प्रवास ‘ब्लॉग’ ते ‘ब्लॉक’पर्यंतचा! 

radhika deshpande
radhika deshpande
Updated on

छत्तीस हा निव्वळ एक आकडा आहे. माझा कोणाशीही छत्तीसचा आकडा नाही आहे आणि लेखानाशी तर नाहीच नाही; पण आज का कोण जाणे, मला काहीच सुचत नाही आहे. शब्द सापडत नाहीयेत, वाक्यरचना होत नाहीये, दोन वाक्यांना सांधणारा दुवा सापडत नाहीये, आणि वाक्यांनी बनलेल्या परिच्छेदाला अर्थ लागत नाहीये. ‘सकाळ’च्या ‘मैत्रीण’ या सदरासाठी हा माझा छत्तिसावा लेख आहे आणि माझ्याकडे लिहिण्याजोगं काही नाही आहे. पूर्वीच्या चित्रपटांत प्रियकर आपल्या प्रेयसीला पत्र लिहायला घ्यायचा आणि सुरुवात कुठून करू, काय लिहू, किती लिहू, कसं लिहू या विचारांत पडलेला दिसायचा आणि मग कट टू त्याने फाडून फेकलेल्या कागदांच्या बोळ्यांचा शॉट असायचा. तसं माझं झालं आहे असंही म्हणता येणार नाही, कारण मी काही प्रियकर नाही आहे. मला काही प्रेमरोग जडला नाहीये. तरी पण मला काही केल्या सुचत नाहीये. अचानक असं का होतंय? डोक्याचा भुगा झाला आहे. लेख प्रूफरीडिंगसाठी पाठवण्याची डेडलाईन जवळ आली आहे आणि मूड सेट होत नाही आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

चिडचिड, अस्वस्थता, बेचैनी आणि मग उदासीनता येण्याच्या मार्गावर मी असताना माझ्या एका लेखक मित्राचा फोन आला. मी त्याला पटकन सांगितलं, ‘‘मला भयंकर असं काहीतरी झालं आहे. माझ्यातली कल्पनाशक्ती कमी झाली आहे. विचारांना चालना मिळत नाहीये. विचारांचं बीज सापडत नाही आहे. सापडलं तरी त्याला अंकुर फुटत नाहीयेतत. अंकुर जरी फुटले तरी त्यांचा सुंदर वृक्ष होईल अशी शाश्वती वाटत नाही. मला काय होतंय ते मलाच समजत नाहीये. कुठल्या डॉक्टरला दाखवण्याइतपत हे काही गंभीर नाही; पण असं जर मला सुचलंच नाही तर काय होईल? कागद आणि लेखणी माझ्यावर रुसून तर बसले नाहीत ना? माझ्या आयुष्यात कुठला तरी ताण आहे का ज्याच्यामुळे असं होतंय? का कोणाची नजर लागली आहे? का मी ‘आपल्याला जमणार नाही’ असं कुठेतरी ठरवून टाकलं आहे? का विद्येची देवता माझ्यावर नाराज आहे म्हणून असं होतंय? का मी खूप जास्त विचार करते आहे? मित्रा, मला काय झालं आहे?’’ शेवटचा प्रश्न त्याला विचारून मी थांबले. तो म्हणाला, ‘‘हे बघ, मी काही डॉक्टर नाही; पण मी एक लेखक आहे आणि मी तुला एवढं नक्की सांगू शकतो, की तुला भयंकर असं काही झालं नाहीये. तुला ‘ब्लॉक’ आला आहे- ‘रायटर्स ब्लॉक’. मी म्हणाले, ‘रायटर्स ब्लॉग’ मला माहीत होताच; पण ब्लॉकबद्दल नवलच वाटलं. ब्लॉक म्हणजे?’’ 

