वुमन हेल्थ : गरोदरपणात साखरेवर ठेवा लक्ष

Pregnant-Women
Pregnant-Women

गरोदरपणामध्ये जर पहिल्यांदाच मधुमेहाचे निदान झाले असेल, तर त्याला ‘जेस्टेशनल डायबेटिस’ असे म्हणतात. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि तुमच्या प्रसूतीवर आणि बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मात्र, अशा प्रकारच्या मधुमेहावर आपण नियंत्रण मिळवू शकतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉक्टर यासाठी तुम्हाला औषधे देतील व आहार आणि व्यायामाबाबत सल्ला देतील. यावर नियंत्रण मिळाल्यास तुमचे आणि तुमच्या बाळाचे आरोग्य चांगले राहू शकते. महिलांमध्ये प्रसूतीनंतर रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्य पातळीवर येते. मात्र, जेस्टेशनल डायबेटिसमुळे टाईप २ डायबेटिस होण्याची जोखीम असते; म्हणून नियमितपणे साखरेचे प्रमाण तपासणे गरजेचे आहे. 

गरोदरपणामध्ये उद्‍भवणाऱ्या मधुमेहाची ठोस लक्षणे नाहीत. मात्र, तहान वाढणे किंवा लघवीला वारंवार जावे लागणे, ही लक्षणे असू शकतात. जेस्टेशनल डायबेटिस काही महिलांमध्ये दिसून येतो, तर काहींमध्ये नाही, याचे नक्की कारण माहीत नाही. स्थूलता किंवा लठ्ठपणा, हालचालींचा अभाव, कुटुंबात मधुमेहाचा वैद्यकीय इतिहास इत्यादी यासाठी जोखमीचे घटक ठरू शकतात. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात हार्मोन्सची भूमिका असते आणि गरोदरपणात हार्मोन्सच्या पातळीमध्ये बदल होतात आणि त्यामुळे आपल्या शरीराला हे नियंत्रण कठीण जाऊ शकते. यामुळे साखरेचे प्रमाण वाढू शकते. साधारणतः शेवटच्या तिमाहीमध्ये जेस्टेशनल डायबेटिस आढळून येतो. गरोदरपणात नियमित तपासण्या केल्या, तर वेळेत याचे निदान होऊ शकते व आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो. 

जेस्टेशनल डायबेटिसचे नियंत्रण योग्य प्रकारे केले नाही, तर रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि सी सेक्शनद्वारे प्रसूतीची शक्यता वाढते. जेस्टेशनल डायबेटिसच्या प्रतिबंधाबाबत कुठलाही खात्रीशीर मार्ग नसला, तरी तुमची जीवनशैली, तुमचे आरोग्य, आहार-विहार, याबाबत सवयी चांगल्या असतील, तर अशा प्रकारच्या मधुमेहाची किंवा भविष्यात टाईप २ डायबेटिसची जोखीम कमी होऊ शकते. यासाठी समतोल आहार, व्यायाम, गरोदरपणाबाबत निर्णय घेताना आपल्या वजनावरत लक्ष केंद्रित करणे हेदेखील महत्त्वाचे आहे.

जेस्टेशनल डायबेटिसचे निदान योग्य वेळेत होण्याकरिता साखरेची पातळी जाणून घेण्यासाठी रक्ताची चाचणी करण्यात येते. साधारणतः ही चाचणी दुसऱ्या तिमाहीत केली जाऊ शकते. मात्र, गरोदरपणाआधी जर एखाद्या व्यक्तीमध्ये स्थूलता किंवा लठ्ठपणा असेल किंवा कुटुंबात कोणाला मधुमेहाचा वैद्यकीय इतिहास असेल, याआधीच्या प्रसूतीदरम्यान जेस्टेशनल डायबेटिसचे निदान झाले असेल, तर ही रक्ताची चाचणी आधी केली जाऊ शकते. या प्राथमिक चाचणीनंतर फॉलोअप म्हणून ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट केली जाऊ शकते. 

जर जेस्टेशनल डायबेटिसचे निदान झाले, तर घाबरण्याचे कारण नाही. आपल्याला डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार जीवनशैलीमधील बदल, रक्तातील साखरेच्या प्रमाणावर देखरेख आणि दिलेली औषधे वेळेवर घेणे, यामुळे गरोदरपणात आणि पुढे प्रसूतीमध्ये संभाव्य गुंतागुंत टळू शकते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com