esakal | माझे मनो‘गीत’ 
sakal

बोलून बातमी शोधा

माझे मनो‘गीत’ 

तुम्हाला कधी सुचलं आहे का हो एखादं गाणं? गाणं, कविता, लेख सुचलं नाही तरी चालेल; पण तुम्ही केला आहात का स्वतःशी संवाद? नसेल केला तर जरूर करा. आपल्या आतला आवाज ऐकण्याचा प्रवास करा.

माझे मनो‘गीत’ 

sakal_logo
By
रानी (राधिका देशपांडे), अभिनेत्री

एक गाणं गुणगुणते आहे काही दिवस झाले. अक्षरं आहेत काही जुळून आलेली. 
तारारी तारारी तारारू 

एक म्हणणं आहे बऱ्याच दिवसांपासून. छोट्याशा जीवाला आपलीशी वाटणारी धून आहे. 
मनात उसळणाऱ्या लाटांना शांत करणारी लय आहे एक. सुवर्ण क्षणांची वाट आहे जणू 
झुल्यावर बसून झुळझुळ वाऱ्याची झुळूक जणू. नदीच्या पल्याड असलेल्या एका बकुळीच्या झाडावरच्या एका फुलाचा गंध आहे जणू 
तारारी तारारी तारारू 

आकाशातल्या ताऱ्यांना खाटेवर निजून मोजणे जणू. चांदीच्या वाटीत केशरयुक्त खीर आहे एक. 
दुडूदुडू धावणाऱ्या बाळाच्या मुखातून खळखळणारे शब्द जणू. शब्दांच्या पेटीतून फुलपाखरा सारखी उडालेली ही अक्षरं आहेत काही 
तारारी तारारी तारारू 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्या मुंबई-पुणे-मुंबई असा सातत्यानं प्रवास होतो आहे. अनेकदा प्रवास एकट्यानं होतो. कार चालवत असताना स्वतःचं मनोरंजन करायचं झालं, की मी पुस्तकं ऐकते, पॉडकास्ट ऐकते आणि माझी आवडणारी गाणी ऐकते. कधी नवीन, जुनी, इंग्रजी, हिंदी आणि मराठीतली, एकानंतर एक. त्यामुळे सगळी इंद्रियं कामात असतात. कानांवर सतत काहीतरी पडत असतं, ऐकू येत असतं आणि मग विचारांची एक शृंखला तयार होते. विचारांची मांडणीही तयार होते. तोंडी गणित सोडवल्यासारखं असतं सगळं. म्हणजे स्वतःला प्रश्न पडतात आणि पडलेल्या प्रश्नांची मांडणी करून त्यातून निष्कर्ष काढल्यासारखं. किंवा मग भूलभुलय्याचा खेळ एकटीनेच खेळायचा आणि त्यातून स्वतःच बाहेर पडायचं. कधीकधी एक एकाकी कोळ्याचं जाळं मी विणावं आणि त्यात अडकतील ते प्रश्न सुटणार नाहीत म्हणून ते तसेच अडकवून ठेवावे. त्यावर पाणी पडण्याची वाट बघावी. हा मुंबई-पुणेचा द्रुतगती मार्ग रुंद, स्वच्छ, वळणांचा आणि हवाहवासा आहे. कारच्या आतमध्ये विचारांची घुसळण होत असते; पण कारच्या बाहेर बघायला मिळालं, तर तुम्हाला दिसते हिरव्या हिरव्या रंगांची झाडी. घनदाट, गोल गोल वळणांची झोकदार वाट आणि मग तुमचं स्वतःच एक गाणं तयार होतं. असंच एक अघळपघळ गाणं... नाही... कविता... नाही... भावना... भिरभिरणारे विचार? झिरमिरणाऱ्या पावसासारखा शब्दांचा सडा? का कारच्या काचेवर आपटणाऱ्या शब्दांना वायपरनं भिरकावून लावलेले काही तुषार जणू. का मोकाट सुटलेल्या वाक्यांना कारच्या वाढत्या गतीनं मिळालेली वाट. शब्दांचे खेळ नुसते. बेधुंद होऊन शब्दात उतरणारे विचार थोडके. मोडक्या शब्दांना प्राजक्ताच्या फुलासारखं उचलून स्वतःवर केलेला सुगंधी वर्षाव जरासा. प्रवास मला आवडतो. ‘स्व’चा स्वतःशीच केलेला संवाद असतो तो. सगळीकडे, सगळ्या ठिकाणी हजारो लोक; पण तरीही एकटेपणा शिवतोच नाही आपल्याला? पण इथं तसं नसतं. इथं तसं नाही. इथं संवाद आहे माझ्याशी केलेला. इथं काही स्वप्नांनी घेतलाय आकार, काही अस्फुट शब्दांना फुटलाय पाझर, काही इच्छांचा बहरलाय वेल. हे गाणं मी गुणगुणते आहे सारखं… 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्हाला कधी सुचलं आहे का हो एखादं गाणं? गाणं, कविता, लेख सुचलं नाही तरी चालेल; पण तुम्ही केला आहात का स्वतःशी संवाद? नसेल केला तर जरूर करा. आपल्या आतला आवाज ऐकण्याचा प्रवास करा. मग हवं तर डोंगर चढून गेल्यावर करा, नद्या ओलांडताना करा, दऱ्याखोऱ्यातून वाट काढताना करा. हवं तर तुम्हीसुद्धा मुंबई-पुणेचा प्रवास करा. आणि ‘तारारी तारारी तारारारू’सारखं गाणं तुम्हालाही सापडतं आहे का सांगा; पण आपल्या आतलं गाणं ऐकण्याचा प्रयत्न करा.