esakal | ‘दिग्दर्शनातील स्वातंत्र्य महत्त्वाचे’
sakal

बोलून बातमी शोधा

‘दिग्दर्शनातील स्वातंत्र्य महत्त्वाचे’

अक्षय आणि प्रसाद या दोघांची पहिली भेट झाली होती ती ‘चिरायू’च्या मराठी नवीन वर्ष स्वागताच्या पार्टीमध्ये. तेव्हा दोघांची औपचारिक भेट झाली होती. ओळख झाली आणि आपण भविष्यात एकत्र काम करू, असे बोलणेदेखील झाले.

‘दिग्दर्शनातील स्वातंत्र्य महत्त्वाचे’

sakal_logo
By
अक्षय बर्दापूरकर-प्रसाद ओक

नोव्हेंबर महिना सुरू झाला आणि अनेक मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. नुकतीच ‘चंद्रमुखी’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणालादेखील सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचे निर्माते आहेत अक्षय बर्दापूरकर आणि दिग्दर्शक आहे प्रसाद ओक.

अक्षय आणि प्रसाद या दोघांची पहिली भेट झाली होती ती ‘चिरायू’च्या मराठी नवीन वर्ष स्वागताच्या पार्टीमध्ये. तेव्हा दोघांची औपचारिक भेट झाली होती. ओळख झाली आणि आपण भविष्यात एकत्र काम करू, असे बोलणेदेखील झाले; पण तो योग जुळून यायला काही वर्षे गेली. ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाच्या निमित्ताने हा योग जुळून आला आहे. प्रसाद म्हणाला, ‘‘खरं तर ‘चंद्रमुखी’ या विश्वास पाटील यांच्या साहित्यकृतीवर आधारित चित्रपट यायला हवा, असं अनेक वर्षं मनात होतं. जवळजवळ दहा-बारा वर्षं मी विश्वास पाटील यांना सांगत होतो, की या साहित्यकृतीवर आधारित चित्रपट निर्माण होण्यासाठी परवानगी द्या; पण आम्हाला परवानगी मिळाली नव्हती. मला ‘कच्चा लिंबू’ चित्रपटाकरिता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्यानंतर ‘हिरकणी’ चित्रपटसुद्धा यशस्वी झाला. ‘हिरकणी’ चित्रपट विश्वास पाटील यांनी पाहिला आणि त्यानंतर आम्हाला ‘चंद्रमुखी’ या साहित्यकृतीवर चित्रपट निर्माण करण्याची परवानगी मिळाली. चित्रपटाचा निर्माता म्हणून अक्षय बर्दापूरकर पाठीशी उभा राहिला आणि त्यादृष्टीनं कामं सुरू झाली.’’

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अक्षय म्हणतो, ‘‘प्रसादला एक दिग्दर्शक म्हणून मी पाहत होतो. प्रत्येक संहितेत काहीतरी वैविध्य आणण्याचा एक दिग्दर्शक या नात्यानं प्रसादचा प्रयत्न असतो आणि हा त्याचा गुण मला आवडतो. दिग्दर्शक म्हणून जी जिद्द त्याच्यामध्ये पाहिली, ती प्रचंड आहे. एका संहितेवर दिग्दर्शक या नात्यानं तो खूप बारकाईनं काम करतो. ‘चंद्रमुखी’ चित्रपटाला संगीत अजय-अतुल यांचं आहे. चित्रपट बिग बजेट आहे, हे नक्कीच. प्रसाद म्हणतो, ‘‘अक्षय एक निर्माता या नात्यानं दिग्दर्शकाला पूर्ण स्वातंत्र्य देतो. मराठीत अनेक वर्षांनी हा राजकीय तमाशापट येत आहे. चित्रपटाचं बजेट जास्त असूनही अक्षयनं त्यासंदर्भात पूर्ण पाठिंबा दिला. दिग्दर्शकाच्या पाठीशी उभे राहणारे असे निर्माते असावेत.’’

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाउनच्या काळात खरं तर अक्षय आणि प्रसाद यांची जास्त चांगली मैत्री झाली. चिन्मय मांडलेकरलादेखील चित्रपटलेखनासाठी योग्य वेळ मिळाला आणि आता ‘चंद्रमुखी’चं चित्रीकरण सुरू झालं आहे.
(शब्दांकन : गणेश आचवल)

loading image