esakal | आईशी संवाद : लहान मुलांमधील बद्धकोष्ठता
sakal

बोलून बातमी शोधा

Constipation

बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या १० ते २५ टक्के लहान मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. त्यातच पहिली पाच वर्षं ही ‘टॉयलेट ट्रेनिंग’ची असतात. बद्धकोष्ठतेमुळे यात व्यत्यय तर येतोच; शिवाय मुलांच्या मनात शौचालयात जाण्याविषयी भीती निर्माण होते.

आईशी संवाद : लहान मुलांमधील बद्धकोष्ठता

sakal_logo
By
डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ

बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या १० ते २५ टक्के लहान मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. त्यातच पहिली पाच वर्षं ही ‘टॉयलेट ट्रेनिंग’ची असतात. बद्धकोष्ठतेमुळे यात व्यत्यय तर येतोच; शिवाय मुलांच्या मनात शौचालयात जाण्याविषयी भीती निर्माण होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बद्धकोष्ठतेची व्याख्या

 • रोज नियमित शौचास न होणे किंवा मलविसर्जनाच्या वेळी दुखणे व ही लक्षणे दोन आठवड्यांसाठी सुरू राहणे म्हणजे बद्धकोष्ठता. बद्धकोष्ठतेच्या विस्तृत व्याख्येला ‘रोम क्रायटेरिया’ असे म्हटले जाते, की पुढीलपैकी कुठलीही दोन लक्षणे दोन महिन्यांसाठी असल्यास त्याला बद्धकोष्ठता म्हणता येते. 
 • आठड्यातून फक्त दोनदा किंवा त्यापेक्षा कमी दिवस शौचास न होणे. 
 • शौचाच्या सवयी विकसित झालेल्या मुलामध्ये आठवड्यातून एकदा न कळत शौच होणे. 
 • जास्त वेळ शौचात बसून राहण्याची किंवा शौच होताना सतत कहणण्याचा इतिहास. 
 • शौचास होत असताना दुखणे. 
 • शौचाच्या पिशवीमध्ये (रेक्टम) खडा होणे व तो अडकणे. 
 • शौच होत असताना मोठा खडा अडकणे व आत- बाहेर होणे. 

कारणे

 • फंक्शनल म्हणजेच कुठल्याही मोठ्या कारणाशिवाय सवयींमुळे होणारी बद्धकोष्ठता : नव्वद टक्के मुलांमध्ये बद्धकोष्ठतेचे कुठलेही मोठे कारण नसते. आहाराच्या सवयी; एकदा शौच करताना दुखल्यामुळे शौचास जाणे वारंवार टाळणे, शाळेत असताना शौचास जावे वाटले, तरी न जाणे किंवा शिक्षकांनी परवानगी नाकारणे किंवा शाळेतील शौचालय अस्वच्छ असल्याने शौचास जाणे टाळणे; उभे राहून शौच करण्याची सवय असणे, ही मुख्य कारणे असतात. 
 • हीचस्प्रन्ग्स डिसिज : या आजाराचे प्रमाण कमी असले, तरी जन्मापासून बद्धकोष्ठता असल्यास हे कारण असू शकते. 
 • आहाराच्या सवयी : आहारात तंतुमय पदार्थांचा अभाव; तसेच मैद्याचे पदार्थ, बिस्किटे, पिझ्झा, बर्गर अशा फास्ट फूडचे अधिक सेवन व कमी पाणी पिणे. 
 • थायरॉइडचा आजार : हायपोथायरॉयडिजम म्हणजे शरीरात थायरॉइड संप्रेरकाच्या कमतरतेमध्ये बद्धकोष्ठता व त्यासोबत मतिमंदत्व असू शकते. सर्व उपाय करून बद्धकोष्ठता बरी होत नसेल, तर थायरॉइडची तपासणी करायला हवी. 
 • वरचे अन्न सुरू करताना फॉर्म्युला म्हणजे दूधभुकटी किंवा दुधाचा अतिवापर : सहा महिन्यांनंतर पावडरचे दूध वापरल्यास किंवा गाईचे, म्हशीच्या दुधाचा अतिवापर केल्यास बद्धकोष्ठता होते. 
 • इरिटेबल बॉवेल सिंड्रोम : हे मुख्यतः मानसिक तणावामुळे होते.  

उपचार
आहारात बदल

आहारात बदल करणे हा बद्धकोष्ठतेच्या उपचाराचा सगळ्यांत महत्त्वाचा भाग असतो. दूध कमी किंवा काही दिवस बंद करून आहारात हिरव्या भाज्या, ताक, मोड आलेली कडधान्ये; तसेच इतर तंतुमय पदार्थ असावेत. फळांमध्ये सालीसह सफरचंद, पेरू, डाळिंब, पेरू ही फळे मुख्यतः बद्धकोष्ठतेसाठी जास्त उपयोगी ठरतात. यासोबत दिवसभर तहान लागेल तेव्हा भरपूर पाणी, रोज सकाळी एक फळ, जेवणात एक हिरवी भाजी, दुपारी एक ग्लास पातळ ताक या आहाराच्या पद्धतीने बद्धकोष्ठता दोन महिन्यांत बरी होते. नंतर या सवयी चालू ठेवाव्यात. 

औषधे
औषधाचा वापर हा सुरुवातीला एक ते दोन महिने शौचाच्या सवयी नियमित होईपर्यंतच करावा व तोपर्यंत आहाराच्या चांगल्या सवयी लावाव्यात. पॉलिथिलीन ग्लायकॉल हे औषध वापरले जाऊ शकते. बाजारात मिळणारी बद्धकोष्ठतेची औषधे बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय वापरू नयेत.

समुपदेशन
मुलाला या त्रासाविषयी भीती घालविणे, उभे राहून शौच करत असल्यास बसून शौच करण्याची सवय लावणे, शिक्षकांना याविषयी माहिती देऊन शाळेत मुलाला शौचाला जावेसे वाटल्यास सांगण्याची व तशी परवानगी देण्याविषयी समुपदेशन, या त्रासाविषयी मुलांना न रागवणे, असे मानसिक नियोजन आवश्यक असते.

Edited By - Prashant Patil

loading image