esakal | पालकत्व निभावताना... : महिला दिन आपला आपला..!
sakal

बोलून बातमी शोधा

Womens-Day

अदिती या वेळी विशेष खूश होती. महिला दिन रविवारी आल्याने तिने खास नियोजन केले होते. सासूबाईंना चार दिवस आधीच सांगितले होते, रविवारी काही प्लॅन करू नका. आपण मस्तपैकी महिला दिन साजरा करू. विशेष म्हणजे, अदितीने घरकाम करणाऱ्या मंगलाताईला रविवारी खास सुटी घेण्याविषयी सांगितले. मंगलाताईलाही अचानक सुटी आणि तीही रविवारी का, असा प्रश्‍न सहाजिकच पडला.

पालकत्व निभावताना... : महिला दिन आपला आपला..!

sakal_logo
By
आशिष तागडे

अदिती या वेळी विशेष खूश होती. महिला दिन रविवारी आल्याने तिने खास नियोजन केले होते. सासूबाईंना चार दिवस आधीच सांगितले होते, रविवारी काही प्लॅन करू नका. आपण मस्तपैकी महिला दिन साजरा करू. विशेष म्हणजे, अदितीने घरकाम करणाऱ्या मंगलाताईला रविवारी खास सुटी घेण्याविषयी सांगितले. मंगलाताईलाही अचानक सुटी आणि तीही रविवारी का, असा प्रश्‍न सहाजिकच पडला. त्यावर अदितीने, ‘अगं, रविवारी महिला दिन आहे. निदान या दिवशी तरी जरा स्वत:साठी जग. त्यासाठी सुटी दिली आहे,’ असे सांगितले. त्यावर मंगलाताईने, ‘ताई, या दिवसाचा पगार नाही ना कापणार?’ असा प्रांजळ प्रश्‍न केला. त्यावर खळखळून हसत अदिती म्हणाली, ‘नाही करणार, काळजी करू नकोस?’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंगलाताईचा हा प्रश्‍न मात्र अदितीच्या मनात दिवसभर घोळत राहिला. कारण मंगलाताई अदितीपेक्षा पाच-सहा वर्षांनीच मोठी होती आणि तिला दोन मुले होती. त्यांच्या शिक्षणासाठी मंगलाताई दहा-बारा घरी कामे करत. दुसऱ्या दिवशी अदितीने मंगलाताईला न राहवून विचारले, ‘का गं, तू पगार कापण्याविषयी का विचारलेस?’

त्यावर मंगलाताई म्हणाल्या, ‘ताई, तो महिला दिन की काय, मला खरंच काही माहिती नाही आणि रविवारी तुम्ही सुटी दिल्यामुळे जरा शंका आली म्हणून विचारले?’ त्यावर अदितीने महिला दिन म्हणजे काय, महिलांनी कसे आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, स्वत:च्या पायावर कसे उभे राहायचे, यावर मंगलाताईंना लेक्‍चरच दिले. त्यावर हलकेसे हसून मंगलाताई म्हणाल्या, ‘ताई, तुमचे हे सगळे खरे आहे, परंतु आमच्या सारख्या महिलांना त्याचा उपयोग? ताई, मुलीच्या शाळेला फी भरावी लागत नसली, तरी तिच्या कपड्यांचा खर्च आहेच की. आताशा मुलींना जरा बऱ्यापैकी कपडे लागतात.

पोराच्या शाळेची फी, त्याचाही खर्च असतो की. ताई, एक दिवसाचा पगार कापला तरी आमच्या घरातील गणित बिघडते. कालच पोरीने प्रोजेक्‍ट का काय ते असते, त्यासाठी कागद आणायला दीडशे रुपये मागितले. आता तुम्ही एक दिवसाचा पगारा कट केला तरी तिला कागद आणण्यासाठी पैसा कोठून आणायचा हा प्रश्‍न पडतो. ताई, तो तुम्ही आता काय महिला दिन सांगितला ना, त्याची मला फारशी माहिती नाही. कारण आमच्यासाठी सगळे दिन सारखेच असतात.’

मंगलाताईच्या या उत्तराने अदिती मात्र दिग्मुढ झाली. महिला दिन प्रत्येकासाठी कसा वेगळा असतो, याचा विचार करत महिला दिनाच्या संकल्पना तिने अधिक स्पष्ट केली.

loading image
go to top