सौंदर्यखणी : ‘मछलीपट्टणम’ शैलीतली कलमकारी!

गेल्या एका लेखामध्ये आपण ‘श्रीकलाहस्ती कलमकारी’विषयी जाणून घेतलं होतं, आज आपण कलमकारीचा दुसरा प्रकार- ‘हॅन्ड ब्लॉक प्रिंट कलमकारी’विषयी जाणून घेणार आहोत.
nivedita saraf
nivedita sarafsakal media

गेल्या एका लेखामध्ये आपण ‘श्रीकलाहस्ती कलमकारी’विषयी जाणून घेतलं होतं, आज आपण कलमकारीचा दुसरा प्रकार- ‘हॅन्ड ब्लॉक प्रिंट कलमकारी’विषयी जाणून घेणार आहोत.

भारतात कलमकारी शैलीचे दोन उप-प्रकार बघायला मिळतात. आंध्र प्रदेशमध्ये ‘श्रीकलाहस्ती’ गावी उदयाला आलेली ‘श्रीकलाहस्ती शैलीतील कलमकारी’ आणि आंध्र प्रदेशमधील ‘कृष्णा’ जिल्ह्यात पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावर वसलेलं ‘मछलीपट्टणम’ गावी उदयाला आलेली मछलीपट्टणम शैलीतील, ‘हॅन्ड ब्लॉक प्रिंट कलमकारी’ अशा ढंगात कलमकारी केली जाते. ‘श्रीकलाहस्ती शैलीत’ हातानं ‘फ्री-हॅन्ड’ चित्रं काढली जातात म्हणून त्याला ‘पेन कलमकारी’ म्हणतात, तर ‘मछलीपट्टणम शैलीत’ हातानं ब्लॉक प्रिंटिंग केलं जातं. ‘मछलीपट्टणम’च्या जवळ ‘पेदना’ गावीसुद्धा ‘हॅन्ड ब्लॉक प्रिंट कलमकारी’च्या सुंदर साड्या बनवल्या जातात. त्या शैलीला ‘पेदना कलमकारी’ असंही म्हटलं जातं.

‘हॅन्ड ब्लॉक प्रिंट कलमकारी’ शैलीत पानं-फुलं, झाडं-वेली, मोर, पक्षी, कोयऱ्या, कमळं किंवा इतर नैसर्गिक घटकांची नक्षी साडीवर लाकडी ब्लॉक्सनं हातानं छापली जाते. अशा साड्यांसाठी नैसर्गिक रंग वापरले जातात. लोखंडाचे तुकडे, तुरटी आणि गूळ पंधरा दिवस पाण्यात बुडवून ठेवतात आणि या सगळ्या घटकांची एकत्रित प्रक्रिया होऊन डार्क काळ्या रंगाचा द्रव तयार होतो. हाच द्रव कारागीर साडीवरील डिझाईनची आऊटलाईन करण्यासाठी काळी शाई म्हणून वापरतात. शिवाय नैसर्गिक घटकांपासून बनवलेले वेगवेगळे नैसर्गिक रंग या प्रिंटिंगसाठी वापरले जातात. ‘हॅन्ड ब्लॉक प्रिंट कलमकारी’साठी लागणारे ब्लॉक्स उच्च प्रतीच्या सागवानी लाकडाचे बनवले जातात. या ब्लॉक्ससाठी सागवानी लाकडी ठोकळा घासून सपाट करून घेतला जातो आणि त्यावर पातळ पांढरा रंग दिला जातो, पांढऱ्या रंगामुळे त्यावर पेन्सिलनं काढलेली नक्षी उठून दिसते. काही वेळेस ट्रेसिंग पेपरवर ‘फ्री हॅन्ड डिझाईन’ काढून घेतलं जातं आणि मग त्या लाकडी ब्लॉकवर ट्रेस केलं जातं. चित्र काढून झाल्यावर त्यावरच्या नक्षीनुसार छोटी हत्यारं वापरून बारीक ‘कार्व्हिंग’ केलं जातं. शिवाय नक्षीच्या फक्त आऊटलाईनचे ब्लॉक्सदेखील वेगळे कोरून घेतले जातात.

