Wari 2019 : वारी होणार आरोग्यदायी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 June 2019

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी (ता.२४) व संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी (ता. २५) आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. सध्या देवस्थान, नगरपालिका प्रशासन, पोलिस अशा सर्वच पातळ्यांवर तयारीला वेग आला आहे. या तयारीचा आढावा घेणारी वृत्तमालिका...

आळंदी - प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी वारीसाठी आळंदी देवस्थान यंदा पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांना मोफत सेवा देणार आहे. सर्व दिंड्यांना प्रत्येकी एक हजार कागदी पत्रावळी मोफत देणार आहे. पालखी मार्गावरील ग्रामपंचायती आणि पालिकांना वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहन म्हणून रोपांचे वाटप करणार असल्याची माहिती आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त ॲड. विकास ढगे आणि पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई यांनी दिली.

ढगे व देसाई यांनी सांगितले, की माउलींचा पालखी सोहळा मंगळवारी (ता. २५) आळंदीतून पंढरीकडे मार्गस्थ होत आहे. पालखीच्या वाटेवरील शाळा, ग्रामपंचायती आणि पालिकांना देवस्थान हरितवारीअंतर्गत रोपांचे वाटप करणार आहे. ग्रामपंचायतीने रोपांचे जतन चांगल्या प्रकारे केल्यास आर्थिकसाह्यही दिले जाणार आहे. 

‘सोहळ्यात मागील वर्षीपासून प्लॅस्टिकबंदी लागू केली आहे. देवस्थान प्रत्येक दिंडीला एक हजार कागदी पत्रावळी सासवड मुक्कामापासून देणार आहे. जिल्हा आरोग्य विभागामार्फत वारीच्या वाटेवर औषध वाटपासाठी दुचाकीवरून आरोग्यदूत फिरतील. या वेळी आरटीओ तपासणी केलेल्या वाहनांनाच देवस्थानतर्फे पास दिले जातील. मंदिर आणि पालखी मार्गावर जादा पोलिस बंदोबस्त आणि रथावर सीसीटीव्ही यंत्रणा विकसित केली आहे. पालखी प्रस्थानासाठी दर्शनबारीचे काम पूर्ण झाले आहे.

‘वाहने बोपदेव घाटातून न्यावीत’
पालखी पुण्यामार्गे सासवडला जाताना उरुळी देवाची येथे दुपारच्या जेवणाला थांबते. यंदा या दिवशी दशमी असल्याने स्थानिक मंडळांनी नेहमीप्रमाणे अन्नदान करावे. विसाव्याच्या ठिकाणी जागा अपुरी पडत असून, सर्वच दिंड्यांची वाहने एकाच वेळी उभी राहू शकत नाहीत. वाहतूक कोंडी आणि चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी दिंड्यांची वाहने बोपदेव घाटातून सासवडला नेण्याचे आवाहन वारकऱ्यांना केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari 2019 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala wari