esakal | पालकत्व निभावताना : आई, खायला काहीतरी चांगलं कर ना!
sakal

बोलून बातमी शोधा

Mother

देवयानी पहाटेच उठली होती. तिची आजपासून डे शिफ्ट होती. सकाळी सातला कोणत्याही परिस्थितीत ऑफिसला पोचणे क्रमप्राप्त होते. घर ते ऑफिस कॅबसेवा असल्याने सकाळी सव्वासहा वाजता तिला तयार राहावे लागणार होते.

पालकत्व निभावताना : आई, खायला काहीतरी चांगलं कर ना!

sakal_logo
By
आशिष तागडे

देवयानी पहाटेच उठली होती. तिची आजपासून डे शिफ्ट होती. सकाळी सातला कोणत्याही परिस्थितीत ऑफिसला पोचणे क्रमप्राप्त होते. घर ते ऑफिस कॅबसेवा असल्याने सकाळी सव्वासहा वाजता तिला तयार राहावे लागणार होते. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

घरात ती, नवरा आणि सहावीत शिकणारा मुलगा मिथिलेश. दोघांचा डबा आणि सकाळच्या जेवणाची सोय करून ऑफिसला पोचायचे असा देवयानीने मनाशी नक्की केले होते. त्यासाठी साडेचारचा गजर लावला. परंतु, हो-ना करता ती पाच वाजता उठली. भराभरा आवरून ती सव्वासहाला तयारही झाली. छानशी उसळ, गाजराची कोशिंबीर, भात, पोळ्या सर्व तिने डायनिंग टेबलवर ठेवून तसा निरोपही लिहून ठेवला. (सकाळी उगाच कशाला नवऱ्याची आणि मुलाची झोपमोड करायची.) आपण नोकरी करत असलो तरी घराकडे अजिबात दुर्लक्ष होऊ नये, यासाठी देवयानीचा कटाक्ष असायचा. 
किंबहुना नोकरीमुळे मुलाला गरमागरम जेवायला देऊ शकत नाही, तो शाळेतून आल्यावर त्याला हातानेच खाऊ घ्यावा लागतो याबद्दल तिच्या मनात काही प्रमाणात न्यूनगंडाची भावनाही होती. 

कधीतरी मिथिलेशने सहज आईला म्हणाला होता, ‘त्या श्रेयसची खूप मजा असते, शाळेतून घरी गेल्या-गेल्या त्याला आई गरम गरम पोहे किंवा काहीतरी खायला देते.’ देवयानीच्या मनात या वाक्‍याने घर केले होते. त्या दिवसापासून तिने मिथिलेशच्या खाण्याकडे लक्ष देण्याचे ठरविले होते. त्यात पहिल्याच आठवड्यात तिला डे शिफ्ट सुरू झाल्याने मिठाचा खडा पडला. आपली कितीही ओढाताण झाली तरी चालेल, घराकडे दुर्लक्ष करायचे नाही, हे तिने मनोमन ठरविले होते. 

मिथिलेश शाळेतून यायच्या आत आपण घरी पोचायचे, असा तिचा प्रयत्न होता. मात्र, ऑफिसमधून निघताना अचानक आलेले काम, ट्रॅफिक यांमुळे तिला घरी पोचायला साडेसहा वाजले. घरात आल्या आल्या मिथिलेशने नाराजीच्या सुरात, ‘काय गं आई, काय उसळ केली होती, गार असल्याने चांगली लागली नाही. काही तर चांगले खायला कर.’ 
आता मात्र देवयानी आणखीनच खजिल झाली. पहाटे उठल्यामुळे सहाजिकच दिवसभराची एनर्जी टिकवून ठेवणे तिला सायंकाळी थोडे अवघड झाले. कितीही थकवा असला तरी तो चेहऱ्यावर न दाखविता देवयानी सायंकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली. मिथिलेशच्या हे लक्षात आले. सहजच तो म्हणाला, ‘आई, तशी उसळ छान झाली होती, पण गार होती ना. पण मी तुला आता स्वयंपाकाला मदत करतो.’ या वाक्‍याने देवयानीचा थकवा कोठल्या कोठे पळून गेला होता. 

उत्साहात तिने स्वयंपाक केला आणि बाबा ऑफिसमधून येईपर्यंत मिथिलेशला नोकरी करण्याची अगतिकताही समजून सांगितली. मुलाच्या समजूतदारपणावर खूश होत देवयानी दुसऱ्या दिवशीच्या तयारीला लागली आणि इकडे मिथिलेश होम ‘वर्क’च्या..!

loading image