‘हॅन्ड ब्लॉक प्रिंट कलमकारी’ साडी बनवण्यासाठी आधी सिल्क किंवा कॉटन अशा नैसर्गिक धाग्याचं पांढरं कापड निवडलं जातं. त्यातला स्टार्च जाण्यासाठी ती साडी मग धुऊन घेतली जाते. त्यानंतर पाण्यात गाईचं शेण विरघळवून त्यात ती साडी एक दिवस बुडवून ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी ती साडी पिळून उन्हात वळवून घेतली जाते. मग हिरड्याची पावडर रात्रभर पाण्यात भिजवून त्याची वस्त्रगाळ पेस्ट करून त्या पेस्टमध्ये ही साडी एक दिवस भिजवत ठेऊन दुसऱ्या दिवशी परत वाहत्या पाण्यात धुवून वाळवून ‘हॅन्ड ब्लॉक प्रिंटिंग’साठी तयार केली जाते. या प्रक्रियेमुळे ब्लॉक प्रिंटिंगचे रंग साडीवर व्यवस्थित बसतात. नंतर लांबलचक टेबलावर साडी पसरून ठेवली जाते. सुरुवातीला काठावर आणि मग मधल्या डिझाईनचे आउटलाइनचे ब्लॉक्स एकेक करून नैसर्गिक रंगात बुडवून साडीवर बारकाईनं योग्य त्या जागी ठेवून-दाबून-ठोकून- छापून घेतले जातात. संपूर्ण साडीवरच्या डिझाईनची आऊटलाईन छापून झाल्यावर साडी वाळवून, वाहत्या पाण्यात धुवून मोठ्या पातेल्यात उकळून घेतली जाते. उकळल्यामुळे साडीवरचे छापलेले रंग अधिक गडद होतात. आऊटलाईनच्या आतील नक्षीसाठी दुसरे ब्लॉक वापरले जातात आणि परत धुवून, वाळवून, उकळण्याची संपूर्ण प्रक्रिया साडीत जितके रंग असतात तितक्या वेळा केली जाते.

या साडीमागच्या कष्टांना योग्य तो मोबदला मिळाल्यास हे कारागीर तग धरू शकतील आणि नवनवीन प्रयोग करून जगाच्या पाठीवर ही कला अजून अधोरेखित करतील.

‘शॉलिड’ साडी

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी अभिनय क्षेत्रात आलेली निवेदिता, हिंदी-मराठी चित्रपट करत ‘धूमधडाका’ या सुपरहिट चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आणि पुढे ‘दे दणादण’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘मामला पोरींचा’, ‘माझा छकुला’, ‘देऊळ बंद’ अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

लग्नानंतर साडी नेसायचे खूप प्रसंग येऊ लागले आणि त्यातून निवेदिताजींना साडी हा प्रकार खूप आवडू लागला. रंगसंगती, फॅब्रिकचा पोत आणि साड्यांची जाण बघता त्यांनी नेसलेल्या साड्या त्यांच्या मैत्रिणींना खूप आवडू लागल्या. हौस म्हणून काही साड्या त्या, त्यांच्या मैत्रिणींना डिझाईन करून देऊ लागल्या आणि त्यांनी डिझाईन करून दिलेल्या साड्या त्यांच्या मैत्रिणींना खूपच आवडत असत. मग निवेदिता, मैत्रीण मधू भंडारेसोबत साड्या डिझाईन करू लागल्या आणि त्या दोघी, अनेक ठिकाणी साड्यांच्या प्रदर्शनात भाग घेऊ लागल्या. शिवाय गोव्यातसुद्धा निवेदिता- त्यांच्या जाऊबाई नूतन खवटे यांच्याबरोबर साड्यांच्या प्रदर्शनांमध्ये भाग घेत असत.

निवेदिता म्हणाल्या, ‘‘मधू माझी ‘साडी- गुरू’ आहे. पुढे, मधूच्या तालमीत शिकल्यामुळे माझा स्वतःचा साडी व्यवसाय सुरू झाला. माझ्या मोठ्या बहिणीनं आणि माझ्या नणंदेनंसुद्धा मला खूप प्रोत्साहित केलं. आज वीस वर्षं झाली- मी हा व्यवसाय करते आहे. माझ्या साड्यांना- ‘हंसगामिनी’ हे नावही माझे यजमान अशोक यांनी दिलं, तेदेखील माझ्या कल्पकतेला नेहमी प्रोत्साहन देत असतात.’’

