पालकत्व निभावताना... : मायेचा तडका...!

आशिष तागडे
Sunday, 12 April 2020

आठवड्यात सलग तिसऱ्यांदा पानात उसळ पाहून स्नेहा जाम वैतागली. ‘‘आई, काय गं हे. आधीच घरात बसून कंटाळलेय आणि हे काय खायला दिलेस?’’ स्नेहाची चिडचिड आईच्या लक्षात आली होती. दररोज नाही, परंतु आठवड्यातून एक-दोनदा तरी बाहेरचे चटपटीत खाण्याची सवय असलेल्या स्नेहाला सलग पंधरा-वीस दिवस घरातील अन्न खावे लागल्यामुळे चिडचिड होणार, याची स्नेहाच्या आईला कल्पना होतीच. तिने तशी मनाची तयारीही केली होती. लॉकडाऊनच्या काळात बाहेर जायचेच नाही, याची पुरेशी तजवीज स्नेहाच्या आईने केली होती.

आठवड्यात सलग तिसऱ्यांदा पानात उसळ पाहून स्नेहा जाम वैतागली. ‘‘आई, काय गं हे. आधीच घरात बसून कंटाळलेय आणि हे काय खायला दिलेस?’’ स्नेहाची चिडचिड आईच्या लक्षात आली होती. दररोज नाही, परंतु आठवड्यातून एक-दोनदा तरी बाहेरचे चटपटीत खाण्याची सवय असलेल्या स्नेहाला सलग पंधरा-वीस दिवस घरातील अन्न खावे लागल्यामुळे चिडचिड होणार, याची स्नेहाच्या आईला कल्पना होतीच. तिने तशी मनाची तयारीही केली होती. लॉकडाऊनच्या काळात बाहेर जायचेच नाही, याची पुरेशी तजवीज स्नेहाच्या आईने केली होती. महिनाभराच्या किराणा सामानात घरात डाळी, कडधान्य पुरेसे आणले होते. एरवी नोकरीमुळे येत असूनही करता न येणारे पदार्थ आवर्जून करायचे, हे तिने ठरविले होते आणि त्यादृष्टिने नियोजनही केले होते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुरुवातीला स्नेहाला थोडे समजावून सांगितले. तिने कुरकुर केली नाही, मात्र आता मात्र तिला कंटाळा आला होता. स्नेहाच्या आईने एक शक्कल लढविली. घरातील पाककृतीचे पुस्तक काढले आणि स्नेहाच्या हातात देत सांगितले, ‘‘स्नेहा एक काम कर, या पुस्तकाची अनुक्रमणिका वाच आणि तुला आवडतील त्या पदार्थांची यादी कर.’’

थोड्याशा नाराजीच्या सुरात पुस्तक घेत स्नेहाने यादी करायला घेतली. नाष्टा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण अशी वेगवेगळी यादी कर असे सांगत असताना आईने, त्यासाठी घरात काय वस्तू आहेत, याची नोंद घे असे सांगितले. अनुक्रमणिका वाचत असताना स्नेहा सहज त्या पदार्थाच्या पानावर जाऊन साहित्य, कृती बारकाईने वाचू लागली.

आपणही हा पदार्थ करून पाहिला पाहिजे, म्हणून तिच्या मनात यायला लागले. ढोकळा खूप आवडत असल्याने तिने जरा हटके ढोकळा करू म्हणून ‘पाच डाळींचा ढोकळा’ हा पदार्थ निवडला. आनंदात आईला सांगायला आली, ‘‘आई, मी उद्या पाच डाळींचा ढोकळा करणार.’’ आईच्या चेहऱ्यावर सहजच हासू आणि समाधान उमटले. तिने मनात केलेला विचार प्रत्यक्षात उतरला होता. स्नेहाला एक गुगली टाकत विचारले, ‘‘मी मदत करायची आहे, की सर्व तूच करणार आहे.’’ ‘नाही, माझी मीच करणार..’’ स्नेहाने उत्साहात आईला सांगून टाकले. आईने तिला डाळीचे डबे आणि प्रमाण सांगितले.

स्नेहाने दुसऱ्या दिवशी योग्य प्रमाणानुसार डाळी भिजत घातल्या. योग्य वेळेनंतर त्या वाटून घेतल्या. पुस्तकातील कृतीनुसार सर्व जिन्नस गोळा केले. एखादा पदार्थ करताना किती व्यवधान पाळावे लागतात याची तिला कल्पना आली. हे सगळे आई रोज मायेने आपल्यासाठी करते आणि आपण तिच्यावर उगाचच चिडचिड करतो, हे तिच्या लक्षात आले होते. हे लक्षात येण्याचे कारण, ढोकळ्याचे पीठ एकसारखे करताना थोडे पाणी जास्त झाले होते, त्यामुळे ते फुगले नव्हते. त्यामुळे नाराज होऊनच तिने हॉलमध्ये बसलेल्या सर्वांसाठी खायला आणून दिले. ढोकळ्याचा पहिला तुकडा तोंडात ताकद आईने दिलेल्या मनमुराद दादेमुळे स्नेहा सुखावली आणि पदार्थ चुकल्यामुळे आलेला अपराधीपणाचा भावही नाहीसा झाला. ‘अगं वेडाबाई, तू हा पदार्थ केलाच हेच खूप आहे, चव छानच आली आहे, पुढच्या वेळी आकारही आणखी छान होईल.’ या आईच्या मायेच्या वाक्‍याने स्नेहा मात्र खूप सुखावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article aashish tagade parenting