पालकत्व निभावताना... : पांडुरंग हरी... वासुदेव हरी...!

Aashadhi-Ekadashi
Aashadhi-Ekadashi

‘बाबा, अरे तू गेल्यावर्षी गेला होता ना वारीला, या वर्षी नाही गेलास का? तनूच्या प्रश्‍नाने नितीन एकदम भूतकाळात गेला. चार वर्षांपासून तो वारीला जात आहे. यावर्षी त्यात खंड पडला होता. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘अरे, बाळा यावर्षी कोरोनामुळे नाही आले करता नियोजन.’ अशी त्याने तनूची समजूच काढली. ‘बाबा तू मला गेल्यावर्षी किती खेळणी, ते बाप्पाचे गंध, तुळशीची माळ, टाळ आणले होतेस रे, मजा वाटली होती खूप. शेजारचे शंकर आजोबाही दरवर्षी वारीला जातात. यावर्षी जाता येणार नाही म्हणून परवा त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. आम्ही सायकल खेळताना त्यांना पाहिले. आईला विचारले तर ती म्हणाली, ‘गेली ४०वर्ष आजोबा न चुकता वारीला जातात. मात्र यावर्षी जायला मिळाले नाही म्हणून त्यांना वाईट वाटले. त्यांना वाटत आहे की, घरातली मंडळी जाऊ देत नाहीत. मात्र कोरोनामुळे यावर्षी कोणीच जाऊ शकले नाही ना.’ तनूने एका दमात सारे सांगून टाकले.

तनूची, नितीनची आणि शंकर आजोबांची अवस्था नंदिनीच्या लक्षात आली. आषाढी जवळ येत होती तसे शंकर आजोबांचे कशात लक्ष लागत नव्हते, हेही तिने जाणले होते. नंदिनीला एकदम एक कल्पना सुचली. तिने सोसायटीतील बच्चेकंपनीला गोळा केले. अर्थात सुरक्षित अंतर ठेवून, मास्क वापरून. सर्वांना तिने कल्पना सांगितली. 

सर्वांचे डोळे एकदम चमकले. गेल्या वर्षी तनूच्या शाळेत दिंडीच्या उपक्रमासाठी तिने घरातील खोकी वापरून पालखी तयार केली होती. तशीच आता तयार करणार होती. अथर्व गेल्यावर्षी पांडुरंग झाला होता, त्यासाठी त्याने हौसेने तशी ड्रेपरी शिवून घेतली होती. प्रश्‍न रखुमाईचा होता. मुग्धाकडे तिच्या मापाची नऊवारी साडी होती. त्यामुळे तोही मिटला. सर्वांनी आषाढी एकादशीला सकाळी आठ वाजता सोसायटीच्या आवारात जमायचे नियोजन झाले. यंदा शाळेत वारी न झाल्याने बच्चे कंपनीत नाराजी होतीच ती दूर होऊन सगळे उत्साहाने कामाला लागले. दूर्वा तुळशी वृंदावन घेऊन निघाली. सई आणि सीमा वारकरी झाल्या. आजीने भारूड बसवले. 

एकादशीच्या दिवशी सकाळीच शंकर आजोबांच्या घरी दार वाजवले आणि सर्वजण टाळ वाजवत पुढे निघाले. घरासमोरून बालवारकरी आणि पाठोपाठ दिंडी पाहून शंकर आजोबांमध्ये उत्साह संचारला. तेही टाळ आणि अष्टगंध घेऊन दिंडीत सहभागी झाले.

सोसायटीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विठोबा-माउलीच्या जयघोषाने सोसायटी दुमदुमून गेली होती. वीस-पंचवीस मिनिटांच्या या दिंडीने सोसायटीमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले. लाडक्या विठुरायाचे अशा पद्धतीने दर्शन झाल्याने शंकर आजोबा सुखावले होते आणि त्यांचे डोळे पाणावले. त्यांच्या डोळ्यात समाधानाचे भाव पाहून नंदिनीला प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन झाल्याची अनुभूती मिळाली. सुटीमुळे कंटाळलेल्या बच्चेकंपनीच्या आनंदाला उधाणच आले होते.

शंकर आजोबांनी सर्वांना राजगिऱ्याचा लाडू प्रसाद म्हणून दिला. तोपर्यंत मुग्धाच्या आईने बाल वारकऱ्यांसाठी साबुदाण्याची खिचडी करून आणली होती. नंदिनीच्या या अनोख्या पालखीची सोसायटीत दिवसभर चर्चा होती. मुलांबरोबर ती आजोबांचीही पालक झाली होती...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com