esakal | झाली माझी वैखरी विश्‍वभरी व्यापक
sakal

बोलून बातमी शोधा

झाली माझी वैखरी विश्‍वभरी व्यापक

झाली माझी वैखरी विश्‍वभरी व्यापक

sakal_logo
By
डॉ. सदानंद मोरे

‘झाली माझी वैखरी विश्‍वभरी व्यापक’ असे जेव्हा संत तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा त्यात लोकांना एकत्र जोडून घेण्याचा सर्वव्यापी विचारच तर अपेक्षित होता! महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील विचार पाहायचे झाल्यास, आज पंढरपूरच्या वारीत राज्याच्या कानाकोपऱ्यांतून एकत्र येणारे वारकरी पाहून संतांचे विचार प्रत्यक्षात उतरल्याचेच दिसते...

आजच्या काळात प्रचलित झालेल्या ‘सोशल नेटवर्किंग’चा मागोवा थेट महाराष्ट्राच्या संतपरंपरेपर्यंत घ्यायचा झाला, तर काय दिसते? चटकन जाणवणारी एक गोष्ट म्हणजे संतांच्या काळातील नेटवर्किंगमागे आजच्यासारखा कुठल्याही प्रकारचा बाजारू हेतू नव्हता. आज आपल्या आसपास काय दिसते? तर, मानवी नात्यांची, सामाजिक संबंधांची प्रेरणा ही सगळी ‘मार्केट’प्रणीत आहे. संतांच्या बाबतीत मात्र तसे नव्हते. सर्व प्राणिमात्रांचे सर्वार्थाने भले व्हावे, हीच प्रेरणा संतांची होती. 

या ठिकाणी संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा उल्लेख आवर्जून करणे गरजेचे आहे. त्यांनी पहिल्यांदा ‘हे विश्‍वची माझे घर’ ही संकल्पना मांडली. त्यात सर्व सृष्टीची एकत्रित संकल्पना त्यांना अनुस्यूत होती. भांडवलशाहीच्या उदयानंतर मात्र बाजारपेठ याच अर्थाने जगाचे एकत्र येणे प्रामुख्याने अस्तित्वात आल्याचे पाहायला मिळते. या सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे ज्ञानोबा- तुकोबांसारख्या संतांच्या काळात कुठल्याही प्रकारचे तंत्रज्ञान अस्तित्वात नसतानाही त्यांच्या भावना आणि आवाहन दूरदूरच्या लोकांपर्यंत पोचू शकत असे. लोकांना एकत्र आणण्याची संकल्पना त्यांच्या विचारांत सदैव असे. ‘झाली माझी वैखरी विश्‍वभरी व्यापक’ असे जेव्हा संत तुकाराम महाराज म्हणतात, तेव्हा त्यात लोकांना एकत्र जोडून घेण्याचा सर्वव्यापी विचारच तर अपेक्षित होता!

महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील विचार पाहायचे झाल्यास, आज पंढरपूरच्या वारीत राज्याच्या कानाकोपऱ्यांतून एकत्र येणारे लोक पाहून संतांचे विचार आकाराला आलेलेच तर दिसून येतात. संतांना हेच तर अपेक्षित होते. आजच्यासारख्या संप्रेषणाच्या कोणत्याही सुविधा नसताना त्याकाळी हे घडू शकले. या सगळ्याच्या पार्श्‍वभूमीवर भाषिक एकीकरणाचे आणि सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम महाराष्ट्रातील संतांनी केले आहे, हे निःसंशय. 

संत तुकाराम महाराज यांनी वाईट प्रवृत्तीला कधीच थारा दिला नाही. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे। म्हणजेच जे समाजाला त्रासदायक लोक आहेत, त्यांना संत तुकाराम महाराज यांनी कठोर शब्दांत सुनावले. तसेच, लोकांमध्ये जागृती घडवून आणली, त्यांना खऱ्या जीवनाचे सार सांगितले. तसेच सकारात्मक विचारातून ऐक्‍याची भावना निर्माण करण्याचे मोठे कार्य संत तुकाराम महाराज यांनी केले.