वुमन हेल्थ : बीएमआय आणि गर्भधारणा

डॉ. ममता दिघे
Saturday, 14 March 2020

गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी हे करा...

  • आरोग्याकडे नीट लक्ष देणे.
  • तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वजन आणि बीएमआय आटोक्यात आणणे.
  • कमी उष्मांक असलेले, पण पोषक अन्न तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेणे.
  • नियमित व्यायाम करणे.
  • वजन कमी करून नैसर्गिकपणे किंवा उपचारांची मदत घेऊन गर्भधारणेसाठी प्रयत्न करणे.
  • वजन कमी असल्यास ते वाढवून, ओव्ह्युलेशन सुधारणे आणि गर्भ रुजण्याची शक्यता वाढवणे.

आपण कधीकधी दिसण्याविषयी खूप जागरूक असूनही, वजनाविषयी तितके दक्ष नसतो. कमी किंवा जास्त वजनाचे आरोग्यावर परिणाम दिसायला लागल्यावरच ते लक्षात येते. माणसाची उंची आणि वजन यांच्यातील प्रमाण सांगणारा निर्देशांक म्हणजे बीएमआय म्हणजेच, बॉडी मास इंडेक्स. योग्य बीएमआय असणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वजन कमी असणे किंवा जास्त असणे या दोन्ही गोष्टींमुळे गर्भधारणेत अडथळे येऊ शकतात. गर्भार असताना वजन वाढते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, याचा विचार तुम्ही कदाचित केला नसेल की, मुळात कमी किंवा वजन जास्त असल्याचा परिणाम तुमच्या गर्भधारणा करण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो! जास्त वजन असल्यास धोके जास्त आणि गर्भारपणात गुंतागुंतही जास्त होते.

गर्भधारणा आणि योग्य बीएमआय
सामान्यतः १८.५ ते २४.९ हा बीएमआय नॉर्मल समजला जातो आणि गर्भधारणेसाठी देखील हाच योग्य आहे. योग्य वय आणि योग्य बीएमआय असल्यास गर्भधारणेची शक्यता निश्चितच चांगली असते.

अभ्यासावरून असे दिसून येते की, बीएमआय जास्त असलेल्या स्त्रियांना नॉर्मल स्त्रियांपेक्षा १७ टक्के वेळा गर्भधारणेसाठी उशीर होतो. ज्या स्त्रिया स्थूल आहेत (३०-३५ बीएमआय), त्यांना २५ टक्के वेळा उशीर होतो. ज्या स्त्रियांचे वजन १८ वर्षानंतर अचानक खूप वाढते, त्यांना गर्भधारणेत त्रास होतो. वजन अगदी कमी असले, तरी गर्भधारणा व्हायला त्रास होतो. त्यामुळे शरीरात योग्य प्रमाणात जाडी असणे आवश्यक आहे.

वजनाशी संबंधित वंध्यत्वाची कारणे
गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीच्या शरीरात नियमित बीज उत्पादन होऊन त्याचा पुरुषाच्या शुक्राणूशी संगम होणे आवश्यक असते. यासाठी काही ठरावीक हार्मोन्सचे काम नीट होणे गरजेचे असते. वजनाची समस्या असल्यास हे हार्मोन्स योग्य प्रमाणात निर्माण होत नाहीत. परिणामी, पाळी अनियमित होऊन पुढील सर्वच प्रक्रिया योग्य पद्धतीने होऊ शकत नाही. हार्मोन्समधील बदलामुळे गर्भाशयाचे वातावरणही तेवढे पोषक राहत नाही. यामुळे बीज उत्पादन झाले. तरी गर्भ रुजू शकत नाही. याचबरोबर वजन अधिक असल्यास ओव्ह्युलेशनसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचाही योग्य परिणाम होत नाही. त्यामुळे जास्त औषध देऊनही काही वेळा बीज उत्पादन होत नाही. 

दिलासा देणारी गोष्ट ही आहे की, जास्तीचे वजन कमी केल्यास स्त्रियांची गर्भधारणेची क्षमता सुधारते. वजन ५ ते १० टक्के कमी केल्यास  ओव्ह्युलेशनमध्ये सुधारणा होते आणि बीजाची गुणवत्ताही वाढते. पुढे होणारी ब्लडप्रेशर किंवा मधुमेहासारखी गुंतागुंतही वजन आटोक्यात आणल्यास टाळता येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr mamata dighe on BMI and pregnancy