वुमन हेल्थ : सिझेरियन झाल्यावर आहार कसा असावा?

Womens-Health
Womens-Health

सिझेरियन सेक्शन झाल्यावर सर्वसाधारणपणे विचारला जाणारा प्रश्‍न हा आहाराच्या संदर्भात असतो. सिझेरियन सेक्शन झाल्यावर पुढील काही महिने कशी काळजी घ्यावी, काय खावे, काय खाऊ नये, अशा अनेक प्रकारच्या शंका प्रसूती झालेल्या महिला व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये असतात. सिझेरियन झाल्यानंतर जखम भरून येणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढणे, आरोग्याच्या बाबतीत पुनर्प्राप्ती जलद गतीने होणे, तुमचे वजन नियंत्रणात राहणे, यासाठी आरोग्यदायी आहाराची गरज असते. त्याचबरोबर शरीरात कोणतीही कमतरता न राहता अशक्तपणा येऊ नये, यासाठी देखील हे महत्त्वाचे आहे. प्रसूतीनंतर आहार हा सकस असावा. त्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वांचा समावेश असावा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

1) प्रथिने : प्रसूतीनंतर प्रथिने ही बिल्डिंग ब्लॉक म्हणून काम करतात. प्रथिनांमध्ये कोलाजन फायबर्स असतात, जे जखम भरून काढण्यास मदत करतात. शाकाहारी लोकांनी मोड आलेली कडधान्ये, विविध प्रकारच्या डाळी, पनीर; तर मांसाहारामध्ये एग व्हाइट, चिकन, मासे खाऊ शकता; ज्यामध्ये प्रथिनांचा समावेश असतो.

2) कॅल्शियम : प्रसूतीनंतर सांधेदुखी, कंबरदुखीचा त्रास ही तक्रार सामान्यपणे आढळून येते. त्यामुळे कॅल्शियम स्नायूंना आराम देते. स्तनपान करताना दुधाच्या माध्यमातून बाळाला कॅल्शियम मिळण्यास मदत होते. यामुळे बाळाची हाडे व दातांचा विकास होण्यासाठी मदत होते. त्यासाठी मातेने देखील दुधाचे सेवन करणे गरजेचे आहे. दूध पिणे आवडत नसल्यास आपल्या आहारात दही, पनीर, चीज अशा दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असावा.

3) पाणी : दररोज तीन ते चार लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरात योग्य प्रमाणात पाणी असल्यास (हायड्रेशन) रोगप्रतिकारक शक्ती आणि वजन नियंत्रणात मदत होते.

4) फळे : सर्व प्रकारच्या फळांचा आहारात समावेश असू शकतो. विविध फळांमध्ये विविध जीवनसत्त्व असल्याने शरीराला त्याचा फायदा होतो.

5) लोह : बीट, पालक, ओला खजूर, गुळाचे लाडू, चिक्की यांमध्ये लोह असते. प्रसूतीच्या वेळेस रक्त गेल्यामुळे ते पुन्हा भरून काढण्यासाठी आहाराबरोबर शरीराला सप्लिमेंट्‌सची गरज पडू शकते. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

घरचे जेवण घ्या ! 
मातेच्या आहारातील घटक बाळाच्या पोषणासाठी देखील वापरले जातात, त्यामुळे डॉक्टर पुढील तीन महिन्यांसाठी लोह आणि सहा महिन्यांसाठी कॅल्शियमच्या सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला देऊ शकतात. प्रसूतीनंतर आतड्यांना सामान्य कार्य पुन्हा सुरू करण्यासाठी थोडा वेळ लागतो. प्रसूतीनंतरच्या काळात गॅसेस, बद्धकोष्ठता, पाइल्स अशा प्रकारचे त्रास आढळून येऊ शकतात. म्हणूनच, जास्त मसालेदार व चटपटीत पदार्थ थोडे दिवस खाऊ नका. कडधान्ये किंवा मांसाहार घ्यायचा असेल तर ते रात्रीऐवजी दुपारच्या जेवणात घ्या. घरचे नेहमीचे साधे जेवण घ्या. शक्यतो बाहेरचे खाद्यपदार्थ, जंकफूड, प्रोसेस्ड फूड, बेकरी उत्पादने हे काही दिवसांकरिता का होईना टाळा. बाहेरचे अन्न टाळल्याने फूड इन्फेक्शनची जोखीम कमी होते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com