पालकत्व निभावताना... : अनुकरणातून शिक्षण

Parenting
Parenting

शनिवारी सायंकाळची वेळ. रसिका स्वयंपाक करत होती. अचानक गॅस गेला. पती अविनाशची ऑफिसमधून येण्याची वेळ झाली होती. तो येण्यापूर्वी स्वयंपाक करण्याची रसिकाची धावपळ सुरू होती. त्यातच गॅसने अचानक दगा दिल्याने तिची धांदल उडाली. तिने तातडीने रोहितला हाक मारली. ‘रोहित, अरे जरा भरलेला सिलिंडर घेऊन ये.’

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रोहित सिलिंडर घेऊन येताच रसिकाने त्याला सिलिंडर बदलायला सांगितला. ‘अरे, माझा हात कणकेचा आहे. तूच बदल,’ असे सांगताच रोहित म्हणाला, ‘आई, अगं मला नाही सिलिंडर बदलता येत.’ त्यावर रसिका म्हणाली, ‘अरे, आता तू कॉलेजला जाणार, या कामांची तुला माहिती पाहिजेच. आणि कोणत्याही कामाची कधीतरी सुरुवात करावी लागतेच ना? माझे हात खराब आहेत, म्हणून तुला सांगितले. घाबरू नकोस मी शेजारी थांबते, आज तूच सिलिंडर बदलायचा.’ आईने थेट आव्हान दिल्याने रोहित सिलिंडर बदलायला तयार झाला. त्याला गॅस भरलेल्या सिलिंडरची साधी कॅपही काढता आली नाही. त्यावर ‘अरे सोपे आहे,’ असे म्हणत रसिकाने दोरी ओढून कॅप कशी काढायची ते दाखवले. रिकामा सिलिंडर ओट्याबाहेर घेऊन व्हॉल्व्ह कसा काढायचा, हे तिने रोहितला सांगितले.

आईच्या सूचनेनुसार त्याने दोन मिनिटांत सिलिंडर बदलला. ‘आई, बरं झाले तू मला आज सिलिंडर बदलायचे कसा ते सांगितले,’ असे म्हणत रोहितने रिकामा सिलिंडर जागेवर नेण्यासाठी हलविला. त्यावर काही आकडे होते. सहजच उत्सुकता म्हणून त्याने आईला आकड्यांबाबत विचारले. काही महिन्यांपूर्वी तिने व्हॉट्सॲपवर याबाबत पोस्ट वाचली होती. सिलिंडर द्यायला आलेल्याकडे त्यावर तिने विचारणाही केली होती. त्यानेही त्यातील बारकावे सांगितले होते. ते तिच्या चांगलेच लक्षात राहिले आहे. ‘अरे, सिलिंडरला एक्सपायरी असते बरं का,’ असे रसिकाने सांगितले. सिलिंडरलाही एक्सपायरी असते हे ऐकून रोहित चांगलाच बुचकाळ्यात पडला. ‘कुठे असते एक्सपायरी?’ असा आईला प्रश्‍न केला. त्यावर एकीकडे स्वयंपाक करत असताना रसिकाने सिलिंडरवरील आकडे आणि इंग्रजी अक्षरे वाचायला सांगितली. ABCD म्हणजे काय ते सांगितले. A २६ लिहिले असेल तर ए म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च असे तीन महिन्यांचे सिम्बॉलिक आहे. याचा अर्थ त्या सिलिंडरमध्ये गॅस साठवून ठेवण्याची क्षमता मार्च २०२६ पर्यंत आहे असा होतो. आईने दिलेल्या या माहितीने रोहित थक्क झाला.

त्यावर रसिका म्हणाली, ‘अरे रोहित या अगदी सोप्या गोष्टी असतात, तुम्हा मुलांचे त्याकडे लक्ष नसते. अगदी परवाचेच उदाहरण पाहा ना. मी इस्त्री करत असताना अचानक छोटा आवाज झाला आणि आपल्या घरातील दिवे गेले. आपल्याला वाटले वीज गेली. मात्र शेजारच्यांच्या टीव्हीचा आवाज ऐकून आपल्याच घरातील वीजपुरवठा खंडित झाल्याचे लक्षात आले. बाबांना ऑफिसला फोन करून सांगताच ते म्हणाले, ‘गेल्या वर्षीच आपण संपूर्ण घराचे लाइट फिटिंग नव्याने केले आहे. हॉलमध्ये जा. दाराच्यावर मेन स्वीच आहे. ते ट्रिप झाले असेल. तो खटका वर करा. दिवे येतील. आपण तसे करताच घरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला.’

‘आई तू म्हणतीस ते बरोबर आहे. आता मी पण या छोट्या-छोट्या गोष्टी शिकून घेणार,’ असे रोहितने म्हणताच रसिका आनंदली. तोपर्यंत तिचा स्वंयपाकही झाला होता. आता रोहितचे अनुकरणातून शिक्षण सुरू झाले होते...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com