वूमनहूड : ओवाळते रे भाऊराय... 

रानी (राधिका देशपांडे), अभिनेत्री 
Saturday, 1 August 2020

‘फादर डे’, ‘ब्रदर डे’ नसून, पाडवा, भाऊबीज असे सण असतात, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन तो साजरा केला जातो. पुराण काळापासून चालत आलेला राखी पौर्णिमेचा सण अजूनही तितक्याच हर्षोल्लासाने साजरा होतो.

काळजी घ्या, सुरक्षित रहा असं एव्हाना हजार वेळा ऐकून झालं असेल सर्वांचं, नाही? नकळत सुरक्षेचं कवच आपण चढवून बसलो असूच, मात्र आज सुरक्षा या शब्दाला वेगळंच महत्त्व आलं आहे. घर आणि घरातल्या सर्व कुटुंबीयांना जपणाऱ्या स्त्रीला याचं महत्त्व बालपणापासूनच शिकवलं जातं. ‘बाईची जात आहेस, जरा जपून,’ हे वाक्य प्रत्येकीनं ऐकलं असेल. याचं ओझं ही वाटलं असेल, परंतु मग भावाला बघितल्यावर दुसऱ्याच क्षणी हे ओझं नाहीसंही झालं असेल. भावाचं असणं हेच पुरेसं असतं नाही? ‘ताई मी आहे, तू कसलीही काळजी करू नकोस. मी असताना कोणाची हिंमत आहे तुला त्रास देण्याची? हिम्मत असेल तर समोर ये म्हणावं. ताई तू निर्धास्त रहा. बघून घेईन मी एकेकाला...’ अशी वाक्यं भावानं घेतली की ती घर करून बसतात मनात बहिणीच्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा काही दिवसांत येते आहे. मी यंदा घरीच राखी बनवायला घेतली आहे. मला १२ भाऊ आहेत. राखी बनवत असताना सर्वांची आठवण येणं सहाजिक आहे. त्यांच्या डोळ्यांत माझ्याबद्दल वाटणारं कवतुक, निखळ प्रेम आणि अभिमान याची छबी कल्पनाशक्तीतून मी पाहते आहे. काही जणांना व्हर्च्युअली भेटणार, तर श्रीरंग दादाला आणि फुलासारख्या छान वहिनीला भेटून त्याच्या घरीच त्याला राखी बांधणार. तर माझा सख्खा लहान भाऊ कल्याण माझ्याकडून राखी बांधून घ्यायला ऊन, वारा, पाऊस कितीही असो, तो येणार. राखी बनवायला घेतली आहे आणि भावूक होणं स्वाभाविक आहे. हे प्रत्येक बहिणीला पटेल. तुमची राखी कशी असणार आहे? माझ्या राखीत यंदा मला हिरे, पाचू, माणिक, मोती, मखमल, चमचमती काठ आणि रेशीम दोरा वापरावासा वाटतो आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या भारतीय संस्कृतीत दिवस साजरे करण्याऐवजी सण साजरे करण्याला जास्त महत्त्व आहे. ‘फादर डे’, ‘ब्रदर डे’ नसून, पाडवा, भाऊबीज असे सण असतात, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन तो साजरा केला जातो. पुराण काळापासून चालत आलेला राखी पौर्णिमेचा सण अजूनही तितक्याच हर्षोल्लासाने साजरा होतो. भारतात ‘माझं कोणीच नाही, मी एकटा आहे,’ या भावनेला खतपाणी न घालता ‘सारं जग आपलं आहे,’ अशा विचारांचे बीज रुजवतात. तसेच भारतात राखी पौर्णिमा हा सण प्रत्येक व्यक्ती साजरा करतो. जिला भाऊ नाही ती सीमेवरच्या भारतीय जवानांना राखी पाठवते. जात-पात न पाहता मानलेले भाऊ बहीण राखीचा सण साजरा करताना दिसतात. एवढंच काय, पक्षी, प्राणी, निर्जीव गोष्टींनाही आपण राखी बांधून हा सण साजरा करतो. हे बंध रेशमी आहेत ज्यामध्ये माया, प्रेम, वात्सल्य ओसंडून वाहतं. या सणात मायेचा ओलावा आहे, सख्य आहे, मैत्री आहे, जबाबदारी आहेच, पण त्यात निःस्वार्थ प्रेमाची झालर आहे. राखी पौर्णिमेत माहेरचा ओलावा आहे, प्रेमाची शिदोरी आहे, खायला गोड गोड खाऊ आहे, राखी बांधल्यावर हातात मिळणारी ओवाळणीही नक्की आहे. हे नातं वर्षागणीत घट्ट होत जाणारं आहे. मैत्रिणींनो, आपल्या वडिलांनंतर आपण कोणाकडं बघत असू तर तो आपला भाऊ असतो, नाही? त्याचं एक अढळ स्थान असतं. मदतीसाठी पुढं आलेला त्याचा पहिला हात असतो. मी आज कुठल्याही अजातशत्रूचा सामना करू शकते कारण ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे,’ याची हमी देणारा भाऊ आहे. कुठल्याही संकटात अडकल्यावर त्यातून बाहेर काढण्यासाठी तो पुढे असतो. या सणाचा एखाद्या हिंदी सिनेमातला सीन असो किंवा एखाद्या चॉकलेटची ॲड असो, आपण सगळेच त्या नाटकीय सादरीकरणाशी एकरूप होतो. असे क्षण वर्षातून फार कमी वेळा येतात आणि ते साजरे केले गेलेच पाहिजे. आपण २०२०च्या सुरुवातीपासून कुठलाही सण मोकळेपणाने साजरा करू शकलेलो नाही. मी माझ्या दोन सुरक्षा कवचांबरोबर (भाऊ आणि मास्क) हा सण काळजीपूर्वक साजरा करणार आहे. या वेळेला माझ्या भावांच्या सुरक्षेची प्रार्थना करत मी सर्व भारतीय बांधवांसाठी अधिक बळ मागणार आहे. 

सर्व बंधू भगिनींना राखी पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about Raksha Bandhan