पुढे निघून गेली तरी मागील दिंड्यांना पाण्याची सोय करावी. मार्गावर वाहने फसली तर ती हलविण्यासाठी क्रेनची सोय करावी.
- राजाभाऊ आरफळकर, मालक, ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा

संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम या संतांसह राज्यातील सर्वच संतांच्या पालखीमार्गाचा प्रश्‍न गंभीर बनत चालला असून, त्यासाठी ठोस कार्यवाही करावी लागेल. तसेच पालखी तळाची जागा दिवसेंदिवस कमी पडत आहे. त्यासाठी राज्य सरकार, दिंडी आणि वारकरी यांच्या समन्वयातून आगामी काळात कृती आराखडा तयार करावा लागेल.
- अभय टिळक, सोहळा प्रमुख, संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news palkhi sohala