पालकत्व निभावताना... : धडा काटकसरीचा!

आशिष तागडे
Sunday, 19 April 2020

‘शुभम, अरे जेवायला येतोस ना...ताट वाढून ठेवले आहे, अन्न गार होईल ना?’, आई वसुधाने रागावल्यासारखे करत हाक मारली.

‘एवढा गेम पूर्ण झाला की येतो...’ असे त्याचे वाक्‍य संपायच्या आत चिडून वसुधाने पुन्हा एकदा जोरात हाक मारली. त्यानंतर मोबाईल बाजूला ठेवत शुभम धावतच ताटावर हजर झाला.

‘शुभम, अरे जेवायला येतोस ना...ताट वाढून ठेवले आहे, अन्न गार होईल ना?’, आई वसुधाने रागावल्यासारखे करत हाक मारली.

‘एवढा गेम पूर्ण झाला की येतो...’ असे त्याचे वाक्‍य संपायच्या आत चिडून वसुधाने पुन्हा एकदा जोरात हाक मारली. त्यानंतर मोबाईल बाजूला ठेवत शुभम धावतच ताटावर हजर झाला.

‘हे काय आई, आज चक्क मॅगीची भाजी,’  शुभमने आश्‍चर्यचकित होत विचारले. आपल्याला मॅगी आवडते आणि आई किती वेळा यायला देते याची पुरेपूर जाणीव असल्याने त्याचे डोळे चांगलेच विस्फारले होतो.

‘अगं आई, मात्र हे मॅगी जरा वेगळेच लागतेय,’ शंका घेत शुभनने विचारले. त्यावर वसुधा म्हणाली, ‘अरे तुमचे ते मॅगी की फॅगीमध्ये वेगवेगळे फ्लेवर्स असतात ना, तसाच हाही गव्हाचा फ्लेवर आहे.’ शुभमला काहीच उलगडा झाला नाही. ती म्हणाली, ‘अरे ही मॅगीची नव्हे तर कुर्डयांची भाजी आहे. मागच्या महिन्यात आपण कुर्डया केल्या होत्या. 

‘कुर्डयाची भाजी’ चेहऱ्यावर आश्‍चर्य व्यक्त करत शुभमने विचारले. त्यावर वसुधा म्हणाली, ‘हो, कुर्डया थोड्या वेळ भिजत घातल्या, की मऊ होतात आणि त्याची अगदी पोहे करतो तशी भाजी करता येते. तुला आवडली की नाही सांग?’ 

‘होय आई, भाजी आवडली पण हा काय प्रकार आहे,’ इति शुभम. हेच निमित्त साधून वसुधाने त्याला समजावणीच्या सुरात म्हणाली, ‘अरे बाहेरची परिस्थिती तू पाहत आहेसच. आता किरकोळ कारणांसाठी बाहेर पडणे योग्य आहे का? आज भाजी संपली. परंतु आपल्याकडे डाळी, कडधान्ये आहेत. त्याचबरोबर वर्षभरासाठी आपण उन्हाळी काम करतो, त्यातून वेगवेगळे पदार्थ करता येतात. आज कुर्डयाची भाजी केली तशी उद्या सांडग्याची उसळही करणार आहे. आता तू लक्षात घे, वीस-पंचवीस दिवसांत तुला एकदा तरी बाहेरचे खाण्याची इच्छा झाली का? अरे, घरच्या अन्नाला असलेली चव आपण शेकडो रुपये मोजले तरी बाहेरच्या खाद्यपदार्थांना थोडीच येणार आहे?

आयुष्यात असे प्रसंग खूप क्वचित येतात, त्यावेळी आपल्याला खऱ्या गरजा शिकायला मिळतात. यातूनच आपण काटकसरी, समाधानी राहायला शिकले पाहिजे.’

शुभम खरंच विचारात पडला. कारण गेल्या काही दिवसांत त्याला ना बर्गरची आठवण झाली होती ना वेफर्सची. घरचे खाऊन त्याला ताजेतवानेही वाटत होते. शुभमच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून वसुधाही आनंदली. घरी आहोत, तोवर शुभमला गरमागरम जेवण द्यायचे हा विचार करत ती पुढच्या कामाला लागली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Aashish Tagade on Parenting

Tags
टॉपिकस
Topic Tags: