खरंखुरं ‘देवमाणूस’ 

अस्मिता देशमुख, अभिनेत्री 
Saturday, 19 September 2020

अनेक मुलींना आपल्या स्वप्नांना मुरड घालावी लागते. मात्र, आईसारखं ‘देवमाणूस’ अन् बाबांचा पाठिंबा मिळाल्यानंच माझ्या स्वप्नांना बळ मिळालं आणि मी आकाशात उंच भरारी घेऊ शकले. 

आम्ही दोघीच बहिणी. आम्हाला भाऊ नाही; पण आईनं मुलगा नाही म्हणून दुःख बाळगलं नाही अन् कधीही भेदभाव केला नाही. ती आजही सर्वांना अभिमानानं सांगते, ‘‘म्हारो छोरी छोरोसे कम नही...’’ 

माझ्या आईचं खूप कमी वयात लग्न झाल्यामुळे तिला पूर्ण शिक्षण घेता आलं नाही. त्यामुळे तिची शिक्षक होण्याची इच्छा राहून गेली. परंतु, तिच्यात असणारी जिद्द अणि चिकाटीनं तिला शांत बसू दिलं नाही. आम्ही शाळेत जायचो, त्या वेळेत ती मशीनकाम शिकली अणि घर चालवण्यासाठी तिचा हातभार लागला. चोविसाव्या वर्षी तिनं स्वतःचं घर घेतलं. आम्हाला चांगलं शिक्षण घेता यावं, यासाठी नेहमी तिचा पुढाकार होता आणि आजही आहे. मला लहानपणापासून अभिनय आणि संगीताची आवड असल्यामुळे आईनं मला संगीताचा क्लास लावला. आम्हा बहिणींच्या इच्छा तिनं पूर्ण केल्या. माझी सायकॉलॉजीची पदवी पूर्ण झाल्यानंतर मी एमएसडब्ल्यूचं शिक्षण पूर्ण केलं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आमच्या कुटुंबामध्ये अभिनय क्षेत्रात कोणीही नसल्यामुळे मला नेहमीच त्यासाठी विरोध झाला. परंतु, आईची साथ मला कायम होती. खरंतर मी असंच म्हणीन, की ती माझा सारथीच आहे. योग्य दिशा अन् मार्ग तिनं आम्हाला दाखवले. शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही शॉर्टफिल्म्स आणि अल्बम्स केले. त्यानंतर मला ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘देवमाणूस’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यात मी अल्लड अन् लक्ष वेधून घेणाऱ्या डिंपलीची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे माझ्या भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद अन् दादही मिळते आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आज मला एक सांगावंसं वाटतं, की आजही मध्यमवर्गीय कुटुंबांत अभिनय क्षेत्रात जाण्यासाठी मुलींना विरोध होतो. त्यामुळे अनेक मुलींना आपल्या स्वप्नांना मुरड घालावी लागते. मात्र, आईसारखं ‘देवमाणूस’ अन् बाबांचा पाठिंबा मिळाल्यानंच माझ्या स्वप्नांना बळ मिळालं आणि मी आकाशात उंच भरारी घेऊ शकले. 

(शब्दांकन : अरुण सुर्वे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about actress asmita deshmukh

Tags
टॉपिकस
Topic Tags: