वारकऱ्यांच्या खेळांनी मन प्रसन्न

अक्षय चंद्रे, नाशिक
Monday, 3 July 2017

माउली ज्ञानेश्वर महाराज, जगद्‌गुरू तुकोबाराय आणि सोपानकाकांच्या रिंगण सोहळ्यासह वारकऱ्यांच्या विविध खेळांनी आज मन प्रसन्न झाले. संतांचा मेळा पंढरी समीप आल्याने विठुरायाच्या भेटीची ओढ अधिक तीव्र झाली आहे. पिराची कुरोलीतून अवघ्या काही अंतरावर वाखरीत पालखीचा मुक्काम होता; मात्र बाजीराव विहिरीपासून सर्वच संतांच्या पालख्या एकत्र आल्यामुळे सर्वच संतांच्या दर्शनाने मी धन्य झालो. पंढरीचा वारकरी, वारी चुको दे न हरी.... अशी आर्त हाक मनात घालून येणाऱ्या प्रत्येक पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. त्याचवेळी रंगलेल्या रिंगणाचाही आनंद लुटला...

संत तुकोबारायांचा पालखी सोहळा काल पिराची कुरोली येथे विसावला. गावात सोय चांगली होती. रात्री पालखी तळावर भजनाचा आनंद घेतला. माझे मूळगाव नाशिक आहे. मी तुकोबारायांच्या पालखीत 71 क्रमांकाच्या दिंडीत चालतो आहे. यापूर्वी तीन वाऱ्या मी माउलींच्या पालखीबरोबर केल्या. त्यामुळे यंदा तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बहिणाबाई दिंडीत सहभागी झालो.

दिंडीत चालताना अभंग म्हणण्याच्या पद्धतीने मन प्रसन्न होते. आज दुपारी पालखी सोहळा वाखरीकडे मार्गस्थ झाला. सोहळा पंढरी समीप आल्याने प्रस्थानापासून चालल्याचा शिणवटा कमी होत असल्याचे जाणवले. दोनच दिवसांत पंढरीत दाखल होणार असल्याने भाग गेला... शिण गेला... अवघा झालासे आनंद अशीच माझी अवस्था झाली.
उन्हाचा तडाखा, तर कधी ढगाळ वातावरण व मध्येच वारा अंगावर घेत सर्वांबरोबर मी चालत होतो. दुपारचा विसावा भंडीशेगाव येथे झाला. तेथे जेवण केले. त्यानंतर पुन्हा सोहळा मार्गस्थ झाला. पालखी बाजीराव विहिरीजवळ पोचली. त्यापूर्वीच मी तेथे आलो. कारण, सोपानकाका, माउलींच्या रिंगण सोहळ्यालाही मला उपस्थिती लावायची होती. मी हे तिन्ही सोहळे पाहिले. प्रथम सोपानकाका, नंतर माउली व नंतर तुकाराम महाराजांचा उभा रिंगण सोहळा झाला. सोपानकाकांचा सोहळा पुढे गेला. उभ्या रिंगणानंतर माउली सोहळा गोल रिंगणासाठी मैदानात गेला. त्यानंतर तुकोबारायांचा उभ्या रिंगणाचा सोहळा रंगला. पालखी सोहळा बाजीराव विहिरीपासून तेथून पुढे काही अंतर गेल्यावर तेथे उभा रिंगण सोहळा रंगला. दोन्हीकडे वारकरी रस्त्याच्या दुतर्फा थांबले होते.

आज सोहळ्यात
* पालखी सोहळा दुपारी एक वाजता पंढरपूरकडे मार्गस्थ होणार
* सकाळपासून पादुका दर्शनासाठी खुल्या
* पंढरपुरात येण्यापूर्वी पादुका अभंग आरती होणार
* अभंग आरतीनंतर तेथेच होणार उभा रिंगण सोहळा
* सायंकाळी सोहळा पंढरीत विसावणार

(शब्दाकंन - सचिन शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wari news sant tukaram maharaj palkhi sohala