
‘अहो, तुम्ही म्हणताय पाठ दुखत आहे तर नक्कीच दुखत असणार. तुम्ही का नाटक कराल...माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर.
- अपर्णा दीक्षित, मानसतज्ज्ञ
मॅडम माझी खरंच पाठ दुखते अहो… मी नाटक नाही करत आहे.'
‘अहो, तुम्ही म्हणताय पाठ दुखत आहे तर नक्कीच दुखत असणार. तुम्ही का नाटक कराल...माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. हे क्रॉनिक दुखणे जरा समजून घेऊयात आणि तुमच्या नियमित औषध उपचारांना समोपदेशनाची जोड देऊन तुम्हाला यातून लवकर बाहेर पडायला मदत करूयात.’
...असा संवाद, अलोहा क्लिनिकमध्ये माझ्यासमोर बसलेली, वेदनेनी पिडलेली महिला आणि मी यांच्यात बऱ्याचदा होत असतो. एखादी दुखापत होते, हाड मोडते, पाय मुरगळला जातो किंवा काही आजार होतो आणि आपल्याला वेदना (pain) जाणवते. याला आपण ताजी तीव्र वेदना (acute pain) असे म्हणतो. जास्तीत जास्त तीन महिन्यांच्या कालावधीत हे दुखणे शरीराकडून नैसर्गिकरीत्या बरे केले जाते; पण कधीकधी मेंदूमधील वेदनेची नोंद घेणारा भाग या विशिष्ट कालावधीनंतरसुद्धा सक्रिय राहतो. केंद्रीय मज्जासंस्था या वेदनेबद्दल इतकी संवेदनशील झालेली असते, की वेदनेचे सिग्नल देतच राहते आणि माणसाला दुखणे जाणवत राहते. कधी कधी ते अधिक तीव्रसद्धा होते. याला जुने, ठाण मांडून बसलेले दुखणे (chronic pain) म्हणू शकतो.
दुखापत, आजार आपल्या मनावर कधीकधी तीव्र व्रण सोडतो. तो प्रसंग, दुखण्यात अनुभवलेल्या वेदनेचे स्मरण, ‘परत दुखले तर’ याची भीती, आपल्याला सतत दुखते याचा येणारा ताण, अपराधी भावना अशा सगळ्या मिश्र भावनांमुळे जुने, ठाण मांडून बसलेले दुखणे (chronic pain) बऱ्याचदा निराशा आणते आणि अधिकच गुंतागुंतीचे होऊन बसते. जुन्या दुखण्याने त्रस्त व्यक्तींपैकी ७० टक्के व्यक्ती महिला असतात. असे असण्यामागे शरीर, मेंदू, हार्मोन्स यासंदर्भातील काही कारणे आहेत. त्यात खोलात नको जायला; पण यातून बाहेर पडण्यासाठी मानसशास्त्राचा वापर करून काय करता येईल ते थोडे बघुयात.
आपण खूप दुखतंय ..प्रचंड दुखत आहे असे म्हणतो; पण ज्यातून खरंच किती दुखतंय याची ना आपल्याला ना दुसऱ्याला कल्पना येते. त्यामुळे दुखण्याला (आपण अनुभवलेल्या तीव्रतेनुसार) १ ते १०० च्या पट्टीवर मार्क करायला शिकले पाहिजे. १ म्हणजे अजिबात दुखत नाही आणि १०० म्हणजे प्रचंड दुखतंय.. जे घरी सहन करणे शक्यच नाही.. हॉस्पिटल गाठले पाहिजे. आता या पट्टीवर दुखणे कुठे असेल तर काय उपाययोजना करायची हे ठरवून ठेवले पाहिजे जसे की १ ते २५ रेंजमधील वेदनेकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे आणि दिवस चालू ठेवायचा. २६ ते ५० रेंजमध्ये दुखत असेल तर आपले ठरलेले घरगुती उपाय करून मन दुसरीकडे गुंतवायचे. ५१ ते ७५ रेंज मधील वेदनेबद्दल जवळच्या लोकांना सांगून मदत मिळवायची. ७५ ते १०० रेंजमधील वेदनेसाठी वैद्यकीय मदत घेतली पाहिजे.
अशा प्रकारे वेदनेला एक ते शंभर पट्टीवर मोजायला शिकल्यावर त्याच्यावर बरेचसे नियंत्रण मिळवता येते आणि दुखण्यामुळे येणारा ताण आटोक्यात ठेवता येतो.
अजून एक छान उपाय करता येतो. आपला वेदनेकडे दुर्लक्ष करण्याकडे कल असतो. त्याऐवजी वेदनेकडे काळजीपूर्वक लक्ष केंद्रित करावे आणि तीन घटकांवर त्याचा अभ्यास करावा
तापमान(temperature : जेव्हा/ जिथे वेदना जाणवते तेव्हा/ तिथे गरम वाटते का गारवा जाणवतो)
वजन (mass : दुखऱ्या जागेवर जडत्व जाणवते का हलकेपणा जाणवतो)
गती (motion : दुखणे एका जागेवरून दुसरीकडे फिरते का एकाच जागी स्थिर असते)
अशा प्रकारे जुन्या दुखण्याचे mindfully विश्लेषण करायला लागल्यास हळूहळू वेदना त्रास देणारी, भीती वाटणारी गोष्ट न राहता आपण जिची नोंद घेतो आणि जिला परतवून लावतो अशी गोष्ट बनते.
(या दोन्ही क्लृप्त्या cronic pain संदर्भात आहेत आणि acute pain संदर्भातल्या नाहीत याची नोंद घ्यावी.)
वेदनेशी निगडित असलेल्या विचारांचा आणि भावनांचा समुपदेशन (counseling) सेशनमध्ये निचरा करून आपण अशा दीर्घकाळ आपली पाठ न सोडणाऱ्या वेदनेला बाय बाय करू शकतो आणि मुक्त, वेदनाविरहित आयुष्याचा आस्वाद घेऊ शकतो. त्यासाठी सतत ‘सहनशक्तीचा’ आसरा न घेता ‘इच्छाशक्तीची’ कास मात्र धरली पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.