नात्यातील आदर महत्त्वाचा - अभिजित खांडकेकर 

नात्यातील आदर महत्त्वाचा - अभिजित खांडकेकर 

उत्तम निवेदक आणि अभिनेता म्हणून आपण ओळखतो अभिजित खांडकेकर या कलाकाराला. ‘माझीया प्रियाला प्रीत कळेना’ मालिकेपासून ‘माझ्या नवऱ्याची बायको’पर्यंतचा त्याचा प्रवास आपण जाणतोच. तो रेडिओ जॉकीही होता. त्याची पत्नी सुखदा खांडकेकर उत्तम अभिनेत्री आणि कथक नृत्यांगना आहे. ‘अनान’ चित्रपटातील, ‘तुझं माझं जमेना’ या मालिकेतील व ‘तेरी भी चूप’ नाटकातील, ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील तिच्या भूमिका आपल्याला आठवतात. ती क्लिनिकल सायकॉलॉजिस्टही आहे. ‘अनसेन्सर्ड’ नावाचा तिचा टॉक शो यू-ट्यूबवर गाजला होता. दोघांच्या लग्नाची कहाणी खूप इंटरेस्टिंग आहे. अभिजित आणि सुखदा एकमेकांना ओळखत होते. अभिजित शूटिंगसाठी मुंबईत आला होता आणि सुखदा पुण्यात होती. अभिजितची ‘माझीया प्रियाला प्रीत कळेना’ मालिका सुरू झाल्यावर सुखदाच्या घरातूनही अभिजितला कौतुकाचा मेसेज आला होता. पुढं काही ऑडिशनसाठी सुखदा मुंबईत आली आणि मग अभिजितच्या आणि सुखदाच्या भेटी होऊ लागल्या. दोघांची चांगली मैत्री झाली. गंमत म्हणजे, सुखदाच्या लग्नासाठी ‘स्थळ’ सुचवण्यासाठीही अभिजित मदत करत होता. अभिजितनं एकदा सुखदाला विचारलं, ‘आपली एकमेकांशी चांगली मैत्री आहे, तर आपणच लग्नाचा विचार करूया का?’ सुखदानंही होकार दिला आणि दोघांचं लग्न झालं. 

अभिजितच्या आवडणाऱ्या कामाविषयी सुखदा म्हणाली, ‘अभिजितनं ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या चित्रपटात केलेली भूमिका मला आवडते. या भूमिकेच्या तयारीसाठी त्यानं वर्षभर प्रचंड मेहनत घेतली होती. वजन वाढवलं होतं, काही फाइट सीन्सही या चित्रपटात केले होते. तसेच अभिजित ‘माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये साकारत असलेला ‘गुरुनाथ सुभेदार’ माझी आवडती भूमिका आहे, कारण चार वर्षं तो या मालिकेत काम करतोय. ती भूमिका पाहून लोक त्याला सांगतात, ‘अभिजित, आम्हाला तुमचा राग येतो.’ तेव्हा ती त्याच्या अभिनयाला मिळालेली दाद आहे.’ 

सुखदाच्या भूमिकांबद्दल अभिजित म्हणाला, ‘सुखदाने ‘देवदास’ नावाच्या नाट्यप्रयोगात ‘पारो’ साकारली होती. यात तिला नृत्यही सादर करायचं होतं, गायचं होतं आणि तिनं लिहिलेल्या कवितेच्या चार ओळीही यात घेण्यात आल्या होत्या.’ 

‘अभिजित कलाकार आणि माणूस म्हणून अतिशय प्रामाणिक, शिस्तप्रिय आहे,’ ही गोष्ट सुखदाला आवडते. ‘सुखदा एखाद्या गोष्टीचा खूप विचार करते, हा तिच्या बाबतीतला आवडणारा गुण आहे, पण अतिविचार करण्याचा तिला कधी कधी त्रासही होतो,’ असंही तो म्हणाला. 

लॉकडाउनच्या काळात अभिजित आणि सुखदा दोघांनाही एकमेकांना खूप वेळ देता आला. या काळात स्वयंपाकासाठीही अभिजितनं मदत केली. अभिजितच्या ‘सारेगमप’ स्पेशल एपिसोडच्या शूटिंगसाठी सुखदानं मदत केली. सुखदाच्या नृत्याच्या शूटिंगसाठी अभिजितनं मदत केली. दोघांनी या काळात अनेक चित्रपट, वेबसीरिज पाहिल्या. काही कार्यशाळाही केल्या. ते सांगतात, ‘आम्ही दोघंही एकमेकांच्या मतांचा अत्यंत आदर करतो आणि हीच आमच्या दोघांच्या नात्यांमधील खरी ताकद आहे. एकत्र असतानाही पती-पत्नींना स्वतःची अशी एक स्पेस मिळावी लागते, ही गोष्ट आम्ही आवर्जून पाळतो. एकमेकांबद्दलचा आदर आणि विश्‍वास या गोष्टी जीवनातील हे नातं जपताना खूप महत्त्वाच्या असतात.’ 

(शब्दांकन ः गणेश आचवल) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com