वुमन हेल्थ : माझा निर्णय माझ्या हाती!

Women
Women

लग्न झाल्यावर वर्षभरात पाळणा हललाच पाहिजे, अशी पद्धत पूर्वी होती! परंतु आताच्या काळात गर्भधारणा, बाल-संगोपन हे सगळे नवीन पिढी विचार करून करत आहे. करिअर, उद्दिष्टे, आर्थिक तजवीज या सगळ्यानंतर मुलाचा विचार करताना आपल्याला आजची तरुण जोडपी दिसतात. यात स्त्रियांना निर्णय घेण्याचे सामर्थ्य राहते ते गर्भनिरोधक गोळीमुळे. कुटुंब नियोजनाच्या अनेक साधनांपैकी हे एक साधन! पण दुर्दैवाने या विषयाबद्दल अजूनही बरेच अज्ञान आहे आणि काही गैरसमजही आहेत. ते सगळेच या लेखामुळे दूर होतील ही आशा आहे.

गैरसमज आणि उत्तरे
1) गर्भनिरोधक गोळीमुळे वजन वाढते 
साधारणपणे विवाहानंतर मुली गोळ्या घ्यायला सुरुवात करतात. मुलींच्या जीवनात वैवाहिक आयुष्याने अनेक बदल होतात ज्याचा परिणाम हार्मोन्सवर होऊन वजन वाढू शकते पण दोष दिला जातो गोळीला! डोस कमी प्रमाणात असलेल्या हार्मोन्सच्या गोळ्या मिळतात व त्यामुळे बहुदा वजनावर परिणाम होत नाही. 

2) मधून मधून गोळ्या बंद कराव्यात 
सलग १० वर्षे गोळ्या घेतल्यावर किंवा वयाच्या पस्तिशीनंतर गोळ्या सुरू ठेवायच्या का बदलायच्या, या विषयी डॉक्टरचा एकदा सल्ला घेणे योग्य आहे, पण गोळ्या मधून मधून थांबवणे म्हणजे नको असलेली गर्भधारणा ओढवून घेणे आहे.

3) गोळीमुळे गर्भात दोष निर्माण होतो 
हे पूर्णपणे चुकीचे आहे. अजाणतेपणी सुरुवातीला गर्भ राहिला असूनही काही दिवस गोळ्या सुरू राहिल्या, तरीही गर्भावर कोणताच विपरीत परिणाम होत नाही. गोळ्या नेहमी डॉक्टरांच्या निर्देशांनुसारच घ्याव्यात. 

4) दीर्घ काळ गोळ्या घेतल्याने वंध्यत्व येते 
गोळ्या बंद केल्या की लगेच प्रजनन सुरु होऊ शकते. गोळ्या घेतल्याने वंध्यत्व वाढत नाही.

5) महिन्याच्या मधोमध गोळी चुकवणे म्हणजे मोठा धोका 
हाही गैरसमज आहे. गोळ्यांमुळे ओव्ह्युलेशनच होत नाही. म्हणून नियमीत पूर्ण महिना गोळ्या घेणे गरजेचे आहे. त्यामुळे खरेतर कधीच गोळी चुकवू नये.

6) गोळीचा एकच फायदा म्हणजे गर्भनिरोध 
गोळीमुळे अन्यही फायदे होऊ शकतात. अनियमित पाळी, अतिरिक्त रक्तस्राव, ओटीपोटत गोळे येणे, नको असलेले केस येणे, मुरूम, अंडाशयात सिस्ट होणे, एन्डोमेट्रीओसिस यासारखे त्रासही गोळीने कमी होऊ शकतात.

7) ३५ च्या वरच्या महिला गोळी घेऊ शकत नाहीत आणि पौगंडावस्थेत सल्ल्याशिवाय गोळ्या घेऊ नयेत 
निरोगी महिलांनी संपूर्ण माहिती आणि योग्य सल्ला घेऊन गोळ्या घ्यायला हरकत नसते. वयाप्रमाणे किती काळ आणि कोठल्या कारणासाठी गोळ्या दिल्या जात आहेत, हे डॉक्टर अभ्यासातूनच ठरवतात.

8) गोळीमुळे कॅन्सर होऊ शकतो 
खूपच जास्त वर्षे सल्ला न घेता गोळ्या सुरू ठेवल्यास स्तनाच्या कॅन्सरची शक्यता किंचित वाढते.

यावरून हेच लक्षात येते की, प्रत्येक स्त्रीची तब्येत, अन्य समस्या या सगळ्याचा तिच्या स्वास्थ्य रक्षणात हात असतो. केवळ गोळीला दोष देण्यात अर्थ नाही. वैद्यकीय गुंतागुंत असल्यास ते पाहून गर्भनिरोध गोळ्यांचा निर्णय घेणे आवश्‍यक आहे. डॉक्टरशी मोकळेपणाने सर्व समस्यांबद्दल बोलून त्यांच्या सल्ल्याने गोळ्या घेतल्यास, गर्भनिरोधासाठी गोळी घेणे हा एक सोपा व विश्वासार्ह मार्ग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com