esakal | वुमनहूड : पुस्तकातलं जग
sakal

बोलून बातमी शोधा

Radhika Deshpande

लेखकांच्या शब्दातून समाजजागृती होऊ शकते आणि बदल घडवता येऊ शकतात इतकं त्यांचं अस्तित्व प्रतिभावंत असतं. म्हणूनही मला लेखिकेच्या भूमिकेत शिरायला आवडतं. 

वुमनहूड : पुस्तकातलं जग

sakal_logo
By
रानी (राधिका देशपांडे), अभिनेत्री

रानीच्या चौथ्या पुस्तकाचं सतरा तारखेला प्रकाशन झालं. अभिनेत्री राधिका देशपांडे ‘रानी’ या नावानं का लिहिते असा प्रश्न तुम्हाला पडत असेल नं? ज्याच्यामुळे मी लिहायला लागले तो माझा नवरा नीरज. राधिका मधला रा आणि नीरज मधला नी यातून रानी हे ‘पेन नेम’ तयार झालं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेऊन आपले विचार इतरांपर्यंत पोचवू शकतो यात मला आनंद आहे. कधीकधी लेखणीची तलवार करून त्यात शब्दांचा मधुरस भरून आणि वाचकांच्या मनात शिरायचा प्रयत्न केला आहे, कधी कधी हृदयात घर केलं केलं आहे, त्यांच्या विचारांना चालना दिली आहे आणि कधीकधी तर त्यांनी घेतलेल्या निर्णयातून माझे विचार डोकावू लागलेले रानीनं पाहिले आहेत. लेखकांच्या शब्दातून समाजजागृती होऊ शकते आणि बदल घडवता येऊ शकतात इतकं त्यांचं अस्तित्व प्रतिभावंत असतं. म्हणूनही मला लेखिकेच्या भूमिकेत शिरायला आवडतं. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लहान मुलांसाठी लिहिणं कठीण आहे आणि तो पोरखेळ समजू नये. मुलांच्या भावविश्वात जाऊन त्यांना समजेल अशा भाषेत, कल्पनाशक्तीला ताण देत, बोधप्रद; पण तितकंच सहज, स्वाभाविक आणि सुंदर लिखाण असेल तर ते त्यांना एका वेगळ्याच जगात नेतं. त्यांचं जग, जिथं अशक्य असं काहीच नसतं. जिथं माणसाचा बेडूक आणि बेडकाची राजकन्या होऊ शकते, जिथं सज्जनांचा विजय आणि दुर्जनांचा नाश होतो. लहान मुलं परिकथेत रमतात आणि जोपर्यंत ही परिकथा जिवंत आहे तोपर्यंत हे जग राहण्यासारखी जागा असेल. जेव्हा मुलांच्या जगातली परिकथा नष्ट होईल, आवडेनाशी होईल, तेव्हा आपल्या या जगाचा शेवट जवळ आला आहे असं समजावं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरवर्षी एक पुस्तक लिहायचं असं मी ठरवलं. बालनाट्य चळवळ चालू राहण्यासाठी आणि त्यात नवीन गोष्टी, कल्पना, आधुनिकता; तसेच वास्तववादी आणि आजच्या जगाशी संलग्न साहित्याचा सहभाग होण्यासाठी माझा हा खारुताईचा वाटा आहे. मी या वर्षीचं ‘त्रिकूट बालनाट्याचे'' हे पुस्तक लॉकडाऊनच्या काळात लिहिलेलं आहे. यात तीन एकांकिका आहेत; पण त्या वेगवेगळ्या भाषांमध्ये आहेत. ‘सेल्फी’ ही शेफ चिनू आणि तिच्या भन्नाट रेसिपीची गोष्ट मराठीत आहे. ‘टिरा’ या इंग्रजी नाटकात टिरा नावाची झेब्रा, चंपू नावाचं माकड आणि मलिष्का नावाची सिंहीण आहे. ‘पासवर्ड’ हे नाटक हिंदीत आहे, ज्यामध्ये पुरुषोत्तमबरोबर आहे पासवर्ड; पण धमाल येते तेव्हा, पोलिस येतात जेव्हा! चार पुस्तकं मिळून बारा एकांकिका लिहिल्या, ज्यामध्ये तुम्हाला आहना नावाची माझी मैत्रीण भेटेल, माझ्या घरातले मुंगळे भेटतील, रबऱ्या नावाचा राक्षस भेटेल. ही सगळी माझी माणसं आहेत. तुम्ही या जगात शिरू शकाल आणि तुम्हाला हे जग तुमचं वाटल्याशिवाय राहणार नाही, अशी जादू मी त्यात टाकली आहे. अट एकच, तुम्हाला थोडंसं लहान होऊन वाचावं लागेल. पालकांना मला इथं सांगायचं आहे की जर मुलं चांगलं वाचतील, तर चांगलं लिहू शकतील, चांगलं लिहितील तर त्याचं सादरीकरण चांगलं होईल, चांगलं सादरीकरण केलं तर आपोआप पुढची पिढी घडेल. लेखक युवराज शहा सर, बालनाट्य दिग्दर्शक आणि माझे वडील संजय पेंडसे, नेपथ्यकार, मुखपृष्ठ चित्रकार आणि माझा काका सतीश पेंडस यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं हा दुग्धशर्करायोग. रत्नाकर मतकरी सरांच्या पुस्तकातली माणसं खरीखुरी असती, तर किती मज्जा आली असती अशी परिकल्पना मी बालपणी केली होती; पण या वेळेस वास्तविक जगातली माणसं नाटकातील पात्र बनून तुमच्यासमोर उभी राहतील. ‘सेल्फी’मध्ये प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, ‘टिरा’मध्ये वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऋता कळमणकर आणि ‘पासवर्ड’मध्ये पुण्यातील चीफ हॅकिंग ऑफिसर सुमित प्रभुणे आहेत. मला बालमित्रांना काही सांगायचं आहे. नाटकाचं पुस्तक तुम्हाला लिहावंसं वाटत असेल तर नुसतंच वाचून चालणार नाही, तर आजूबाजूचं जग उघड्या डोळ्यांनी पाहणं आणि पाच इंद्रियांनी घेतलेले अनुभव टिपून ते कागदावर उतरवण्याची सवय करून घ्यावी लागेल. आणि हो, लिहून झाल्यावर वाचकांनी नुसतंच वाचून चालणार नाही तर नाटकाच्या पुस्तकाचं नाटकात रूपांतर जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थानं पुस्तकाचा जग-प्रवास सुरू झाला असं समजावं. साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी  सुफळ संपूर्ण.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image