त्यानं सांगितलं, ‘‘म्हणजे लेखकाचं लिखाण थांबतं. त्याला काहीच सुचत नाही. क्षीण, ताण, तणाव, वातावरण अशी कुठलीही कारणं नसतात. बस, लिखाण थांबतं. विषय कठीण आहे, कंटाळा आला आहे, लेखाची बांधणी कठीण आणि खूप मोठी आहे अशीही कारणं नसतात. बस, सुचत नाही. लिखाण काही काळ थांबतं.’’ ‘‘मग अशा वेळी आपण काय करायचं? मी काय करू?’’ तो हसून म्हणाला, ‘‘काही करायचं नाही. काही काळ जाऊ द्यायचा. कुठंही उवाच्च करायचं नाही. त्याचं भांडवल करायचं नाही. शांत राहायचं. विचारांच्या वाहत्या झऱ्याला मिठाचे खडे लागावे आणि प्रवाह अडकून पडावा तसं. एकदा का ते विरघळले, की प्रवाह सुरू होतो आणि परत विचारांना ओघवती धार लागते.’’ मी म्हणाले, ‘‘कमाल आहे. हे फक्त माझ्यासारख्या नवख्या लेखकाबरोबर होतं आहे, की तुझ्याही बरोबर झालं आहे?’’ तो म्हणाला, ‘‘अगं, मोठे मोठे लेखकही त्यातून सुटले नाहीत. असं होतं. याला काही इलाज नाही बघ.’’ 

मी ब्लॉग लिहायला घेतला ते स्वतःला व्यक्त होण्यासाठी, पुढे लिहायला लागले कारण मला वाचक मिळाले. लिहीत राहायचं ठरवलं कारण मी नुसतंच व्यक्त न होता वाचकांना देता येत होतं. इथेही मला अभिप्रेत असलेल्या प्रेक्षक वर्गाचं मी मनोरंजन करू शकते आहे, याचा आनंद आहे म्हणून मी लिहिते. 

आजही मला कोणी ‘या लिहितातही’ असं म्हटलं, की कसंनुसंच होतं. कारण लेखणी धरली, लेखणी उचलली आणि लिखाण केलं यामध्ये बराच प्रवास घडतो. या प्रवासाची मी नवीन प्रवासी आहे. हा प्रवास एकट्याने करायचा असतो; पण यात अनेक वास्तू, वस्तू असतात आणि तरल, तरतरीत काही तृप्त करणाऱ्या भावना असतात. हा प्रवास मला हवाहवासा वाटतो. म्हणून मी लिहिते. 

मला विचाराल, तर मी किराण्याची यादी तयार केल्याप्रमाणे मुद्द्यांची यादी तयार करते आणि माझ्या मुलीला वाचून दाखवते. मग ती मला सांगते, ‘चल, आता लिहून काढ पटापटा.’ माझं तिला म्हणणं असतं, ‘पटापटा लिहून काढायला तो काय कॉर्पोरेशनचा नळ आहे? फिरवला की भराभर पाणी यायला?’ एका गरोदर स्त्रीप्रमाणे माझी अवस्था होते. प्रसूतीचा काळ यातनांनी भरलेला असतो; पण एकदा का लेख बाळ म्हणून जन्माला आला, की ब्रम्हानंदी आनंद असतो. अगदी हुश्श व्हायला होतं कधीकधी तर. भिजत घातलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांमधे हळूहळू साखर घालत विचारांना मुरू देत त्यांचा गुलकंद झाल्यावरच तो तुमच्यापर्यंत पोचवावा. काय म्हणता? 

अय्या बघा! तुमच्याशी बोलताबोलता लेख तयार झाला. आता ‘सकाळ’च्या कोऱ्या करकरीत पानांवर जेव्हा ही अक्षरं, मुळाक्षरं, वाक्यं, परिच्छेद आणि नकळत तुमच्याशी संवाद छापील स्वरूपात सादर होईल तेव्हा त्याची उंची, दर्जा, पोत आणि झालेला परिणाम या लेखाला पूर्णत्व देईल. लेखन करण्यासाठी तुमच्याकडे असायला लागते खाण. खोल खाणीत सापडतात तुम्हाला हिरे, तर कधी लागतो खळखळणारा झरा. कधीकधी लागलाच नाही हाती तर समजावं, आज ‘ब्लॉक’ हाती लागला आहे. लेखणीला थोडा स्वल्प द्यायचा आणि सांगायचं स्वतःला. वाह! इतर लेखकांप्रमाणे आज मला ब्लॉक गवसला! आणि याच ‘ब्लॉक’ने माझा ‘ब्लॉग’ही घडवून आणला. काय म्हणता? सुचत असल्यास लिहून पाठवा. नसेलच सुचत तर तुम्हाला हा ब्लॉक आहे का, हे चाचपडून पाहण्यासाठी तरी लेखणी उचला!! 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com