आईशी संवाद : पहिल्या काही महिन्यांतील बाळाच्या नॉर्मल गोष्टी

Baby
Baby

शिंका येणे, नाकात पाणी येऊन सर्दी झाल्यासारखे वाटणे हे जन्मानंतर पहिल्या काही महिन्यांमध्ये नॉर्मल असते. त्यासाठी सर्दी खोकल्याच्या औषधांची गरज नसते. साधे नॉर्मल सलाईनचे ड्रॉप नाकात टाकले, तरी नाक मोकळे होते. लहान मुलांना नाक शिंकरून नाकातील घाण बाहेर काढता येत नसते. म्हणून शिंका येणे, नाक गच्च झाल्यास जास्त काळजी करू नये. तसेच लहान मुलांमध्ये उचक्या येणे हेही नॉर्मल असते. त्याला वेगळ्या उपचारांची गरज नसते. थोडावेळ कडेवर घेऊन उभे धरल्यास उचक्या बंद होतात. दिवसभर झोपणे आणि रात्रभर जगणे हा झोपेचा पॅटर्नही नॉर्मल असतो. याचे कारण असे असते की, बाळ पोटात असताना आई दिवसभर फिरत असते, काम करत असते. बाळाला थापटल्यासारखे वाटते म्हणून ते दिवसा पोटात झोपते.

रात्री जेव्हा आई झोपते तेव्हा हे थापटणे बंद होते. आता थापटणे बंद झाले असून उठायला हवे असे बाळाला वाटते व ते उठून पोटात हळूहळू लाथा मारू लागते. हा दिवसा झोपण्याचा व रात्री जगण्याचा पॅटर्न नऊ महिने प्रस्थापित झालेला असतो. म्हणून जन्म झाल्यावर पहिले काही महिने बाळ दिवसा झोपते व रात्री जागते. 

यात अनेकांचा असा गैरसमज असतो की रात्री जन्माला आलेली मुले दिवसा झोपतात, पण याचा झोपेशी काहीही संबंध नाही. जन्म झाल्यानंतर शी व शू करायला थोडा उशीर होणे हेही नॉर्मल असते. जन्मल्यानंतर पहिल्या चोवीस तासात शी व्हायला हवी व अठ्ठेचाळीस तासात शू व्हायला हवी. पहिल्या सहा तासांत शी, शू न झाल्यास लगेच गडबडून जाऊ नये. बाळ आईचे दूध पीत असल्यास शी, शू उशिरा झाली तरी झाली तरी घाबरू नये. वर दिलेल्या वेळेपर्यंत शी, शू साठी संयम ठेवावा. 

शी पातळ पाण्यासारखी, फेस असलेली, दाणे असलेली अशा सर्व प्रकारची नॉर्मल असते. आईचे दूध पीत असलेले बाळ पातळ शी करते हे नॉर्मल असते. दूध पिल्यापिल्या लगेच रडणे हे नॉर्मल असते. 

एका दिवसात सात वेळा व सात दिवसातून एकदाही करणे हे नॉर्मल असते. शी व शू करण्याआधी अळ्यापिलळ्या देणे, रडणे नॉर्मल असते. 

बाळाचे मूत्राशय शूने भरले की त्याला त्याचे सेन्सेशन येते. त्या सेन्सेशनने ते रडू लागते. रडले की पोटातले प्रेशर वाढते व हे प्रेशर मूत्राशयावर पडून शू बाहेर पडते. नंतर मग बाळ रडले की शू होते हे शिकते म्हणून शू करण्याआधी  रडण्याची फार काळजी करू नये. बाळ शू होण्याआधी रडतं. शू करताना रडत नसते. शू सुरू असताना ते जोरात रडत असेल तर मात्र लघवीच्या मार्गाचा जंतुसंसर्ग असण्याची शक्यता असते. शू सारखेच शी करण्याआधी रडणे आणि कण्हने हे नॉर्मल. पाठीवर पायावर मोठे निळे डाग असणे नॉर्मल असते. याला ‘मोंगोलियन स्पॉट’ असे म्हणतात. नाकावर बारीक दाणे असणे नॉर्मल असते. याला मिलिया असे म्हणतात. पांढरे दाणे असतात तेही नॉर्मल असतात. या टाळू वरच्या दाण्यांना ‘ebsteins pearls’ असे म्हणतात. माकड हाड संपते तिथे एक छोटे छिद्र किंवा खोलगटपणा असतो. हा नॉर्मल असतो.

पहिल्या महिन्यामध्ये स्तन मोठे होणे हे नॉर्मल असते. याची उगीचच मसाज करून ते कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच असे केल्याने त्यातून दूध-दही बाहेर निघते. पण असे केल्याने त्या जागी जखम होऊ शकते. लहान बाळामधील मोठे झालेले स्तन आपोआप काही दिवसांत काहीही न करता कमी होतात. पहिल्या महिन्यात लहान बाळाच्या योनीमार्गातून रक्त निघणे हेही नॉर्मल असते. 

संप्रेरकांचा काही भाग हा नाळेतून बाळांमध्ये जातो, तसेच बाळाला पाळी आल्यासारखे योनीमार्गातून थोडे रक्त येते. यात घाबरण्यासारखे काही नसते व याला उपचारांचीही मुळीच गरज नसते. नाळ पडल्यानंतर त्या जागेतून पांढरा, रक्तमिश्रित ब्राऊन स्रव निघणे नॉर्मल असते. फक्त स्रवातून घाण वास येत असल्यास मात्र जंतुसंसर्ग असण्याची शक्यता असते. लहान बाळाच्या डोळ्याला काजळ लावल्याने अपाय होतो. पहिल्या आठवड्यात अंगावर लालसर पुरळ येणे नॉर्मल असते. कानाच्या समोर त्वचेचा एक छोटा भाग लटकलेला असणे नॉर्मल असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com