esakal | आईशी संवाद : शाळकरी वयातले दुखणे : कांजिण्या
sakal

बोलून बातमी शोधा

Child

कांजिण्या हा प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलांचा आजार आहे, म्हणजेच पाच ते दहा वर्षे वयोगटातील मुलांना जास्त प्रमाणात होतो. तो संसर्गजन्य आजार असल्याने एकाला झाला, की त्वरित भावंड व वर्गातील मुलांमध्ये पसरतो- म्हणून शक्यतो कांजिण्या झालेल्या मुलांना घरातील इतर मुलांपासून लांब ठेवतात व बरे होईपर्यंत शाळेत पाठवू नये.

आईशी संवाद : शाळकरी वयातले दुखणे : कांजिण्या

sakal_logo
By
डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ

कांजिण्या हा प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलांचा आजार आहे, म्हणजेच पाच ते दहा वर्षे वयोगटातील मुलांना जास्त प्रमाणात होतो. तो संसर्गजन्य आजार असल्याने एकाला झाला, की त्वरित भावंड व वर्गातील मुलांमध्ये पसरतो- म्हणून शक्यतो कांजिण्या झालेल्या मुलांना घरातील इतर मुलांपासून लांब ठेवतात व बरे होईपर्यंत शाळेत पाठवू नये.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कांजिण्या संसर्ग कशामुळे होतो? 
कांजिण्या हा वेरीसेला झोस्टर या विषाणूमुळे (व्हायरस) होणारा व्हायरल व विशिष्ट मुदतीचा, आपोआप बरा होणारा आजार आहे. कांजिण्या झालेल्या व्यक्तीशी संपर्क आल्याने हा संसर्ग होतो. 

लक्षणे

  • ताप व अंगावर पुरळ व नंतर फोड येणे हे कांजिण्यांचे मुख्य लक्षण असते. कांजिण्यांमध्ये येणारी पुरळ विशिष्ट प्रकारची असते. ती छातीवर किंवा पाठीवर सुरू होते आणि सूर्य उगवल्यावर सूर्याची किरणे जशी मध्याकडून चहू बाजूंना पसरतात, तशी छाती/ पाठीवरून पूर्ण शरीरावर पसरते. ही पुरळ पुढे पिकते व त्याचे फोड तयार होतात. एकाच वेळी या पुरळीत विविध स्टेजमधील फोड दिसतात. शरीरावर काही पुरळ सुरू झाली आहेत, काही ठिकाणी पिकण्याच्या मार्गावर आहे आणि काही ठिकाणी पिकून फोड तयार झाले आहेत, असे दिसते. हे कांजिण्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. 
  • या फोडांना खाज येते. 
  • खाजवल्याने या फोडांना जंतूसंसर्ग होऊ शकतो. 
  • याशिवाय भूक कमी होणे, सर्दी, खोकला, अंग व डोके दुखणे अशी लक्षणे असू शकतात. 

उपचार

  • हा आपोआप बरा होणारा आजार असल्याने ताप, सर्दी, खोकला व खाज कमी करणारी औषधे पुरेशी असतात. 
  • सतत खाजवल्याने बॅक्टेरिअल जंतुसंसर्ग होऊ शकतो. म्हणून नखे कापावी व वारंवार साबणाने हात धुवावे. 
  • अंघोळीच्या पाण्यात थोडे सोडियम बायकार्बोनेट टाकून रोज अंघोळ घालावी. 
  • जर ताप कमी झाला नाही व फोडांना बॅक्टेरीयल जंतुसंसर्ग झाला तरच अँटीबायोटिक्सची गरज पडते. 
  • सात ते दहा दिवसात सर्व लक्षणे नाहीशी होतात. 
  • काही वेळा फोडांमुळे अंगावर चट्टे येतात जे एक ते तीन महिन्यांत बरे होतात. 

कांजिण्या होऊ नयेत म्हणून 
एकदा कांजिण्या झाल्या, की परत आयुष्यात होत नाहीत. म्हणून आधी कांजिण्या एकदा होऊन जाणे हेच आयुष्यभराचे संरक्षण होते. आता मात्र कांजिण्यांवर प्रभावी लस उपलब्ध आहे. तसाही पूर्ण बरा होणारा आजार आहे, मग लस कशाला, असा विचार करून चालणार नाही. कांजिण्यांमध्ये तुरळक प्रमाणात मेंदूज्वरासारख्या गुंतागुंतीची शक्यता असते. याशिवाय शाळा बुडणे, पालकांचे कामाचे दिवस बुडणे व मुलावर शरीरिक-मानसिक ताण हे या लशीने टाळता येते. संपर्कात आलेल्यांना लगेचच लस दिल्याने त्यांचाही संसर्गापासून बचाव होऊ शकतो.

Edited By - Prashant Patil

loading image