माझी आई ‘ऑल राउंडर’

निकिता पाटील, अभिनेत्री
Saturday, 14 November 2020

माझी आई मनीषा प्रकाश पाटील-कडलग. ती पहिल्यापासूनच सामाजिक कार्यात सहभागी होत आहे. संघटनकौशल्य, उत्कृष्ट वक्तृत्व, धारिष्ट्य असलेली; संयमी  आणि पाठबळ देणारी.

आपल्या घरातलं वातावरण कसं असतं, यावरच मुलांची जडणघडण होते. त्यात सर्वांत मोठा वाटा असतो तो आईचा. खरं तर प्रत्येकासाठी आई ही आयडॉल असते. माझ्यासाठीही ती आयडॉल आहे. माझी आई मनीषा प्रकाश पाटील-कडलग. ती पहिल्यापासूनच सामाजिक कार्यात सहभागी होत आहे. संघटनकौशल्य, उत्कृष्ट वक्तृत्व, धारिष्ट्य असलेली; संयमी  आणि पाठबळ देणारी. सतत क्रियाशील असणारी माझी आई गेल्या २२ वर्षांपासून सर्वधर्मसमभाव जोपासत चाळीसगाव येथील जिजाई महिला मंडळ, महिला दक्षता समिती, इनरव्हील क्लब ऑफ मिल्क सिटी आदी संस्थांमध्ये कार्यरत आहे. त्याचबरोबर गेल्या पंधरा वर्षांपासून ती शहरी व ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन मुलींसाठी ‘उमलती कळी’ या कार्यक्रमाअंतर्गत मुलींच्या मानसिक व शारीरिक बदलाबद्दल व तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना होणारे संभाव्य धोके व घ्यावयाची दक्षता, याबद्दल मार्गदर्शन करत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

माझ्या अभिनयाची प्रथम गुरू तसेच प्रथम कोरिओग्राफर माझी आईच आहे. शाळेतील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात तिनं मला सहभाग घ्यायला लावला. त्यासाठी ती तयारी करून घेत होती. तिला खरं तर इंजिनिअर व्हायचं होतं; पण ते स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यामुळे तिनं मला पुण्यातील जेएसपीएम कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं. इंजिनिअरिंग करताना मला अभिनयाचीही गोडी लागली आणि मी त्यासाठी प्रयत्न करू लागले. वयाच्या पाचव्या वर्षी मी कथक क्लासला गेले. चाळीसगावसारख्या शहरात तेव्हा कोणतेही पालक या क्षेत्रात मुलींना पाठवत नव्हते; पण माझ्या आई-वडिलांनी मला सपोर्ट केला. मी स्वभावानं लाजरी, कमी बोलणारी होते. त्यामुळे माझ्यात स्टेज डेअरिंग येण्यासाठी दोघांनीही प्रयत्न केले. आई मला कथक क्लासला घेऊन जात होती. क्लास संपेपर्यंत तिथं थांबत होती. माझी बहीण लहान असतानाही आईनं मला कथक विशारद करायला प्रोत्साहन दिलं. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मला लागलेली अभिनयाची गोडी पाहून आई-वडिलांनी स्पर्श फिल्म प्रायव्हेट लिमिटेड हे होम प्रॉडक्शन सुरू केलं. त्यातली पहिली शॉर्टफिल्म नेत्रदान व देहदान या विषयावर केली. त्यात मी अंध मुलीची भूमिका साकारली. तिथूनच मला कॅमेऱ्याचं तंत्रज्ञान शिकायला मिळालं. त्यानंतर ‘आइस्क्रीम’, ‘एक रुपया’ या शॉर्टफिल्‍म्स केल्या. ‘आसूड’ शॉर्टफिल्मच्या निमित्तानं मी मोटारसायकल चालवायला शिकले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इंजिनिअरिंग करत असताना ‘शिवभक्त’ व ‘पारधाड’ चित्रपट केले. आईनं मला फक्त शिक्षणच कर, असा आग्रह धरला नाही, तर जिथं ऑडिशन असतील तिथं जाण्यासाठी भाग पाडलं. अनेकदा ती माझ्याबरोबरही आली. हे करत असताना माझे वडील डॉ. प्रकाश पाटील आणि बहीण सिव्हिल इंजिनिअर परमेश्वरी पाटील यांनी मला पाठबळ दिलं. मी नाट्यशास्त्राचा कोर्स केल्यामुळे ‘वऱ्हाड आलंय लंडनहून’ या नाटकात फॉरेनर मुलीची भूमिका साकारली. त्याचे अनेक प्रयोगही झाले. त्याचबरोबर अनेक जाहिरातींमध्येही काम केलं.

मी सध्या ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेमध्ये भिंगरीची भूमिका साकारत आहे. भिंगरी ही घरभर वावरणारी, निरागस, स्पष्टवक्ती, चुलबुली, सर्वांची काळजी घेणारी अशा पद्धतीची आहे. या भूमिकेमुळे माझ्यातील कलागुणांना वाव मिळाला. आगामी काळातही मी अशाच प्रकारे विविधांगी भूमिका साकारणार आहे.(शब्दांकन : अरुण सुर्वे)  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about nikita patil actress

Tags
टॉपिकस
Topic Tags: