वुमन हेल्थ : मन तळ्यात मळ्यात, ....जाईच्या कळ्यांत!

Women
Women

जेव्हा आजूबाजूची मोठी माणसे त्यांच्या सोयीने आपल्याला कधी, ‘लहान आहेस का आता...’ किंवा ‘लहान आहेस तू अजून’ असं म्हणायला लागतात तेव्हा जाणावे की आपण पौगंडावस्थेत येऊन पोचलो आहोत. तळ्यात, मळ्यात अशी ही अवस्था! अनेक नवे अनुभव, नवी आकर्षणे आपल्याला खुणावत असतात आणि त्याचबरोबर अनेक नवे प्रश्न फेर धरून भोवती नाचत असतात. एका मोठ्या बदलाला सामोरे जात असल्याने शरीरात, भावनांत अनेक फरक होत असल्याचे लक्षात येत असते. मुली तर खूपच गोंधळात असतात. नवीनच सुरू झालेल्या पाळीशी जुळवून घेत असतात. शरीराला येणारी गोलाई, कधीकधी येणाऱ्या मुरूम-पुटकुळ्या या सगळ्या बदलांना या वयात वेगाने सामोरे जावे लागते. पौगंडावस्थेत मुलींच्या मनात अनेक प्रश्न सतत निर्माण होत असतात. अनेक गोष्टींचे कुतूहल असते, भीतीही असते. पौगंडावस्थेतील स्वास्थ्य हा महिलांच्या आरोग्याचा महत्त्वाचा घटक.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्त्री-स्वास्थ्याशी निगडित पुढीलप्रमाणे काही समस्या असू शकतात आणि त्याकडे अजिबात दुर्लक्ष करता कामा नये 

  • पाळी येण्याच्या समस्या : पाळी वेळेवर न येणे, अजिबात न येणे, खूप कमी रक्तस्राव होणे किंवा खूप जास्त रक्तस्राव होणे! बारा ते पंधरा वयात पाळी सुरू न झाल्यास वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. 
  • पाळीच्या वेळी वेदना - काही मुलींना पाळीच्या आधी आणि सुरू असताना ओटी-पोटात इतके दुखते की, त्यांना शाळाही बुडवावी लागते. काहींना नियमित चक्र सुरू झाल्यावरही कधीकधी ४-५ महिने पाळी येत नाही. अशांना ‘पीसीओडी’चा विकार असणायची शक्यता असू शकते. वेळीच लक्षात येऊन उपाय केले तर हा त्रास नक्की कमी होऊ शकतो.
  • काही मुलींना दह्यासारखा स्राव, योनीमार्गात खाज, लघवीच्यावेळी जळजळ होणे यांसारखेही त्रास होतात. योग्य प्रकारे स्वच्छता राखून आणि औषधोपचार घेतल्याने हे त्रास कमी होतात.
  • या वयातील काही मुलींना अंडाशयात सिस्ट होतात. त्यावर लक्ष ठेवून औषधोपचार करावा लागतो. 
  • काहींना एन्डोमेट्रोसेस म्हणजे गर्भाशयाच्या आतले लायनिंग गर्भाशयाबाहेर वाढ होण्याचा त्रास सुरू होऊ शकतो.
  • एचपीव्ही या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
  • सर्व्हायकल कॅन्सरची लस या वयातील मुलींनी देऊन हा धोका कमी करता येतो. 

शारीरिक विकारांबरोबरच काही मुला-मुलींना मानसिक त्रासही अधिक होतात. या वयात समाजाचा, परिस्थितीचा, घडामोडींचा परिणाम मनावर खूप लवकर होतो. नैराश्य, हुरहुर, कोशात जाणे हे विकार असू शकतात. शारीरिक बदलाशी जुळवून घेत असताना अचानक मुलींच्या कपड्यांवर, जोरात धावण्या-उड्या मारण्यावर, मोठ्या आवाजात हसण्या-बोलण्यावर घरातील माणसे मर्यादा आणतात. या वयात बरोबरीच्या मित्र-मैत्रिणींचा खूप प्रभाव असतो. मुलींना आपल्या दिसण्यात किंवा शरीराच्या ठेवणीत काही खोट आहे का, असे वाटून आत्मविश्वास जाऊ शकतो.

या सगळ्यामुळे मानसिक अस्वास्थ्य निर्माण होऊ शकते. यासाठी संवाद साधणे, मग तो आई-वडिलांबरोबर, मोठ्या भावंडांबरोबर, मैत्रिणीबरोबर किंवा गरज पडल्यास समुपदेशकाबरोबर, गरजेचा आहे. पौगंडावस्था हा आयुष्याला योग्य दिशा देण्याचा काळ आहे. एक स्त्री म्हणून आपले प्रजनन आरोग्य समजून घेऊन त्याची योग्य निगा राखायला शिकण्याचे हे वय आहे. ही अवस्था आपल्याला मुक्त करणारी आहे, तारुण्याची सुंदर दारे उघडून देणारी आहे, सुरवंटाचे फुलपाखरू होण्यासाठी तयारी करण्याची आहे. हे मुलांकडे नीट पोचवणे आमि त्यांना समजेल अशा भाषेत त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे गरजेचे असते. मुलींनीही मोकळेपणाने घरच्यांशी, गरज असेल तेव्हा डॉक्टरशी बोलून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले पाहिजे म्हणजे तळ्यात-मळ्यात न राहता हा काळ जाईच्या कळ्यात असल्याप्रमाणे सुंदर आणि सुगंधी होईल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com