esakal | आषाढीसाठी यंदा 3500 एसटी गाड्या 
sakal

बोलून बातमी शोधा

आषाढीसाठी यंदा 3500 एसटी गाड्या 

आषाढीसाठी यंदा 3500 एसटी गाड्या 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोलापूर - आषाढी यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून यंदाच्यावर्षी तीन हजार 500 गाड्या उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी दिली. जुलैपासून गाड्यांची वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. 

विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातूनच नव्हे तर कर्नाटक, आंध्र प्रदेश तसेच इतर राज्यांतूनही लाखो भाविक येतात. श्री ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह इतर संतांच्या पालख्यांबरोबर लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होतात. या वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी महामंडळाने या गाड्यांची सोय उपलब्ध करून दिली आहे. तसेच इतर भाविकांना राज्यभरातून पंढरपूरला येण्यासाठी आणि दर्शन घेऊन परत गावी जाण्यासाठी एकूण तीन हजार 500 एसटी गाड्या विविध मार्गांवरून धावणार आहेत. 

पंढरपुरात यंदाच्यावर्षीही पंढरपूर बसस्थानकासह इतर ठिकाणीही राज्यभरातून येणाऱ्या एसटी गाड्या थांबविण्याची सोय उपलब्ध केली जाणार आहे. तसेच त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता आदींसाठीचे नियोजन करण्यात येत आहे. मागीलवर्षी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आषाढी यात्रेसाठी तीन हजार 313 गाड्या विविध मार्गांवरून सोडण्यात आल्या होत्या. यंदा यात वाढ करून साडेतीन हजार गाड्या सोडण्यात येणार आहेत. एक जुलै ते 10 जुलैपर्यंत गाड्यांची ही वाहतूक सुरू राहणार आहे. 

आषाढी यात्रेसाठी यंदाच्यावर्षीही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची तयारी वेगाने सुरू आहे. भाविकांना अधिकाधिक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. 
- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सोलापूर विभाग