या ‘हंसगामिनी’ साड्यांमधली, निवेदिता यांनी स्वतः डिझाईन केलेली एक ‘हॅन्ड ब्लॉक प्रिंटची कलमकारी साडी’ त्यांना खूप आवडते. साड्यांसाठी त्या स्वतः कापडाची निवड करून तागे आणतात, त्यावर निवेदिता त्यांचं डिझाईन, लाकडी ब्लॉक वापरून ‘हॅन्ड ब्लॉक प्रिंट’ करून घेतात. त्यांना कोयऱ्यांची डिझाईन्स खूप आवडत असल्यामुळे त्यांनी निरनिराळ्या कोयऱ्यांच्या डिझाईनचे ब्लॉक्स करून घेतले आहेत. मात्र, त्यांनी डिझाईन केलेल्या साड्या, पूर्ण एकच डिझाईन आणि एकाच कापडाच्या नसतात. त्यांनी फोटोतली ही साडी बनवण्यासाठी ‘मल कॉटन’वर ‘कलमकारी हॅन्ड ब्लॉक प्रिंट’ करून घेतलेल्या ताग्यातले कापड घेऊन या साडीची बॉडी बनवली आहे, त्यावर हातानं कांथा स्टीच केलेली वेगळी बॉर्डर लावली. त्या, साड्यांच्या बॉर्डरसाठी नेहमी जाड कापड वापरतात, त्यामुळे त्यांच्या साड्यांना आतून ‘फॉल’ नाही लावला तरी चालतो. निवेदिता नेहमी त्या साडीपेक्षा वेगळ्या फॅब्रिकचे ब्लाऊज त्या साडीबरोबर ‘पेअर’ करतात. ‘मल कॉटन’च्या या साडीवर शिफॉनचं ब्लाऊज शिवून त्यावर त्यांनी काठ भरून घेतले आहेत. त्यांच्या कल्पनेतून तयार झालेली ही ‘हॅन्ड ब्लॉक प्रिंटची कलमकारी साडी’ पाहून अशोकजी त्यांना म्हणाले, ‘‘मस्त झाली आहे हं साडी... एकदम शॉलिड!’’ निवेदिता म्हणाल्या, ‘‘माझे यजमान एखाद्या गोष्टीला छान म्हणतात, तेव्हा खरंच ती गोष्ट out of the world असते...! त्यांच्या कौतुकानं मला नेहमीच प्रोत्साहन मिळतं, आणि मग मी अजून नवीन कलाकृती निर्माण करते, आणि मग ती प्रत्येक कलाकृती युनिक ठरते!’’

एकदा स्टार परिवाराच्या कार्यक्रमात त्यांना साडी नेसून नृत्य करायचं होतं, त्यासाठी त्यांनी एक सुंदर साडी तयार केली. त्यांनी नृत्याला योग्य साडी घेऊन ती ‘रॅपअराउंड स्कर्ट’सारखी शिवून घेतली, त्यात निऱ्या आणि पदरसुद्धा ड्रेप करून शिवला होता. ‘रॅप अराउंड स्कर्ट’सारखी ती साडी कंबरेला लपेटून हूक लावायचे की झाली साडी नेसून! विशेष म्हणजे ती साडी शिवलेली आहे हे कळूनसुद्धा येत नाही! अंदाजे ३० सेकंदात नेसता येणारी अशी शिवलेली साडी त्या त्यांच्या मैत्रिणींना नेहमी बनवून देत असतात.

निवेदिता म्हणाल्या, ‘‘साडी हा पेहराव मला खूप ग्रेसफुल वाटतो, त्यामुळे मी सतत साड्याच नेसत असते! ‘हॅन्ड ब्लॉक प्रिंट कलमकारी’ कोणत्याही डिझाईनला पूरक ठरते, या कलमकारीवर माझं खास प्रेम आहे!’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com