पांडुरंगाचा धावा अन्‌ पावसाचे स्वागत 

(शब्दाकंन - सचिन शिंदे)
Sunday, 2 July 2017

सोहळ्यात आज 
पालखी सकाळी पिराची कुरोलीहून होणार मार्गस्थ  
भंडीशेगावला दुपारी विसावा
बाजीराव विहीर येथे होणार उभे रिंगण व खेळ
सायंकाळी सोहळा वाखरीत विसावणार

उद्धव तिकडे, परभणी
संत तुकोबांना विठ्ठलाच्या साक्षात्कारातून झालेला धावा, त्या वेळी तुका म्हणे धावा, पंढरी आहे विसाव्याचा अभंग, त्याच्या पुढच्याच वळणावर तुकोबाराय व सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यांची झालेली सहृदय भेट आणि काही मिनिटांनंतर पावसाचा शिडकावा असा सगळाच सोहळा आज मनाला आनंद देऊन गेला. पंढीराच्या समीप आलेल्या वारकऱ्यांच्या स्वागतालाच जणू पावसानेच हजेरी लावली. संत तुकोबाराय पालखी सोहळ्यात आजची वाटचाल उन्हातच सुरू झाली. पालखी सोहळा सकाळी बोरगावहून मार्गस्थ झाला. माझी ही चौथी वारी आहे. तीन वेळा माउलींच्या पालखी सोहळ्यातून वारी केली आहे. तुकाराम महाराजांच्या दिंडीत प्रथमच आलो आहे. परभणी माझे गाव आहे. मी आळंदी येथे शिकत आहे. रथामागील ३८ क्रमांकाच्या दिंडीतून मी चालतो आहे. पालखी सोहळा मार्गस्थ झाला. त्याचा माळखांबी येथे सकाळचा विसावा झाला. तेथे वारकऱ्यांनी न्याहारी आटोपली. पुन्हा सोहळा मार्गस्थ झाला. बोंडलेच्या अलीकडे उतारावर पालखी आली. त्यापूर्वीच सोहळा धाव्यासाठी थांबवण्यात आला होता. धावा होणार त्या जागी मोठी रांगोळी रेखाटली होती. सोहळाप्रमुख व चोपदार पुढे आले. त्यांनी दिंड्या लावल्या. मीही सगळ्यात पुढे होते. धाव्याचा अभंग झाला. तुका म्हणे धावा पंढरी आहे विसावा अभंग झाला अन्‌ वारकरी वाऱ्याच्या वेगाने काही अंतर पंढरीच्या ओढीने धावले त्यात मीही झोकून दिले. त्या आनंदातच बोंडल्याचा चौकापर्यंत आलो. 

बोंडल्याच्या चौकात तुकोबारायांचा सोहळा थांबला होता. मागून सोपानकाकांचा पालखी सोहळा येत होता. बोंडल्याच्या चौकात गुरू बंधू भेट होणार होती. त्यामुळे सारेजण चौकात तो क्षण पाहण्यासाठी थांबले होते. मीही पालखी रथाशेजारीच थांबलो होतो. सोपानकाकांचा पालखी सोहळा आला तो तुकोबारायांच्या शेजारीच थांबला. त्या वेळी भेट झाली. वारकऱ्यांनी टाळ्यांच्या व ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरात त्याचे स्वागत केले. मानाच्या नारळांची देवघेव झाली. त्या वेळीही वारकऱ्यांनी टाळांचा गजर केला. तो सोहळा नयनरम्य झाला व पालखी सोहळा पुढे सरकला. तोंडले व बोंडल्याच्या मध्यावर आल्यावर पावसाची एक सर जोरात आली अन्‌ सोहळ्यास चिंब भिजवून गेली. त्यामुळे सोपानकाका व तुकोबाराय आणि पुढचा सोपानकाका व ज्ञानोबा माउलींच्या भेटीलाच पावसाने हजेरी लावल्याची भावना माझ्या मनात घर करून राहिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tukaram Maharaj Palkhi 2017 parbhani