वुमन हेल्थ : नेमेचि येते...

डॉ. ममता दिघे, स्त्रीरोगतज्ज्ञ
Saturday, 13 June 2020

उन्हाळ्यानंतर पावसाळा आणि त्यानंतर हिवाळा. या ऋतुचक्राची आपल्याला इतकी सवय झालेली असते, की कळत न कळत आपल्याला एक ऋतू संपून दुसरा येण्याचे वेध लागतात. तरुण्यावस्था सुरू झाल्यापासून असेच वेध प्रत्येक मुलीला, स्त्रीला लागतात ते दर महिन्याला वेळच्या वेळी पाळी येण्याचे. या ऋतुचक्राची इतकी सवय झालेली असते की. नियमित पाळी येणाऱ्या मुलीची पाळी अचानक लांबली तर लगेच मनात शंकेची पाल चुकचुकते.

उन्हाळ्यानंतर पावसाळा आणि त्यानंतर हिवाळा. या ऋतुचक्राची आपल्याला इतकी सवय झालेली असते, की कळत न कळत आपल्याला एक ऋतू संपून दुसरा येण्याचे वेध लागतात. तरुण्यावस्था सुरू झाल्यापासून असेच वेध प्रत्येक मुलीला, स्त्रीला लागतात ते दर महिन्याला वेळच्या वेळी पाळी येण्याचे. या ऋतुचक्राची इतकी सवय झालेली असते की. नियमित पाळी येणाऱ्या मुलीची पाळी अचानक लांबली तर लगेच मनात शंकेची पाल चुकचुकते. हल्ली इतके वाचनात येते, इतकी माहिती आपल्याला मिळत असते की अशी चुकून पाळी चुकली किंवा लांबली तर लगेच मुलींच्या मनात भलभलत्या शंका यायला लागतात. पीसीओडी तर नसेल, थायरॉईडची समस्या असेल का, की मधुमेह?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही संसर्ग असेल की फायब्रॉइड, अंडाशयात बिघाड असेल का? एक नाही हजार चिंता आणि मन चिंती ते वैरी न चिंती! पाळी न येण्याच्या या सगळ्या शक्यता असू शकतात, पण आपला आहारविहार, लैंगिक व्यवहार, आरोग्य उत्तम असल्यास कधीतरी काहीही कारण नसता नाही पाळी पुढे, मागे होऊ शकते. काहीतरी कुरबुर असू शकते पण कारण काळजीचेच असते, असे नाही. दैनंदिन व्यवहारात काही बदल, जीवनशैलीतील आणि निसर्गातील बदल यांमुळे हार्मोन्सवर परिणाम होऊन पाळी अनियमित होऊ शकते. सतत ६ महिने किंवा त्याहून अधिक वेळा अनिश्चित पाळी आल्यास त्याला अनियमित चक्र म्हटले जाते.

साधारणपणे पाळी सुरू झाल्यावरचा काही काळ, पाळी जाण्याआधीचा काही काळ, गर्भारपणानंतरचा किंवा गर्भपातानंतरचा आणि स्तनपान देत असतानाचा काळ, या वेळी पाळी अनिश्चितपणे पुढे-मागे होऊ शकते. ते अतिशय नॉर्मल आहे. प्रत्येक स्त्रीच्या पाळीची एक निश्चित घडी बसलेली असते. वर सांगितलेले कोणतेही कारण लागू नसेल, बाकी कोणताही त्रास नसेल आणि तरीही एखाद्या वेळी पाळी नेहमीसारखी ठोक्यावर आली नाही तर नियमित चक्राची सवय असलेल्या मुलींनी घाबरून जाऊ नये. 

यांपैकी कोणतीही गोष्ट महिन्याभरात झाली असल्यास पाळी उशिराने येऊ शकते. अशा वेळी १-२ आठवडे वाट पाहायला काहीच हरकत नाही. गर्भधारणा नसल्यास शरीराचे स्वास्थ्य पूर्ववत झाले, की आपोआप नियमित चक्र सुरू होते. नाहीच झाले तरी घाबरून न जाता डॉक्टरांचा सल्ला घ्या. बरेच महिने असे अनियमित चक्र सुरू राहिल्यास मात्र वैद्यकीय उपचार घेण्याची गरज लागेल. काहीतरी बिघाड असल्याचा हा संकेत असतो.

तुमचा वैद्यकीय इतिहास, सामाजिक आणि कौटुंबिक इतिहास बघून आणि काही वेळा रक्ताच्या काही चाचण्या करून हार्मोन्सची आणि साखरेची पातळी तपासून किंवा काही वेळा अंडाशय व गर्भाशय व्यवस्थित असल्याची खात्री करण्यासाठी सोनोग्राफीसारख्या उपायांनी योग्य ते निदान लगेच होऊ शकते. योगाभ्यास, चांगला आहार, नियमित व्यायाम असे सगळे करत असाल आणि गरज असल्यास उपचार घेतल्यास तुमची पाळी तुम्हाला नियमित भेटायला येणारी सखी बनून जाईल!

पाळी लांबण्यास अशी करणे असू शकतात

  • शिफ्टमध्ये काम करणे/रात्रपाळी करणे.
  • व्यायामाचा अतिरेक होणे.
  • वजनात वाढ किंवा वजन कमी होणे.
  • खाणे पिणे नीट न होणे (जंक फूड जास्त खाल्ले गेल्याने पुरेशा कॅलरी न मिळणे)
  • वेगळ्या कारणासाठी काही औषधे घेतलेली असणे.
  • कशाचा तरी खूप विचार केल्याने ताण येणे.
  • शारीरिक दमणूक झालेली असणे.
  • पुरेशी झोप न होणे.
  • जेट लॅग असणे किंवा लांब पल्ल्याचा प्रवास केलेला असणे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr mamta dighe on women health