esakal | डिझाइनच्या माध्यमातून सामावलेपणाचा ‘पाया’
sakal

बोलून बातमी शोधा

artist designer

आर्किटेक्ट आणि इंटिरिअर डिझायनर म्हणून छान आयुष्य चाललं असताना कविता मुरुगकर यांच्या आयुष्यात एक वळण आलं. मातृत्वाचा आनंद घेत असताना पहिल्या दीड वर्षातच मुलगा स्वमग्न असल्याचं निदान झालं.

डिझाइनच्या माध्यमातून सामावलेपणाचा ‘पाया’

sakal_logo
By
कविता मुरुगकर

प्रत्येक डिझाइननं मानवी गरजा पहिल्यांदा भागवल्या पाहिजेत आणि त्यानंतर सौंदर्यविषयक गोष्टींचा विचार झाला पाहिजे. शारीरिक क्षमता नसलेल्या लोकांना जे डिझाइन वापरता येणार नाही, ते चुकीचं आणि बेजबाबदार डिझाइन आहे.

आर्किटेक्ट आणि इंटिरिअर डिझायनर म्हणून छान आयुष्य चाललं असताना कविता मुरुगकर यांच्या आयुष्यात एक वळण आलं. मातृत्वाचा आनंद घेत असताना पहिल्या दीड वर्षातच मुलगा स्वमग्न असल्याचं निदान झालं. पती अभिजित आणि त्यांनी हे वास्तव लगेच स्वीकारलं आणि काय करता येईल याबाबत प्रयत्न सुरू केले. एकीकडे हे प्रयत्न सुरू असताना समाजाकडून मात्र त्यांना तितके चांगले अनुभव आले नाहीत. अनेकांच्या मनात भिंती असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. अनेक शाळांनी प्रवेश नाकारला आणि ज्या शाळा मुलाला स्वीकारायला तयार होत्या, त्यांच्याकडे अशा विशेष मुलाकडे लक्ष द्यायचं प्रशिक्षण नव्हतं आणि त्याबाबत पायाभूत सुविधा नव्हत्या. आपण एकूणच सगळ्या सुविधा ‘नॉर्मल’ लोकांना गृहीत धरून निर्माण केल्या आहेत आणि शारीरिक, मानसिक क्षमता कमी असणाऱ्यांना लक्षात घेतलं नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये शिकवत असताना, अनेक वास्तूंचं आर्किटेक्चर आणि डिझाइन हे दिव्यांग व्यक्तींसाठी अडथळा आणत असल्याचंही त्यांच्या लक्षात आलं आणि त्यातूनही अक्षरशः ‘भिंती’ तयार होत असल्याचं लक्षात आलं. 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळेच त्यांनी ‘चेंजमेकर’ बनायचं ठरवलं आणि आर्किटेक्चर आणि डिझाइन यांच्या माध्यमातून दिव्यांग, विशेष व्यक्तींना प्रवाहात समाविष्ट करून घ्यायचं मिशन हाती घेतलं. काम अवघड होतं. पती, इन्स्टिट्यूट, सहकारी, विद्यार्थी यांच्या मदतीनं त्यांनी मग ‘युनिव्हर्सल डिझाइन सेंटर’ हा प्लॅटफॉर्म तयार केला आणि विविध गोष्टी करायला लागल्या. विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, दिव्यांगांना पोषक सुविधांसाठी संशोधन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार अशा गोष्टींमध्ये त्यांनी गुंतवून घेतलं. आपलं काम सर्वसमावेशक बनावं यासाठी त्या अगदी वर्गापासून इतर कामांपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये दिव्यांग व्यक्तींनाही जाणीवपूर्वक सहभागी करून घेऊ लागल्या. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हळूहळू मुरुगकर यांच्या कामाची दखल घेतली जाऊ लागली. त्यांनी दिव्यांगांसाठी पोषक आणि पूरक डिझाईन्स तयार करण्‍यासाठी देशभरातल्या हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आहे. केंद्र सरकारनंही त्याची दखल घेतली असून, त्या आता भारतातल्या नामांकित ‘युनिव्हर्सल ॲक्सेस स्पेशालिस्ट’ म्हणून नावाजल्या जात आहेत. ‘सुगम्य भारत अभियान’मध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, महाराष्ट्रातल्या शंभर इमारती दिव्यांग-पूरक बनवल्या आहेत. त्या देशभरातल्या अनेक वारसास्थळांना भेटी देत असतात. या वारसास्थळांमध्ये दिव्यांगांनाही सहजपणे फिरता यावं यासाठी सांस्कृतिक मंत्रालयानं त्यांना प्रकल्प देऊ केला. आविष्कार पुरस्कार, एनसीपीईडीपी एम्फसिस पुरस्कार यांच्याबरोबर नुकताच संयुक्त राष्ट्रांकडून ‘झीरो प्रोजेक्ट’ पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. दिव्यांगासाठी ‘हेरिटेज वॉक’; तसंच एकाच वेळी बघता, अनुभवता आणि ऐकताही येईल अशा प्रकारचं विशेष प्रदर्शन अशा नावीन्यपूर्ण कल्पना त्यांनी लढवल्या आहेत.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एका विशेष मुलाच्या आईकडून ‘चेंजमेकर’पर्यंतचा प्रवास त्यांनी केला. त्यांनी साकार केलेल्या कल्पनांतून विशेष व्यक्तींच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान हा त्यांच्या दृष्टीनं सर्वांत मोठा पुरस्कार आहे. प्रत्येक इमारत, रस्ता, शहर हे दिव्यांगासाठी पूरक असलं पाहिजे असं त्यांचं स्वप्नं आहे. पती अभिजित यांच्या समवेत त्यांनी या संदर्भात ‘डिझाइन ब्रिज फाऊंडेशन’ ही संस्था सुरू केली आहे. त्याचं काम संपलेलं नाही. कामाची इमारत अजून उभारली जात आहे...मात्र त्याचा पाया त्यांनी रचला आहे हे मात्र खरं! 

loading image
go to top