वुमन हेल्थ : एन्डोमेट्रिओसिस समजून घेताना...

endometriosis
endometriosis

महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यानच्या वेदना ही सामान्य गोष्ट आहे, मात्र, त्या तीव्र स्वरूपाच्या असल्यास त्याच्या अनेक कारणांपैकी एक एन्डोमेट्रिओसिस असू शकते. एन्डोमेट्रिओसिस या स्थितीमध्ये गर्भाशयामध्ये ( Inner lining of Uterus) असतात तशाच पेशी, म्हणजे एन्डोमेट्रियम. त्या गर्भाशयाच्या बाहेर वाढतात. एन्डोमेट्रिओसिस झालेल्या महिलांमध्ये गर्भाशयाबाहेर वाढलेल्या या पेशी हार्मोन्सलाही प्रतिसाद देतात. बीजकोश फुटताना एन्डोमेट्रियम आणि त्यांच्यासारख्याच बाहेर असलेल्या पेशी जाड होतात. चुकीच्या ठिकाणी वाढलेल्या एन्डोमेट्रियमसारख्या दिसणाऱ्या या पेशी मासिक पाळीदरम्यान एन्डोमेट्रियमसारख्या शरीराबाहेर पडत नाहीत. त्यातून रक्तस्राव होतो. वेदना होतात. प्रत्येक महिन्यात होणाऱ्या या प्रक्रियेमुळे घट्ट व मेदयुक्त पेशी तयार होतात. या तंतुमय पेशींचा उदराच्या आतील भागात थर तयार होतो. त्यामुळे गर्भाशय, अंडाशय, अंडनलिका आणि आतडे एकमेकांना चिकटून बसतात. एन्डोमेट्रिओसिसमुळे अतिशय वेदनादायी मासिक पाळी व प्रजनन क्षमता कमी होणे या समस्या निर्माण होतात. मात्र, यावर अनेक उपचार उपलब्ध आहेत.

एन्डोमेट्रिओसिसची लक्षणे
एन्डोमेट्रिओसिसदरम्यान अतिशय तीव्र वेदना होतात. त्यामुळे कामावर जाणे कठीण बनू शकते. अनेकदा या वेदना मासिक पाळीच्या काळातच सुरू राहतात, मात्र काही महिलांमध्ये या वेदना सातत्याने होत राहतात. अनेक महिलांना वेदनादायी मासिक पाळी सामान्य गोष्ट वाटते, मात्र वेदना तीव्र असल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते. एन्डोमेट्रिओसिसमध्ये प्रजनन क्षमता कमी होणे व दुसरी मुख्य लक्षणे दिसून येतात. वंध्यत्व असलेल्या स्त्रीमध्ये एन्डोमेट्रिओसिस असण्याची शक्यता नेहमीपेक्षा खूप जास्त असते. 

एन्डोमेट्रिओसिसची कारणे

  • मासिक पाळीचा रक्तस्राव गर्भनलिकेमधून पोटात पोचणे.
  • इम्युनोलॉजिकल आणि आनुवंशिकता आदी.

एन्डोमेट्रिओसिसचे निदान
या आजाराचे निदान करताना रुग्णाचा वैद्यकीय इतिहास तपासला जातो. शारीरिक तपासणी केली जाते. आणखी काही कारणे आहेत का, याचा शोध घेतला जातो. गरज पडल्यास पुढील चाचण्या करून निदान केले जाते.

  • अल्ट्रासाउंड
  • एमआरआय
  • लॅपरोस्कोपी
  • कोलोनोस्कोपी 

(ही चाचणी तुमच्या एन्डोमेट्रिओसिसमधून आतड्यावर परिणाम झाला असल्याने केली जाते.)

एन्डोमेट्रिओसिसचे उपचार
एन्डोमेट्रिओसिसवर औषधोपचार आणि शस्त्रक्रियेद्वारे उपचार करता येतात. मात्र पाळी नियमित सुरू असल्यास एन्डोमेट्रिओसिस पुन:पुन्हा होऊ शकते. 

केवळ वैद्यकीय निरीक्षणे
एन्डोमेट्रिओसिसच्या सौम्य प्रकरणांमध्ये तुम्हाला स्त्रीरोगतज्ज्ञाला सातत्याने भेटून स्थितीवर लक्ष ठेवता येते. नॉन स्टेरॉयडल ॲन्टी इन्फ्लेमेट्री, जसे Ibuprofen व Mefenamic Acid वेदना कमी करण्यात मदत करू शकतात.

एन्डोमेट्रिओसिस हॉर्मोन्स उपचार
एन्डोमेट्रियमसारख्या दिसणाऱ्या पेशी हॉर्मोन्सच्या बाबतीत संवेदनशील असतात व पाळीदरम्यान ओस्ट्रेजेन आणि प्रोजेस्टेरॉनमध्ये होणाऱ्या चढउतारांना प्रतिसाद देतात. यामुळे, रक्तस्राव व वेदना होतात. त्यावर हॉर्मोन थेरपीचे उपचार परिणामकारक ठरतात.

हॉर्मोन थेरपीमध्ये

  • प्रोजेस्टिन्स
  • Gonadotrophin Releasing Hormon (GnRh),  
  • गर्भनिरोधक गोळ्या आदी. यामुळे एन्डोमेट्रिओटिक इम्प्लांटची वाढ रोखली जाते.
  • हे उपचार सुरू करण्यापूर्वी तुम्ही व तुमच्या डॉक्टरांनी या उपचारांचे फायदे आणि दुष्परिणामांची माहिती करून घेणे आवश्‍यक आहे.

शस्त्रक्रियेद्वारे उपचार  
लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया - दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून गर्भकोषाबाहेर वाढलेल्या एन्डोमेट्रिओटिक पेशी काढून टाकतात किंवा cauterise म्हणजेच जाळता येतात. 
बाळंतपणानंतरही आजाराची लक्षणे कायम राहिल्यास व एन्डोमेट्रिओसिसमुळे रुग्णाच्या जगण्यावर परिणाम होत असल्यास Hysterectomy (गर्भाशय काढून टाकणे) व अंडाशय काढून टाकणे हे पर्याय शिल्लक राहतात.
एन्डोमेट्रिओसिसवरचे संयुक्त उपचार - काही केसेसमध्ये हार्मोन थेरपी आणि शस्त्रक्रिया हे दोन्ही उपचार महिलांसाठी फायद्याचे ठरतात.
एन्डोमेट्रिओसिसमुळे वंध्यत्वाची समस्या उद्‍भवत असल्याने आयव्हीएफसह फर्टिलिटी मॅनेजमेंट हा या प्रकारच्या केसेसमध्ये उपचारांचा मुख्य भाग ठरतो.

धोके कमी करण्यासाठी...

  • एरोबिक व्यायामप्रकार दिनचर्येत सामावून घ्या.  
  • बाळंतपण वेळेत होऊ द्या. 
  • गर्भनिरोधक गोळ्या वापरून एन्डोमेट्रिओसिसवर नियंत्रण ठेवा. 
  • वेळेवर निदान करून उपचार करा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com