वुमन हेल्थ : गरोदरपणातील बदल आणि आरोग्याची काळजी 

Pregnant-Women
Pregnant-Women

गर्भवती मातेला आरोग्यपूर्ण खाद्यपदार्थ सेवन करणे आणि आपले शरीर लवचीक ठेवणे वाटते तितके सोपे नसते. एकीकडे आपण गरोदर आहोत हे समजल्यानंतरचा कालावधी रोमांचकारी आणि आनंददायक असतो, तर दुसऱ्या बाजूला आपल्या बाळाच्या भविष्याबद्दल नियोजन आणि चिंताही वाटते. त्याचवेळी मातेच्या शरीरात आणि तिच्या पोटात वाढणाऱ्या गर्भात एकाचवेळी अनेक बदल होत असतात. हे सर्व बदल स्वीकारतानाच निरोगी राहणे आणि डॉक्टरांच्या साहाय्याने आपल्यासाठी काय योग्य व चांगले आहे, काय खावे, व्यायाम कसा करावा, कुठल्या बाबतीत काळजी घ्यावी, कोणत्या चाचण्या कधी केल्या जातात हे जाणून घेणे गरजेचे असते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गरोदरपणातील हा काळ तीन तिमाहीत विभागला जातो. प्रत्येक तिमाहीत कशा प्रकारे काळजी घ्यावी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

पहिली तिमाही (फर्स्ट ट्रायमेस्टर)
पहिली तिमाही गर्भाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असते. मातेच्या शरीरात बाह्य बदल फारसे होत नसले, तरी गर्भातील बाळाचे महत्त्वाचे अवयव आणि शरीरातील यंत्रणा या काळात विकसित होत असतात. डॉक्टरांना भेट देऊन तपासणी व सल्ला तसेच, माता व गर्भाच्या आरोग्याची खात्री करण्यासाठी काही महत्त्वाच्या चाचण्या केल्या जातात. पहिल्या तिमाहीतील लक्षणे प्रत्येक स्त्रीप्रमाणे वेगळी असतात. त्यातील काही जणांना वैद्यकीय शास्त्रानुसार सर्व लक्षणे जाणवतात, तर काहींना अत्यंत सौम्य लक्षणे जाणवतात. या लक्षणांचा कालावधीही वेगवेगळा असतो. गरोदरपणातील आठ आठवड्यानंतर मातेच्या पोटातील अंशाचे रूपांतर गर्भामध्ये होते. हा गर्भ त्यावेळेला एक ते दीड इंच लांबीचा असला तरी त्याच्या सर्व महत्त्वाचे अवयव व यंत्रणा तयार झालेल्या असतात. पहिल्या तिमाहीमध्ये अल्कोहोल, ड्रग्स तसेच काही औषधे आणि रुबेलासारखे आजार यांपासून गर्भाला नुकसान पोचू शकते.

दुसरी तिमाही
गरोदरपणातील दुसरी तिमाही माता व बालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. गरोदरपणाची बाह्य लक्षणे दिसतात. बालकाचे सर्व अवयव आणि यंत्रणा उत्तम विकसित झाल्यामुळे गर्भाची लांबी आणि वजन दोन्ही वाढू लागते. दुसऱ्या तिमाहीतील डॉक्टरांच्या भेटीत माता व गर्भाच्या आरोग्याची तपासणी केली जाते. यामध्ये गर्भाच्या हृदयाचे ठोके मोजले जातात. बहुतांश मातांना दुसरी तिमाही हा शारीरिक दृष्ट्या आनंददायक काळ असतो. या दरम्यान सकाळी होणारे त्रास कमी होतात. थकवाही कमी होतो आणि स्तनांवरील तणाव सुसह्य झालेला असतो. गर्भाला पोषण करणारी नाळ ही जाड होत जाते, याला उंबिलिकल कॉर्ड असे म्हणतात.

मात्र मद्यसेवन, तंबाखू सेवन हे कटाक्षाने टाळावे. कारण नाळेमधून पोषणाबरोबरच चुकीच्या सवयी असतील, तर हानिकारक पदार्थही गर्भापर्यंत जाऊ शकतात. दुसऱ्या तिमाहीत भूक वाढू शकते. सुमारे विसाव्या आठवड्याच्या आसपास गर्भाची हालचाल मातेला नीटपणे जाणवू लागते. या स्थितीला ‘क्विकनिंग’ असे म्हणतात. वजन वाढल्याने पाठदुखी जाणवू शकते तसेच जळजळ, अपचन, बद्धकोष्ठता हे सुरू राहू शकते. दुसऱ्या तिमाहीचे शेवट पर्यंत गर्भाची वाढ १३-१६ इंचापर्यंत झाली असते. तिसरी तिमाही आणि त्याबाबतची काळजी याची पुढील लेखात माहिती घेऊ.
(क्रमशः)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com