महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच विठ्ठल

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
Tuesday, 4 July 2017

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यांचे विचार हीच आपली संस्कृती आहे. संतांच्या संगतीत नामस्मरण करीत लाखो वारकरी वारी येतात आणि आत्मिक सुखाचा आनंद घेतात. महाराष्ट्राची संस्कृती संतांच्या विचारांनी तयार झाली आहे. समाजाबरोबर त्यांनी पर्यावरण तसेच प्राणिमात्राच्या रक्षणाचा संदेश आपल्या अभंगांमधून समाजाला दिला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांनी अभंगांतून पर्यावरणालाच ईश्वराची उपमा दिली. त्यातच विठ्ठल पाहायला शिकवले.

तेच कार्य आजही वारकरी संप्रदाय पुढे नेत आहे. महाराष्ट्र ही देशातील सृजनशक्ती आहे. लाखो वारकऱ्यांच्या रूपाने ती सृजनशक्ती पंढरीकडे वारीच्या रूपाने अखंडपणे वाहताना दिसते. नामस्मरणाबरोबर समाजप्रबोधन हा तिचा प्रवाह राहिला आहे. कीर्तन, प्रवचन, भारुडांच्या रूपाने तिचा आविष्कार वारीत दिसून येतो. प्रबोधन हा महाराष्ट्राचा गुणधर्म आहे. ते कार्य पंढरीच्या वारीतून अव्याहतपणे सुरू आहे.

सरकारच्या वतीनेही वारीत पर्यावरणाची दिंडी आहे. त्या माध्यमातून सरकारचे उपक्रम तसेच व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.

निर्मलवारीचा संकल्प सरकारने केला. वारीच्या काळात मोठ्या प्रमाणात गावोगावी होणारी शौचालये उपलब्ध केल्याने अस्वच्छता कमी होण्यास मदत झाली. तसेच पर्यावरणरक्षणाच्या सरकारच्या दृष्टीचा संदेश गावोगावी पोचविण्याचा प्रयत्न केला. राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सरकार प्रयत्नशील असून, मार्चपर्यंत महाराष्ट्र पूर्ण हागणदारीमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प आहे. पर्यावरणपूरक महाराष्ट्र करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पन्नास कोटी वृक्षलागवडीचे सरकारचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल.

त्याद्वारे संतांनी पर्यावरणरक्षणासाठी दिलेला संदेश सार्थ ठरविणार आहे. राज्यातील जलस्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीने नमामि चंद्रभागा अशी नदी संवर्धन व स्वच्छता मोहीम राबविण्याचा प्रयत्न आहे. या दरम्यानच्या प्रवाहास जोडल्या जाणाऱ्या उपनद्याही स्वच्छ करण्यात येणार आहेत. उपनद्यातील पाणी मैलाशुद्धीकरण करूनच मुख्य नदीला पाणी पुढे सोडले जाणार आहे. महाराष्ट्र स्वच्छतेत देशात अग्रभागी आहेच, याहीपेक्षा अधिक समृद्ध महाराष्ट्र करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. संतांच्या विचारांची भूमी करण्याची तसेच राज्य विकासात, पर्यावरणरक्षणात, नद्या संवर्धनात देशात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच माझा विठ्ठल मी मानतो.
(शब्दांकन - शंकर टेमघरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wari news palkhi sohala devendra fadnavis