esakal | Video : वुमन हेल्थ : चाफा बोलेना...
sakal

बोलून बातमी शोधा

Women

आई सकाळपासून पाहत होती, श्रुतीची नुसती चिडचिड चालली होती. कशात लक्ष लागत नव्हतं. टीव्हीसमोर बसली, तर नुसते चॅनेल बदलत बसली. हातातून पाण्याचा ग्लास पडून पाणी अंगावर सांडलं, तर तिला रडूच फुटलं. मुसमुसत पाणी पुसत बसली.

Video : वुमन हेल्थ : चाफा बोलेना...

sakal_logo
By
डॉ. ममता दिघे

आई सकाळपासून पाहत होती, श्रुतीची नुसती चिडचिड चालली होती. कशात लक्ष लागत नव्हतं. टीव्हीसमोर बसली, तर नुसते चॅनेल बदलत बसली. हातातून पाण्याचा ग्लास पडून पाणी अंगावर सांडलं, तर तिला रडूच फुटलं. मुसमुसत पाणी पुसत बसली.

श्रुती खरं तर अगदी गुणी बाळ! पण मासिक पाळी जवळ आली, की तिचा मूड बिघडणं, चिडचिड होणं सुरू व्हायचं हे आईनं चांगलंच हेरलं होतं. चार पावसाळे जास्त पहिल्यानं तिनं श्रुतीसमोर तिचे आवडते चटपट चणे ठेवले आणि म्हणाली, ‘चल, मॉलमध्ये येतेस का गं जरा... शॉपिंग करून येऊ.’ खाऊ आणि शॉपिंग... श्रुतीची कळी थोडी का होईना खुलली आणि ती लगेच आवरून तयार झाली. पीएमएस (Pre Menstrual Syndrome) म्हणजेच पाळीच्या आधी होणारा त्रास, अस्वस्थता, नैराश्य याचा प्रत्येक स्त्रीलाच थोड्या अधिक प्रमाणात त्रास होतोच. मासिक चक्राच्या अर्ध्यावर ओव्ह्युलेशनची प्रक्रिया पूर्ण झाली आणि पाळी येणार असली, की इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टोरोन या हार्मोन्सची पातळी कमी होऊ लागते आणि यामुळे मेंदूत रासायनिक प्रक्रिया होऊन वेगवेगळ्या प्रकारची अस्वस्थता येते. यालाच पीएमएस म्हणतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उदास वाटणे, हुरहूर वाटणे, चिडचिड होणे, झोप न लागणे, मुरूम पुटकुळ्या येणे, ओटीपोट दुखणे, स्तन जड होणे, पोट साफ न होणे किंवा बिघडणे, दमल्यासारखे वाटणे ही याची काही ठळक लक्षणे. सौम्य प्रमाण असल्यास घरगुती उपायांनी याच्यावर मात करता येते. मागील वेळी आपण पीसीओएस विषयी जाणून घेतलं. तो त्रास किंवा पीएमएसचा त्रास जास्त असेल, तर या उपयांसाहित काही औषधं घेणंही गरजेचं असते. कधी कधी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कॅल्शिअम, व्हिटॅमीन ई किंवा अन्य काही पोषक घटक घेतल्यानंही बरं वाटतं. योग्य सात्त्विक आहार, नियमित व्यायाम हे तर स्त्री स्वास्थ्याचा पाया आहेत.

आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यात खूप वेगवेगळी माहिती मिळत असते, बॉडी इमेजिंगचे प्रेशर असते, वेगवेगळे विचार मनात दाटून येत असतात. या सगळ्यामुळं स्ट्रेस येऊ शकतो. अशा अवस्थेत तरुणींना मानसिक आधार द्यायचीही खूप गरज असते. ज्या मुलींची आईशी छान गट्टी असते किंवा ज्यांना खूप मित्र-मैत्रिणी किंवा घरात बोलायला भावंडं असतात, अशांना हा त्रास झाला तरी मन मोकळं करता येतं. पण काहीजण थेटपणे बोलू शकत नाहीत. ज्यांना व्यक्त होता येत नाही त्यांना नैराश्य आणि चिडचिड हे त्रास जास्त होतात. आपल्या आजूबाजूला असा एखादा खंत करत बसलेला ‘अबोल चाफा’ दिसला तर आई-बहिणी-मैत्रिणी बनून त्या चाफ्याला बोलतं करूया. योग्य मदत मिळाली की भावनांचं योग्य व्यवस्थापन जमतं आणि मग हिरमुसलेली कळी अशी काही टवटवीत होते की तिच्याकडं पाहताच म्हणावंसं वाटतं ‘चाफा फुले आला फुलून.’

loading image
go to top