परंपरेचे सीमोल्लंघन 

आशिष तागडे 
Saturday, 17 October 2020

नव्या संकल्पनेमुळे वंदनाच्या डोळ्यात वेगळीच चमक निर्माण झाली. इतक्या वर्षात आपल्याला ही कल्पना कशी सुचली नाही, असे वाटले आणि पूर्वाचा प्रस्ताव मनोमन पटला.

‘‘अहो, सासूबाई यावेळी कुमारिका मिळणे अवघडच आहे. कोरोनामुळे कोणाला बोलवायचे हा प्रश्नच आहे. अष्टमीला एखाद्या कुमारिकेला बोलावून तिला शिधा देऊन पूजा करीन. काय करणार इच्छा खूप आहे. परंतु परिस्थितीमुळे काहीच करता येत नाही...’’ वंदना फोनवर सासूबाईंना सांगत होती. सासूबाई न चुकता नवरात्रात येत असतात. वंदनानेही त्यांनी घालून दिलेला शिरस्ता कायम ठेवला आहे. नोकरी, घरातील सर्व कामे सांभाळून वंदना मोठ्या निगुतीने देवाचे सर्व व्यवस्थित करते, याबद्दल सासूबाईंना तिच्याबद्दल प्रचंड आत्मीयता होती. त्यांनीही मोठ्या मनाने, ‘तुला जेवढे झेपेल, शक्य असेल ते कर,’ असे सांगितल्याने वंदनाचे टेन्शन कमी झाले होते. आईचा आणि आजीचा संवाद पूर्वा ऐकत होती. कॉलेज बंद असले काही कामानिमित्ताने तिला बाहेर जायचे असल्याने आवराआवरी चालली होती. आजीशी बोलूनही आईच्या मनात काहीतरी घालमेल चालल्याचे पूर्वाच्या लक्षात आले होते. ती आईला म्हणाली, ‘‘कसला विचार करत आहेस? आजीने समजावून सांगितले आहे ना?’’ त्यावर वंदना म्हणाली, ‘‘अगं, वर्षातून एकदा नवरात्र येते, त्यातही कुमारिकेचे पूजन करायचे नाही, म्हणजे कसे?’’ 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पूजाला गंमत वाटली. ती आईला सहज म्हणाली, ‘‘आई, आपण ना अष्टमीला एका अनाथालयात जाऊ. परवा तू पेपरमध्ये वाचलेच असेल, एक बाळ झुडपात सापडले आणि त्याला त्या संस्थेत नेले आहे. त्याला आईची किती आठवण येत असणार. लहानपणी एकदा गर्दीत माझा हात सुटल्यावर तू किती अस्वस्थ झाली होतीस. अनाथालयात अनेक लहान मुली असतात, त्यांचे यानिमित्ताने पूजन करायला काय हरकत आहे? त्यांनाही ते आवडेल. वाटल्यास त्या संस्थाचालकांशी मी बोलते. त्यांची परवानगी काढण्याची जबाबदारी माझी. यामुळे आपल्यालाही मानसिक समाधान मिळेल. आणि खऱ्या अर्थाने ज्यांना आवश्यकता आहे, त्यांच्यापर्यंत आपला शिधा पोचेल. नवरात्रीशिवायही आपण शिधा देऊ शकतो. आणि माझ्या मते देवीलाही हे पूजन नक्कीच आवडेल.’’ 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पूर्वाच्या या नव्या संकल्पनेमुळे वंदनाच्या डोळ्यात वेगळीच चमक निर्माण झाली. इतक्या वर्षात आपल्याला ही कल्पना कशी सुचली नाही, असे वाटले आणि पूर्वाचा प्रस्ताव मनोमन पटला. हाच पायंडा दरवर्षी पाडायला काय हरकत आहे, याचा विचार तिच्या मनात सहजतेने आला. पूर्वाच्या विचार करण्याच्या पद्धतीचे तिला अप्रूप वाटले आणि तिने लगेच परवानगी दिली. पूर्वानेही पडत्या फळाची आज्ञा मानून पुढील सर्व सोपस्कार पूर्ण केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about tradition