तुकोबांच्या पादुकांना ३ वर्षांनंतर नीरा स्नान

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 June 2017

नीरा नरसिंहपूर - संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना तब्बल तीन वर्षांनंतर गुरुवारी नीरा नदीच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. मागील तीन वर्षे दुष्काळामुळे नदीत पाणी नसल्याने टॅंकरच्या पाण्याने पादुकांना स्नान घालण्यात येत होते. नीरा स्नानानंतर पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पुणे जिल्हा प्रशासनाकडून पालखीस भावपूर्ण निरोप दिला. 

नीरा नरसिंहपूर - संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना तब्बल तीन वर्षांनंतर गुरुवारी नीरा नदीच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. मागील तीन वर्षे दुष्काळामुळे नदीत पाणी नसल्याने टॅंकरच्या पाण्याने पादुकांना स्नान घालण्यात येत होते. नीरा स्नानानंतर पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पुणे जिल्हा प्रशासनाकडून पालखीस भावपूर्ण निरोप दिला. 

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी (ता. इंदापूर) येथे होता. गुरुवारी पहाटे चार वाजता काकड आरती झाली. त्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने पादुकांची पूजा करण्यात आली. सकाळी सात वाजता पालखी सोहळाप्रमुख, विश्वस्त मंडळाचे सदस्य व वंशज अभिजित मोरे, सुनील मोरे, जालिंदर मोरे, शांताराम मोरे, सुनील दामोदर मोरे, अशोक निवृत्ती मोरे, अशोक बाळकृष्ण मोरे यांनी परंपरेप्रमाणे पादुकांना नीरा नदीत स्नान घातले. त्यानंतर महापूजा व आरती करण्यात आली. दर्शनासाठी पादुका सराटी येथील जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आल्या होत्या. 

या वेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर, तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूरचे सभापती करणसिंह घोलप, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, पोलिस निरीक्षक सजन हंकारे, पुरवठा निरीक्षक संजय माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, जिल्हा बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, प्रदीप जगदाळे, उपसरपंच विश्वास जगदाळे, अमर जगदाळे आदींनी पालखीचे दर्शन घेऊन सोहळ्याला पुणे जिल्ह्यातून सन्मानपूर्वक निरोप दिला.  त्यानंतर पालखी सोहळा सकाळी आठच्या सुमारास पुणे जिल्ह्यातून नीरा नदीवरील पुलावरून सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे मार्गस्थ झाला. सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार हनुमंत डोळस, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, यांनी स्वागत केले. तत्पूर्वी बुधवारी सायंकाळी सराटी येथील जिल्हा परिषद शाळेत पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. परिसरातील ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.    

‘नीरेत कायमस्वरूपी पाणी हवे’
मागील तीन वर्षांनंतर प्रथमच नीरा नदीतील पाण्याने वारकऱ्यांना स्नान करता आले. गेली तीन वर्षे मात्र टॅंकरच्या पाण्यातून पादुकांना स्नान घालावे लागत होते. वारकऱ्यांचीही गैरसोय होत असे. शासकीय पातळीवर याचा गांभीर्याने विचार करून पादुका स्नानासाठी नीरा नदीत कायमस्वरूपी पाण्याची सोय करावी, अशी मागणी सोहळाप्रमुख व वारकऱ्यांनी केली. नदी परिसरात सर्वत्र रंगीबेरंगी कपडे व साड्यांमुळे नदीला वेगळे स्वरूप प्राप्त झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tukaram Maharaj Palkhi 2017