वुमन हेल्थ : स्त्रियांचे प्रजनन, आरोग्य आणि आहार

Pregnant-Women
Pregnant-Women

‘एकाच या जन्मी जणू फिरूनी नवे जन्मेन मी,’ ही ओळ प्रत्येक स्त्रिला चपखल बसते. एकाच आयुष्यात कुमारी, युवती, नवविवाहिता, माता अशा अनेक अवस्थांमधून स्त्री जात असते. यामुळे मासिक पाळी सुरू होण्यापासून लैंगिक आयुष्य, गर्भावस्था ते रजोनिवृत्ती अशा नैसर्गिक बदलात स्त्रीचे प्रजनन अवयव अनेक विकार, दुखापती आणि झीज यांना सामोरे जातात. स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मदतीने ती कोणत्याही समस्यांना तोंड देत असते. अनेक महिला प्रजनन व अन्य समस्यांसाठी औषधे व पूरक हार्मोन्स घेत राहतात. पण असे त्रास दूर ठेवण्यासाठी योग्य आहार आणि पोषण ही गुरूकिल्ली आहे.

स्वास्थ्यासाठी कोणता आहार घ्यावा?
योग्य आहार उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ नेहमीच फळे, भाज्या धान्य व व्हिटामिन्स -मिनरल्स योग्य प्रमाणात खाऊन, नियमितपणे २० मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला देतात. यामुळे एकूणच स्वास्थ्य चांगले राहते. परंतु, हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे नीट लक्ष दिले जात नाही. त्यामुळे वेगवेगळ्या समस्या उद्‌भवतात. पुढील प्रकारचा आहार घेतल्यास स्त्री रोगविषयक त्रास निश्चित कमी होतात.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

धान्ये, कडधान्ये - इस्ट्रोजन हे स्त्रियांच्या शरीरातील महत्त्वाचे हार्मोन, मात्र पण याची पातळी वाढल्यास कॅन्सरसारखे आजारही होऊ शकतात. यासाठी धान्यांचा संपूर्ण आहार घ्यावा. याने आयोडिनही वाढते. स्त्री स्वास्थ्य चांगले राहते.

सोया उत्पादने - सोयाबीन व त्याच्या विविध प्रकारांतून कॅल्शियम व लोह मिळते. ज्यामुळे ग्रंथीतून निर्माण होणाऱ्या स्रावांवर योग्य नियंत्रण राहते. सोया मिल्क, टोफू आहारात अवश्य असावेत.

कॅरोटोनॉइड व फायटोकेमिकल्स - लाल फळे व भाज्या म्हणजेच सफरचंद, गाजर, लाल ढब्बू मिरची, बीट, अवश्य खावे. याने शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित राहते.

फळे - फळांमधून व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. उदा. केळीतून  केळीतून व्हिटॅमिन सी, मॅंगेनीज, पोटॅशियम व ‘ब ६’ मिळते. यामुळे पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.

कॅल्शियमयुक्त आहार - जवळपास सर्व महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता असतेच. प्रसूतीनंतर ती अधिकच वाढते. दूध, दही घेतल्याने हाडांना बळकटी मिळते व अंडाशयाच्या तक्रारी कमी होतात.

फॉलिक ॲसिड असलेले अन्न - गर्भधारणेच्या आरोग्यसाठी आणि बाळामधील पाठीच्या कण्यातील दोष टाळण्यासाठी प्रत्येक स्त्रीने फॉलिक ॲसिड असलेला आहार, म्हणजे मासे, पालक, अंडी, कडधान्य अवश्य खावीत.

पालेभाज्या - फक्त मेथी किंवा पालक नव्हे, तर निरनिराळ्या पालेभाज्या म्हणजे शेपू, अळू, हिरवा व लाल माठ आहारात घ्यावेत. 

लोह - लोहाच्या कमतरतेने शरीराच्या अनेक प्रक्रियांत बाधा निर्माण होते. त्यासाठी, हिरव्या पालेभाज्या, मासे, रताळी, बीन्स यांचे सेवन करणे आवश्यक आहे. तसेच, ॲल्युमिनअमच्या पातेल्यात जेवण बनवणे टाळवे. त्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होते. 

‘पीसीओएस’साठी आहार - पॉलसिस्टिक ओव्हरीज असल्यास अन्नाकडे लक्ष देणे अधिकच महत्त्वाचे आहे. वजन प्रमाणात ठेवणे, कार्बोहायड्रेड्स कमी व प्रोटीनयुक्त आहार घेणे गरजेचे आहे. डिंक आणि हळीव ‘पीसीओएस’च्या डाएटमध्ये असावेत. 

योग्य आहाराबरोबरच स्त्रियांनी सुरक्षित संभोग, पेल्ह्विक व्यायाम केल्यानेही प्रजनन आरोग्य चांगले राहते. नियमित तपासणी करणे, गर्भारपणाचे नीट नियोजन करणे आणि काहीही तक्रार असल्यास वेळीच तज्ज्ञांना दाखविणेही आवश्यक आहे. 
‘योग्य आहार म्हणजेच योग्य आरोग्य’.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com